अ‍ॅप एसडी कार्डमध्ये सेव्ह कसे करू?

* माझ्याकडे सॅमसंग गॅलेक्सी एस डय़ुओज हा फोन आहे. त्यामध्ये मी आठ जीबीचे मेमरी कार्ड टाकले आहे. माझा सर्व डेटा त्या कार्डात आहे. फोनची इंटर्नल मेमरी १.८ जीबी आहे. तरीही त्यात गॅलरी युजिंग ७२० एमबी असे दाखविले जाते. असे का होते? – प्रज्ञा कांबळे
’ फोनची इंटर्नल मेमरीतील काही भाग हा सिस्टम मेमरीसाठी वापरला जातो. म्हणजे आपल्या फोनमध्ये असलेली इनबिल्टर अ‍ॅप्स उदाहरणार्थ कॉल लॉग, मेसेजेस इत्यादीसाठी ही मेमरी खर्च होते. याचबरोबर ऑपरेटिंग सिस्टमसाठीही मेमरी वापरली जाते. यामुळे इंटर्नल मेमरीमधील काही भाग हा कोणत्याही फोनमध्ये वापरलेला दाखविला जातो.

* माझ्याकडे अँड्रॉइड लॉलिपॉप व्हर्जनचा मायक्रोमॅक्स युनाइट २ हा फोन आहे. त्यामध्ये डाऊनलोड केलेले अ‍ॅप एसडी कार्डमध्ये सेव्ह कसे करू? – रामकृष्ण पांचाळ
’ अ‍ॅप एसडी कार्डमध्ये सेव्ह न होणे ही अनेक स्वस्त फोनमधली समस्या आहे. हे टाळण्यासाठी अनेक पर्याय आहेत. सर्वप्रथम तुम्ही अ‍ॅप्लिकेशन मॅनेजरमध्ये जा. हा पर्याय तुम्हाला सेटिंग्जमध्ये मोअर या पर्यायात उपलब्ध होईल. तेथे सर्व अ‍ॅप्सच्या यादीत तुम्ही जे अ‍ॅप तुम्हाला एसडी कार्डमध्ये सेव्ह करायचे आहे ते अ‍ॅप निवडा. तेथे तुम्हाला ‘मुव्ह टू एसडी कार्ड’ आणि ‘क्लीअर डेटा’ असे पर्याय दिसतील. यापैकी पहिला पर्याय निवडा, तुमचे अ‍ॅप एसडी कार्डला स्थलांतरित होईल. काही अ‍ॅप्स डाऊनलोड होण्यासाठी अंतर्गत साठवणूक महत्त्वाची असली तरी त्या अ‍ॅपचा डेटा तुम्ही एसडी कार्डमध्ये सेव्ह करू शकता.

* मला जर एखादा ई-मेल ठरावीक वेळी पाठवायचा असेल किंवा ठरावीक वेळी माझ्या इनबॉक्समध्ये वरती हवा असेल, तर जीमेलसाठी तशी काही सुविधा आहे का? – प्रज्ञेश म्हात्रे
’ गुगलने अशी सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ ई-मेल पाठविण्यासाठी होती. म्हणजे एखादे ई-मेल आपण ड्राफ्टमध्ये सेव्ह केले आणि त्यावर तारीख आणि वेळ दिली की त्या वेळेला बरोबर तो ई-मेल पाठविला जात असे. आता आपल्या इनबॉक्समधील ई-मेलही आपल्याला पाहिजे त्या वेळेला पाहायचा असेल तर गुगलने त्यासाठी मोबाइलच्या अलार्ममध्ये असते तशी ‘स्नूझ’ची सुविधा दिली आहे. आपल्या ई-मेलवर घडय़ाळय़ासारख्या दिसणाऱ्या चिन्हावर आपण क्लिक केल्यानंतर ‘स्नूझ’चा पर्याय समोर येतो. यामध्ये आपल्याला मेल कोणत्या तारखेला किती वाजता दिसणे अपेक्षित आहे ती वेळ टाकली की त्या वेळेला तो मेल इनबॉक्समध्ये फ्लॅश होतो. हॉटेल बुकिंगपासून ते मीटिंगच्या ई-मेल्सपर्यंतच्या ई-मेल्सना आपण ही सुविधा वापरू शकतो, जेणेकरून आपली वेळ चुकणार नाही.

‘विंडोज १०’ दहा लाख स्मार्टफोनवर
मायक्रोसॉफ्ट विंडोजच्या ‘विंडोज १०’ ही आवृत्ती आतापर्यंत दहा लाख विंडोज आधारीत स्मार्टफोनवर रूजू झाली आहे. गेल्या वर्षी सादर झालेली ‘विंडोज १०’ ही आवृत्ती आतापर्यंत एकूण २०कोटी उपकरणांवर कार्यान्वित झाली आहे.

स्मार्टफोनमधून ‘ई’ धूम्रपान
अमेरिकास्थित व्हेपरकेड कंपनीने ‘ई सिगारेट’ असलेला स्मार्टफोन तयार केला आहे. ‘ज्युपिटर आयओ ३’ असे या स्मार्टफोनचे नाव असून त्याच्या एका टोकाला जोडलेल्या अँटिनासदृश्य कांडीचा उपयोग धूम्रपानासाठी करता येऊ शकतो. या स्मार्टफोनची किंमत १९७०० रुपये इतकी आहे.