सह्य़ाद्रीच्या कडेकपारीत वसलेले किल्ले म्हणजे मराठेशाहीचं वैभव. या किल्ल्यांवर आज अवशेष रूपात असलेल्या वास्तुरचनांचा अभ्यास केला म्हणजे त्या काळातील वास्तुवैभवाची कल्पना येते.

मागच्या लेखात आपण किल्ल्यावरील वास्तुशैलीत वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या काळात झालेल्या स्थित्यंतराबद्दल माहिती घेतली. या लेखात किल्ल्यावर असलेल्या सर्व वास्तूंचा आढावा

Relief for flood affected Chirner due to works started before monsoon
पावसाळ्यापूर्वी सुरू झालेल्या कामांमुळे पूरग्रस्त चिरनेरला दिलासा?
Dried pods of opium, Dhule, opium Dhule,
धुळे : लसूण भरलेल्या मालमोटारीत हे काय… पोलीसही चकित
vasai fort, compound fencing on vasai fort
वसई किल्ल्याभोवती संरक्षक जाळ्यांचे कुंपण, गैरप्रकार रोखण्यासाठी पुरातत्व विभागाच्या उपाययोजना
Leopard in Vasai Fort area fear among citizens
वसई किल्ला परिसरात बिबट्याचा वावर… नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाकडून शोध सुरू

राणीवसा /राणी महाल

राजधानीच्या किल्ल्यात राजनिवासाजवळच, पण वेगळी इमारत राणी महालासाठी बांधलेली दिसते. रायगडावर महाराजांच्या निवासस्थानामागील बाजूस सहा वास्तूंचे चौथरे आहेत त्यांना राणीवसा म्हणून ओळखले जाते. तो राणीवसा आहे की नाही हा वादाचा विषय असला तरी रायगडावर राण्यांसाठी वेगळी वास्तू होती हे नक्की आहे. गाविलगड, नरनाळा, कंधार या किल्ल्यांवर राणी महाल वेगळे बांधलेले आढळतात. हे तीनही किल्ले मुस्लीम शासकांकडे असल्यामुळे या महालांची रचना इस्लामी वास्तुशास्त्राप्रमाणे आढळते. नरनाळा आणि गाविलगडावरच्या राणी महाल हा घुमट, कमानी यांनी सुशोभित केलेला आहे. कंधार किल्ल्यावरील राणी महाल तीन मजली आहे. महालात तांब्याच्या पाइपने पाणी खेळवलेलं आहे. राजमहाल आणि राणी महाल प्रवेशद्वार, तटबंदी यांनी मुख्य किल्ल्यापासून वेगळे केलेले असतात.

हवामहाल

उन्हाळ्याच्या दिवसात राजघराण्यातील लोकांना थंडावा मिळावा यासाठी राजवाडय़ाबाहेर हवामहाल बांधले जात. हवामहालाचे वैशिष्टय़ म्हणजे हा महाल दगडात बांधलेला असे. त्याचे छतही दगडी असे. महालात हवा खेळती राहण्यासाठी मोठय़ा खिडक्या आणि झरोके ठेवलेले असतात. हे महाल किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर, तलाव, विहीर, खंदक यांच्या काठी हवेशीर जागी बांधले जात. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसातही थंडावा मिळत असे. देवगिरी, वेताळवाडीचा किल्ला, धारुर, इत्यादी अनेक किल्ल्यांवर आपल्याला हवामहाल पाहायला मिळतात. देवगिरी किल्ल्यावर सर्वोच्च माथ्याच्या थोडासा खाली ‘बारदरी’ हा हवामहाल आहे. धारुर किल्ल्यात एका बाजूला पाण्याने भरलेला खंदक आणि दुसऱ्या बाजूला कृत्रिम तलाव यांच्या मध्ये तटबंदीत हवामहाल बांधलेला आहे. या ठिकाणी दोन्ही बाजूच्या पाण्यावरून येणाऱ्या गार वाऱ्यामुळे हवामहालात थंडावा मिळतो. वेताळवाडी किल्ल्याच्या उत्तर टोकावर बारदरी नावाची दोन कमान असलेली इमारत आहे.

