‘झोपो’ या चिनी स्मार्टफोन कंपनीने भारतीय बाजारात ‘स्पीड ८’ नावाने नवीन स्मार्टफोन आणला आहे. चार जीबी रॅम हे या फोनचे प्रमुख वैशिष्टय़ आहे. याशिवाय २१ मेगापिक्सेल मागील कॅमेरा, ३६०० एमएएचची बॅटरी, आठ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा असलेला हा स्मार्टफोन अ‍ॅण्ड्रॉइड ६ या अद्ययावत ऑपरेटिंग सिस्टीमवर कार्यरत आहे. या फोनचा डिस्प्ले ५.५ इंचाचा असून त्यात ३२ जीबीअंतर्गत स्टोअरेज सुविधा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ४ जी, ब्लूटूथ, वायफाय अशा सुविधा या स्मार्टफोनमध्ये देण्यात आला आहे. या फोनची किंमत अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी तो २० हजार रुपयांच्या आसपास असेल, असे सांगण्यात येते.

‘कामवाला’ रोबोट
घरकाम विशेषत: घरातील लादी पुसण्यासाठी किंवा झाडून घेण्यासाठी कामवाली बाई मिळणं शहरांत दिवसेंदिवस कठीण होत चाललं आहे. अनेक गृहिणी व्हॅक्यूम क्लीनरच्या साह्य़ाने घरात झाडू मारण्याचं काम उरकत असतात. परंतु व्हॅक्यूम क्लीनरच्या साह्य़ाने लादी पुसता येत नाही. परंतु ‘मिलाग्रो’ या कंपनीने लादी पुसणारा ‘रोबोट’ भारतीय बाजारात आणला आहे. ‘अ‍ॅग्वाबोट ५.०’ नावाचा हा यांत्रिक झाडू केवळ केरकचरा काढण्याचेच काम करत नाही तर पाण्याच्या मदतीने लादीही पुसतो. ‘अ‍ॅग्वाबोट’मध्ये पाणी साठवण्यासाठी एक कप्पा देण्यात आला असून त्यात पाणी भरून या टाकीच्या तळाला ‘स्मार्ट मॉप’ जोडताच ‘अ‍ॅग्वाबोट’ स्वत:च लादी पुसणे सुरू करतो. याशिवाय या यांत्रिक झाडूमध्ये ब्रशविरहित स्वच्छता यंत्रणा बसवण्यात आली असून त्या यंत्रणेच्या साह्य़ाने मऊ कार्पेटसारख्या नाजूक कपडय़ांची धूळ सहज हटवता येते. ‘मिलाग्रो’च्या संकेतस्थळावर (-www.milagrowhumantech.in) ‘अ‍ॅग्वाबोट ५.०’ विक्रीस उपलब्ध आहे.
किंमत : ३१९९० रुपये.

‘एलजी स्टायलस २ प्लस’ अद्ययावत अवतारात
‘एलजी’ने स्टायलस २ या स्मार्टफोनमध्ये बदल करून नव्या रूपात ग्राहकांसमोर आणला आहे. ५.७ इंची फुल एचडी आयपीएस क्वांटम डिस्प्ले, १.४ गिगाहार्ट्झचा ऑक्टा कोअर क्वालकॉम प्रोसेसर, ४जी सिम व्यवस्था, अॅण्ड्रॉइड ६.० ऑपरेटिंग सिस्टीम, १६ मेगापिक्सेल मागील कॅमेरा आणि ८ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा अशी या स्मार्टफोनची वैशिष्टय़े आहेत. या फोनसोबत ‘नॅनो कोटिंग’ स्टायलस पेन पुरवण्यात आला आहे. आधीच्या आवृत्तीत एलजीने रबरी टोक असलेला स्टायलस दिला होता. मात्र त्यात आता बदल करण्यात आला आहे. शिवाय हा स्टायलस हरवल्याची सूचना देणारी यंत्रणाही स्मार्टफोनमध्ये विकसित करण्यात आली आहे.
किंमत : २४४५० रुपये.