आपला सोबती बनलेल्या स्मार्टफोनचा उपयोग आता केवळ फोन कॉल्सपुरता मर्यादित राहिलेला नाही. तर त्याचबरोबर हा स्मार्टफोन म्हणजे आपल्या हातात मावणारा सुपर अ‍ॅमोलेड स्क्रिन टेक्नोलॉजी असणारा, टचबेस्ड असा ५.५ इंची संगणकच असतो. यामुळेच आजकाल स्मार्टफोनमधून त्याच्या वापरकर्त्यांचं व्यक्तिमत्त्व प्रतिबिंबित होत असतं.

गेल्या दशकात, फीचरफोन्सचं रूपांतर स्मार्टफोन्समध्ये झालं जे आता एखाद्या ब्लेडसारखे पातळ असतात आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानानेही सज्ज असतात. कोणत्याही क्षणी, अगदी प्रवासात असतानाही केवळ काही बटनं दाबून बहुतेक सर्व प्रकारची कामं करण्याची क्षमता उपलब्ध झाली आहे. स्मार्टफोनमध्ये असणारी आत्ताची वैशिष्टय़  पाहता, काही वर्षांपूर्वी असं काही भविष्यात अस्तित्वात असू शकेल, यावर कोणाचा विश्वासच बसला नसता. आजकाल स्मार्टफोन्समध्ये अनेक वैशिष्टय़  पाहायला मिळतात. उदा. अत्यंत वेगवान असे फिंगरप्रिंट अनलॉकिंग तंत्रज्ञान, ऑक्टा-कोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसर, १२८ जीबीपर्यंत अंतर्गत स्टोअरेजसह हाय लोडेड रॅम. या वैशिष्टय़ांमुळेच ग्राहकांना प्रवासात असतानाही कोणत्याही चिंतेविना आपली आवडती गोष्ट उपलब्ध करून घेता येते. मोबाइल कॅमेऱ्यांमध्येही मोठा क्रांतिकारी बदल घडून आला आहे. त्यामुळे आता डिजिटल किंवा जड डीएसएलआर कॅमेऱ्यांची गरजच उरलेली नाही. स्मार्टफोन्समध्ये १६ मेगापिक्सेलपर्यंतचे कॅमेरे उपलब्ध असल्याने त्याद्वारे काढल्या जाणाऱ्या फोटोचा दर्जाही सर्वोत्तमच असतो. स्थिर छायाचित्रांच्या जागी आता लाइव्ह फोटोज आल्यामुळे ग्राहकानुभवात आमूलाग्र बदल झाला आहे. जागतिक तंत्रज्ञान आणि टेलिकॉम संदर्भातील एका अहवालानुसार, २०१८ दरम्यान देशातली स्मार्टफोनची बाजारपेठ २३ टक्के इतक्या चक्रवाढ वार्षिक विकास दराने (सीएजीआर) वाढणार आहे. ही वाढ म्हणजे या कालावधीदरम्यान होणाऱ्या एकूण जागतिक वाढीचा ३० टक्के हिस्सा असेल. येत्या काही वर्षांमध्ये अधिकाधिक लोक स्मार्टफोनकडे वळण्यामागे अ‍ॅडव्हान्स्ड फोरजी एलटीई नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरचा उदय हे प्रमुख कारण असेल.

तंत्रज्ञान आणि उपकरणांमधला बदल इतका झपाटय़ाने घडत असल्याने स्मार्टफोनच्या भविष्यामध्ये मोठा बदल अपेक्षित आहे. तंत्रज्ञानामध्ये अत्यंत झपाटय़ाने बदल घडून येत असल्याने हे भविष्य नेमकेपणाने सांगता येत नसलं तरी सध्याच्या ट्रेण्डसवरून पुढल्या पाच वर्षांत आपल्याला काय बघायला मिळेल याचा अंदाज बांधता येईल.

मॉडय़ुलर स्मार्टफोन्स – स्मार्टफोन श्रेणीत पडलेली नवी भर म्हणजे मॉडय़ुलर फोन्स. या फोनचं तंत्रज्ञान ग्राहकांना छोटय़ा प्रोजेक्टरसारखे अतिरिक्त भाग जोडण्याची मुभा देतं ज्यामुळे त्या उपकरणाची कार्यक्षमता आणखी वाढते. बाजारपेठेत नुकताच पहिलावहिला मॉडय़ुलर फोन दाखल झाला असून भविष्यात तो नियमित विभाग बनेल.

व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी – व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी ही आणखी अशी एक संकल्पना आहे जी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. पण हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा स्मार्टफोन बनवणारे तिचा योग्य पद्धतीने वापर करतील. सध्या केवळ गुगल कार्डबोर्डसारखं प्राथमिक उपकरणच स्मार्टफोन्समध्ये प्लग-इन करता येतं. येत्या काही वर्षांमध्ये या तंत्रज्ञानावर आधारित संकल्पनांसह स्मार्टफोन्सची निर्मिती करता येईल, ज्या स्मार्टफोन्समध्ये सहजपणे सामावून घेतल्या जाऊ  शकतील.

