इंटर्नल मेमरी हा कुठल्याही स्मार्टफोनसाठीचा महत्त्वाचा घटक. त्यामुळेच स्मार्टफोन निवडताना फोनची इंटर्नल मेमरी बघितली जाते. मेमरी जितकी जास्त तितकी पसंती अधिक. फोनची ऑपरेटिंग सिस्टम ही याच मेमरीमध्ये स्टोअर केलेली असते. तसेच स्क्रीनसेव्हर्स, थीम्स, अलार्म, िरगटोन्ससुद्धा इंटर्नल मेमरीवरच असतात. फोनमध्ये आधीपासूनच असलेली अ‍ॅप्स (ज्यांना डिफॉल्ट अ‍ॅप्स म्हटले जाते) हीदेखील याच ठिकाणी स्टोअर केलेली असतात. इतकेच नाही तर जसजसा या अ‍ॅप्सचा वापर वाढत जातो तसतसा त्यांच्याशी संलग्न डेटासुद्धा इंटर्नल मेमरीमध्येच स्टोअर व्हायला लागतो. आणि हळूहळू ही मेमरी भरायला लागते. फोन सुरळीत चालण्यासाठी इंटर्नल मेमरीपैकी ठरावीक जागा मोकळी असणे गरजेचे असते. ही जागा रिकामी कशी करायची ते आपण या लेखात बघू या. कॅशे क्लीअर करणे, मोठय़ा फाइल्स डिलीट करणे वगैरे पारंपरिक उपाय आहेतच. पण त्याशिवाय असणारे इतर पर्याय जाणून घेऊ या.

सर्वात आधी मेमरी क्लीअर करण्यासाठी काही विनाशुल्क टूल्स उपलब्ध आहेत. त्यांचा आढावा घेऊ.

क्लीन मास्टर – फोनची साफसफाई करणारे हे लोकप्रिय अ‍ॅप आहे. तसेच अडचण ठरणारी अ‍ॅप्स अनइन्स्टॉल करण्याची सुविधाही या अ‍ॅपमध्ये आहे.

डिस्कयुसेज – अ‍ॅण्ड्रॉइड फोनवरच्या जागेच्या वापराचे ग्राफिकल नोटिफिकेशन हे अ‍ॅप देते. एकूण जागेचा वापर कसा सुरू आहे याची माहिती या अ‍ॅपवरून मिळू शकते.

ईएस फाइल एक्सप्लोरर – फाइल मॅनेजरचे काम चोखपणे बजावणारे हे अ‍ॅप आहे. अनेक तंत्रस्वामींच्या पसंतीचे असे हे अ‍ॅप आहे.

युअरसेफ मीडिया रिडायरेक्टर – या अ‍ॅपचे वैशिष्टय़ असे की एका फोल्डरमधून दुसऱ्या फोल्डरवर फाइल हलवण्याचे काम हे अ‍ॅप करते.

आता बघू या नेमके काय केल्याने इंटर्नल मेमरी रिकामी होऊ  शकते.

*      फोटोज आणि व्हिडिओज एक्सटर्नल किंवा एसडी कार्डवर सेव्ह करणे हा उपाय तसा सगळ्यांनाच माहित्येय. नवीन मोबाइल घेतल्यानंतर कॅमेराचे सेटिंग बदलणं महत्त्वाचे असते. याचे कारण डिफॉल्ट सेटिंगनुसार कॅमेरातून टिपलेले फोटो आणि व्हिडीओ इंटर्नल मेमरीमध्ये सेव्ह होत असतात.

खाली दिलेल्या क्रमाने हे सेटिंग बदलता येईल.

कॅमेरा अ‍ॅपमध्ये जाऊन सेटिंग्जवर क्लिक करा. त्यानंतर स्टोअरेजवर क्लिक करून मेमरी कार्ड सिलेक्ट करा म्हणजे काम झाले.

*      मीडियाचा मोठय़ा प्रमाणावर वापर होणाऱ्या अ‍ॅप्सची एक यादी बनवा. मीडिया म्हणजे फोटो, लोगो, व्हिडीओचा कमी-अधिक प्रमाणात वापर करणारे अ‍ॅप्स. उदाहरणार्थ पॉडकॅचर्स, म्युझिक शेअरिंग अ‍ॅप्स, व्हिडीओ स्ट्रीमिंग अ‍ॅप्स, स्ट्रिमिंग रेडिओ अ‍ॅप्स, वॉलपेपर डाउनलोडर्स वगैरे. नेमकी कोणती अ‍ॅप्स मीडियाचा वापर अधिक करते याची माहिती डिस्कयुसेजसारखी अ‍ॅप्स अचूकपणे देतात. ही अ‍ॅप्स ओळखल्यानंतर त्यांच्या सेटिंग्जमध्ये जायचे. आणि त्या अ‍ॅप्सचा डेटा जिथे सेव्ह होतो ते डिफॉल्ट फोल्डर्स बदलून त्यांना मेमरी कार्डवर हलवायचे. किंवा त्या विशिष्ट अ‍ॅपचा वापर जास्त नसल्यास ते थेट डिलीट करून टाकायचे.

*      लॉग्स फोल्डर नावाचा एक प्रकार असतो. एखादी कमांड दिल्यानंतर जी अ‍ॅक्शन होते ती संपूर्ण प्रक्रिया या लॉग फाइल्समध्ये सेव्ह होत असते. हे लॉग फोल्डर्स अनेकदा मोठय़ा साइझचे असतात. डिस्कयुसेज किंवा ईएस फाइल एक्सप्लोररच्या मदतीने हे फोल्डर्स शोधता येऊ शकतात. त्यांची साइझ मोठी असेल तर हे फोल्डर्स डिलीट करण्यास काहीच हरकत नाही. कित्येकदा १००-१५० पेक्षा जास्त एमबी इतकी जागा हे फोल्डर्स व्यापून असतात.

*      जंक फाइल्स आणि कॅश मेमरी वेळच्या वेळी साफ करणं हा उपाय तर आहेच. याशिवाय वापरात नसलेली अ‍ॅप्स डिलीट करण्याचाही पर्याय उपलब्ध आहे. पण यापेक्षा आणखी एक गोष्ट करता येण्यासारखी आहे. ती म्हणजे ब्लोटेड कॉण्टॅक्ट्स स्टोअरेज बग नावाचा एक प्रकार असतो. गुगलशी संलग्न झालेली कॉण्टॅक्ट लिस्ट अनेकदा मोबाइलवरची जागा व्यापते. अशा वेळी काळजीपूर्वक सर्व कॉण्टॅक्ट्सचा व्यवस्थित बॅकअक घ्यावा. हा बॅकअप दुसऱ्या एखाद्या डिव्हाइसवर तसेच क्लाउडवरही ठेवावा. आणि मोबाइलवरील कॉण्टॅक्ट्स फॉरमॅट करावेत. जेणेकरून हा बग दुरुस्त होतो. इतकेच नाही तर अनेकदा १५० एमबीपेक्षा जास्त जागा रिकामी होते. हे सगळे झाल्यानंतर कॉण्टॅक्स्ट पुन्हा सेव्ह करायला विसरू नका.

मुळात इंटर्नल मेमरी हा प्रकार नाजूक आहे. मोबाइल खेळता आणि हवेशीर ठेवण्यासाठी त्याला ‘ब्रीदिंग स्पेस’ लागते. ती त्याला मिळाली की मोबाइलचे काम एकदम सुरळीत चालते.

पुष्कर सामंत pushkar.samant@gmail.com