स्मार्टफोन आणि सेल्फी हे एक अतूट समीकरण अलीकडे बनत चाललं आहे. आजची पिढी फ्रंट कॅमेऱ्यातून स्वत:भोवतीचं जग पाहते, अनुभवते आणि शेअर करते. त्यामुळे उत्कृष्ट ‘सेल्फी’ देणाऱ्या स्मार्टफोनची मागणी वाढत चालली आहे. साहजिकच कंपन्यांचाही कल अधिक कार्यक्षम फ्रंट कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन निर्मितीकडे वळला आहे. ‘जिओनी’ या कंपनीने अलीकडेच भारतीय बाजारात आणलेल्या ‘ए१’कडे पाहिल्यावर सर्वात आधी याच गोष्टीची प्रचीती येते.

कॅमेऱ्याच्या ‘डोळय़ां’तून आपण पाहात असलेलं जग साऱ्यांना दाखवायचे दिवस आता मागे पडत आहेत. सध्या दिवस आहेत स्वत:सह आसपासचं जग ‘टिपण्याचे’. काही वर्षांपूर्वी जो ‘फ्रंट कॅमेरा’ असेल किंवा नसेल तरी, कोणाला फरक पडत नव्हता, तोच ‘फ्रंट कॅमेरा’ आज स्मार्टफोनचे महत्त्वाचे ‘फीचर’ बनत चालला आहे. याला कुणी आत्ममग्नता म्हणेल किंवा कुणी स्वत:च्या कौतुकाचे फॅड म्हणेल; परंतु ‘सेल्फी’ आजघडीला स्मार्टफोनची ओळख बनू लागला आहे. बाजाराची ही नस कंपन्यांनी केव्हाच ओळखली असून भारतात येणाऱ्या नवनवीन मोबाइलमध्ये ‘फ्रंट कॅमेऱ्या’ला विशेष महत्त्व देण्यात येत आहे. अशाच श्रेणीमध्ये आता ‘जिओनी’च्या ‘ए१’ या स्मार्टफोनचाही समावेश करता येईल. किंबहुना बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या उत्कृष्ट सेल्फीची सुविधा देणाऱ्या स्मार्टफोनमध्ये ‘ए१’ला वरचा क्रमांक देता येऊ शकतो.

Landing of Manishnagar flyover is dangerous
नागपूर : मनीषनगर उड्डाणपुलाची ‘लँडिंग’ धोकादायक
Kulaba Bandra Seepz, Metro 3
मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून अल्प दिलासा, ‘कुलाबा वांद्रे सीप्झ मेट्रो ३’ मार्गिकेचे काम वेगात
Mega block on Central Harbour and Trans Harbour route
मुंबई : मध्य, हार्बर, ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक
rail line to Karjat
कर्जतला जाण्यासाठी आणखी एक रेल्वे मार्ग, पनवेल – कर्जत रेल्वे मार्ग डिसेंबर २०२५ पूर्ण करण्याचे उद्दिष्ट्य

‘ए१’ हा जिओनीचा या वर्षीचा पहिला ‘फ्लॅगशिप’ फोन आहे. सध्या आयपीएलच्या सामन्यादरम्यान या फोनच्या जाहिरातीही जोरात सुरू असून ‘सेल्फीस्थान’ हा शब्द तयार करून या स्मार्टफोनने सेल्फीमय होत असलेल्या हिंदुस्थानच्या तरुणाईलाच साद घातली आहे. परंतु, ‘ए१’मध्ये कॅमेरा हीच त्याची जमेची बाजू आहे, असं नाही. याखेरीज या स्मार्टफोनमध्ये अनेक वैशिष्टय़े आहेत. त्य़ामुळे या सर्व वैशिष्टय़ांनिशी या फोनच्या उपयुक्ततेकडे पाहिले गेले पाहिजे.

‘लुक’ आणि ‘डिझाइन’

अलीकडे परवडणाऱ्या अर्थात २० हजार रुपयांपेक्षा कमी किमतीतील स्मार्टफोनमध्येही धातूचे बाह्यावरण (बॉडी) उपलब्ध करण्यात येत आहे. धातूच्या बॉडीला असलेली उपजत चमक आणि त्यामुळे स्मार्टफोनला लाभणारे उंची देखणेपण या गोष्टी ग्राहकाला आकर्षित करतात. ‘ए१’देखील अशाच स्वरूपात आपल्यासमोर येतो. या फोनची मागील बाजू पूर्णपणे धातूची असून पुढील बाजू पूर्णपणे काचेची आहे. वक्राकार कोपरे आणि ‘मॅटफिनिश’मुळे हा फोन आकर्षक दिसतो. त्याच वेळी हा स्मार्टफोन हातातून निसटण्याचा धोकाही जास्त असतो, हेही लक्षात घ्यायला हवे. हा फोन हातात घेतल्या क्षणी तो काहीसा मोठा वाटतो. परंतु, सध्या बाजारात येणारे सर्वच स्मार्टफोन या आकारात असल्याने तुम्ही जर त्याच आकाराचे फोन वापरत असाल तर तुम्हाला ‘ए१’ हाताळणे फारचे कठीण जाणार नाही.