व्हॉइस इंटिग्रेशन – सध्या स्मार्टफोन्समध्ये व्हॉइस असिस्टंट सेवा उपलब्ध आहे आणि हीच सेवा देणारी अनेक अ‍ॅप्सही उपलब्ध आहेत. भविष्यात असा एक अधिक स्मार्ट डिजिटल असिस्टंट असेल जो केवळ प्राथमिक माहितीच पुरवणर नाही तर नेव्हिगेशन, रिमाइंडर्स, बोलण्याच्या वेगवेगळ्या ढबी समजणं आदी गोष्टींमध्येही तो पुढारलेला असेल.

सुधारित बॅटरी – स्मार्टफोन अशा तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल तर ग्राहकांना सर्वाधिक चिंता लागून राहील ती बॅटरी लाइफची. सौरऊर्जा आणि अ‍ॅल्युमिनिअम ग्राफाइटसारख्या पर्याय ऊर्जास्रोतांवर सध्या संशोधन चालू असून ते यशस्वी झाल्यास बॅटरी दीर्घकाळ टिकेल आणि स्मार्टफोन चार्ज करण्यासाठी लागणाऱ्या वेळेतही घट होईल.

फ्लेक्झिबल डिस्प्ले – सध्या फ्लेक्झिबल डिस्प्लेची सर्वत्र चर्चा चालू आहे, कारण ही एक पूर्णत: नवीन संकल्पना आहे. स्मार्टफोन एखाद्या टॅब्लेट किंवा घालता येण्याजोग्या उपकरणात रूपांतरित करता येईल ज्यामुळे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या उपकरणांचा संगम घडून येईल. कॅमेऱ्यामधल्या विकासाबद्दल बोलायचं झालं तर डय़ुएल कॅमेरा स्मार्टफोन ही भविष्यातली एक मोठी संकल्पना असेल.

फोल्डेबल स्मार्टफोन्स – मोठय़ा आकाराचा स्मार्टफोन घडी घालून आपल्या पाकिटात ठेवता आला तर? ओएलईडी स्क्रिन्स असणाऱ्या फोल्डेबल स्मार्टफोन्समुळे अशक्य वाटणारी ही गोष्टही भविष्यात सहज शक्य होईल. उपकरणाला कोणतीही इजा न पोहोचवता हा फोन दुमडता येईल आणि त्यानंतर त्याचा आकार वॉलेटएवढा होईल.

आणखी एका गोष्टीवर जोरदार वादविवाद होत असतात. ती म्हणजे आर्टिफिशिल इंटेलिजन्स. एकेकाळी सायन्स फिक्शनमधलं ते एक स्वप्न होतं. पण सध्याच्या तंत्रज्ञानामुळे लवकरच ते प्रत्यक्षात येईल, अशी चिन्हं दिसत आहेत. सध्या स्मार्टफोन हाताळण्यास जितके सोपे आहेत, त्यांच्यात आर्टिफिशिअल इंटेलिजन्स समाविष्ट झाल्यानंतर त्यांचं रूपांतर अक्रिय उपकरणापासून सक्रिय भागीदारामध्ये होईल. ते आपल्याला निर्णय घेण्यास मदत करतील किंवा अगदी आपल्यासाठी निर्णय घेण्याचं कामही करतील. आर्टिफिशिअल इंटेलिजन्स स्मार्टफोन्स तसंच इतर मोबाइल उपकरणांमध्ये समाविष्ट करण्यामधला मोठा अडथळा म्हणजे त्यासाठी लागणारी ऊर्जा. ज्याप्रमाणे मानवी मेंदूला कार्यरत राहण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर ऊर्जेची गरज असते त्याचप्रमाणे सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरलाही मोठय़ा प्रमाणावर ऊर्जा लागते, जे आपल्या बुद्धिमत्तेची पुनर्निर्मिती करत असतात.

तंत्रज्ञान म्हणजे केवळ एकत्रीकरण नाही तर अत्यंत सहजगत्या माहिती मिळवणं आहे ज्यामुळे ग्राहकांचं सातत्याने सबलीकरण होत राहतं आणि त्यांना माहिती मिळत राहते. स्मार्टफोनमधल्या नवनवीन बदलांचा परिणाम आणि तंत्रज्ञात होत असलेले बदल हे परस्परांवर परिणाम करत असतात. तंत्रज्ञान ग्राहकांसाठी काय घेऊन आलं आहे हे भविष्यात कळेलच. कोणत्याही स्मार्टफोन उत्पादकासाठी तंत्रज्ञान हे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण त्यामार्फतच तो आपल्या ग्राहकांना नावीन्यपूर्ण आणि उपयुक्त वैशिष्टय़ बहाल करत असतो. ग्राहकांच्या संख्येतली सातत्यपूर्ण वाढ कायम ठेवण्यासाठी आणि ग्राहकांना नवीन आणि ताज्या गोष्टी देण्यासाठी त्याची ही धडपड चालू असते.

विवेक झांग

(‘विवो’चे मुख्य विपणन अधिकारी)