या फोनच्या मागील बाजूस १३ मेगापिक्सेलचा कॅमेरा आणि एलईडी फ्लॅश पुरवण्यात आला आहे. व्हॉल्यूम आणि पॉवर ही बटणे उजवीकडे तर सिम कार्डसाठीचे ‘स्लॉट’ डावीकडे आहेत. पुढील बाजूस ५.५ इंच आकाराचा डिस्प्ले आहे. या डिस्प्लेचे वैशिष्टय़ म्हणजे याची काच काहीशी बाकदार आहे. बाकी या फोनची रचना अन्य फोनसारखीच आहे.

कार्यक्षमता

‘ए१’मध्ये ६४ बिट ऑक्टाकोअर प्रोसेसर असून चार जीबी रॅमची त्याला जोड देण्यात आल्याने फोनची कार्यक्षमता चांगली आहे. अलीकडच्या काळात बाजारात तीन जीबी रॅम असलेले स्मार्टफोन स्थिरावले असताना चार जीबी रॅमचा हा फोन या पंक्तीत काहीसा आघाडीवर बसतो. या फोनची अंतर्गत स्टोअरेज क्षमता ६४ जीबी इतकी असून मायक्रोएसडी कार्डसह ती २५६ जीबीपर्यंत वाढवता येते. या फोनमध्ये ४जी, वायफाय, ब्लूटूथ ४.०, एफएम रेडिओ, ओटीजी सपोर्ट, ३.५ एमएम हेडफोन जॅक अशा आजकाल सर्वच स्मार्टफोनमध्ये असलेल्या सुविधा पुरवण्यात आला आहे. या फोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, याचा ‘फिंगरप्रिंट स्कॅनर’ पुढील बाजूस ‘होम’बटणावर देण्यात आला आहे. ‘ए१’ अ‍ॅण्ड्रॉइड ७वर आधारित ‘जिओनी’च्या ‘अमिगो ४.०’ या ऑपरेटिंग सिस्टीमवर काम करतो.

कॅमेरा

सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे कॅमेरा विशेषत: फ्रंट कॅमेरा हे ‘ए१’चे प्रमुख वैशिष्टय़ आहे. या फोनचा मागील कॅमेरा १३ मेगापिक्सेलचा असून पुढील कॅमेरा १६ मेगापिक्सेलचा आहे. यावरूनच जिओनीने ‘ए१’ बनवताना सेल्फीमय ग्राहकवर्गावर किती लक्ष केंद्रित केले आहे, याचा अंदाज येतो. दोन्ही कॅमेऱ्यांतील छायाचित्रे चांगली व सुस्पष्ट आहे. सोनीच्या सेन्सरमुळे मागील कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्रे सुप्रकाशित येतात. तर फ्रंट कॅमेऱ्यातून काढलेली छायाचित्रे दर्जेदार आहेत. मात्र, छायाचित्र ‘ब्राइट’ करण्याच्या यंत्रणेमुळे काही वेळा प्रकाशाचा नैसर्गिक समतोल वा कमी-अधिकपणा निघून जातो व छायाचित्रांमधील जिवंतपण हरवून बसतो. अर्थात अशी तक्रार काही मोजक्या वेळाच अनुभवता आली.

बॅटरी

या फोनचे आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे, त्याची शक्तिशाली बॅटरी. ‘ए१’मध्ये ४०१० एमएएच क्षमतेची बॅटरी असून ती जवळपास दोन दिवस व्यवस्थितपणे काम करू शकते, असा कंपनीचा दावा आहे. अर्थात सध्या ज्या प्रमाणात स्मार्टफोनचा वापर होतो, त्या प्रमाणात हा फोन वापरून पाहिला असता, संपूर्ण दिवसभर व्यवस्थित काम केल्यानंतरही रात्री या फोनची बॅटरी काही अंशी शिल्लक राहिली. त्यानुसार, या फोनची बॅटरी शक्तिशाली आहे, असं म्हणायला हरकत नाही.

एकूणच, जिओनीचा ‘ए१’ हा २० हजार रुपयांच्या आतील स्मार्टफोनच्या पंक्तीत एक चांगला पर्याय ठरू शकतो. कॅमेरा आणि बॅटरी हे या फोनचे महत्त्वाचे गुण असले तरी अन्य बाबतीत तो या किंमतश्रेणीतील अन्य फोनइतक्याच क्षमतेने काम करतो. तुम्ही ‘सेल्फी’चे भक्त असाल आणि मित्रमंडळींमध्ये स्वत:चा ‘सेल्फी’ उठून दिसावा, ही तुमची इच्छा बाकी सर्व अपेक्षांपेक्षा अधिक प्रबळ असेल तर, ‘ए१’ हा तुमच्यासाठी योग्य पर्याय आहे.

वैशिष्टय़े

जिओनी ए१

डिस्प्ले :  ५.५ इंच

कॅमेरा : मागील कॅमेरा १३ मेगापिक्सेल, पुढील कॅमेरा १६ मेगापिक्सेल

बॅटरी: ४०१० एमएएच

मेमरी: ४ जीबी रॅम, ६४ जीबी अंतर्गत स्टोअरेज (२५६ जीबी एक्स्पाण्डेबल)

किंमत :  १८,३०० रुपये (ई-कॉमर्स संकेतस्थळांवर सवलतीतही उपलब्ध)