जलमहाल

उन्हाळ्याच्या दिवसात राजघराण्यातील लोकांना थंडावा मिळावा यासाठी राजवाडय़ाबाहेर हवामहाल बांधले जात, तसेच जलमहालही बांधले जात. जलमहालाचं वैशिष्टय़ म्हणजे ते पाण्याच्या साठय़ाच्या जवळ बांधले जात. बऱ्याच ठिकाणी हे महाल जमिनीच्या खाली बांधलेले आढळतात. त्यामुळे बाहेरील उन्हामुळे हे महाल तापत नसत. थंडावा राहण्यासाठी हे महालही पूर्ण दगडात बांधलेले आहेत. या महालांना फक्त पाण्याच्या बाजूला खिडक्या आणि झरोके ठेवलेले असत. जेणेकरून पाण्यावरून येणारी गार हवा महालात यावी. नळदुर्ग, कंधार, औसा, नगरधन इत्यादी किल्ल्यांवर जलमहाल पाहायला मिळतात. नळदुर्ग किल्ल्यावर पात्र वळवून संपूर्ण किल्ल्याला खंदक निर्माण केला आहे. या नदीवर एक बंधारा बांधला आहे. या बंधाऱ्याच्या आतमध्ये जलमहाल बांधलेला आहे. नांदेडजवळच्या कंधार आणि नागपूरजवळच्या नगरधन किल्ल्यातील विहिरीवर जलमहाल बांधलेले आहेत. विहिरीतल्या पाण्यावरून येणाऱ्या हवेमुळे इथे थंडावा जाणवतो.

याशिवाय आरसेमहाल, रंगमहाल, चित्रशाळा इत्यादी इमारतीही किल्ल्यांवर बांधलेल्या पाहायला मिळतात. एखाद्या राजवटीला एखाद्या ठिकाणी बराच काळ स्थैर्य मिळाले असेल तर अशा प्रकारच्या महालांची निर्मिती केलेली पाहायला मिळते.

30-lp-11112016

दारूकोठार

दारूकोठार ही दगड आणि चुना वापरून बांधलेली पक्की इमारत असते. यदाकदाचित दारूकोठारावर शत्रूचा तोफेचा गोळा पडला तरी त्याचे नुकसान होऊ नये यासाठी इमारतीच्या िभतींची जाडी एक ते दीड मीटर ठेवलेली असते. जमिनीला ओलावा येऊ नये यासाठी दारूकोठाराच्या वास्तूचा चौथरा जमिनीपासून चार ते पाच फूट उंच उचलून जमिनीची फरबंदी केलेली असते. दारूकोठारात उजेडासाठी अग्नी (मशाल, दिवा, टेंभा इत्यादी) नेणे शक्य नव्हते. त्यामुळे दारूकोठारात उजेड येण्यासाठी खिडक्या ठेवलेल्या असत. बंदुका आणि तोफेकरिता लागणारी दारू लाकडी पेटय़ा आणि चामडय़ाच्या थल्यांमध्ये ठेवली जात असे. या दारूच्या पेटय़ा कोठारात लाकडाची घडवंची बनवून त्यावर ठेवल्या जात असत. दमट ओलसर हवेमुळे दारू ओलसर होऊन खराब होऊ नये यासाठी ती वरचेवर उन्हात सुकवली जात असे.

१८१८ साली मराठे आणि इंग्रज यांच्यात रायगडावर झालेल्या युद्धात इंग्रजांनी पोटल्याच्या डोंगरावरून तोफा डागल्या होत्या. त्यात रायगडावरील दारूकोठार उद्ध्वस्त झाल्यामुळे युद्धाचे पारडे फिरले होते.  इतिहासात अनेक युद्धांत दारूकोठार उद्ध्वस्त झाल्याने युद्धाचे पारडे फिरलेले आपल्याला पाहायला मिळते. दारूकोठार किल्ल्यावरील वस्तीजवळ असल्यास मोठय़ा प्रमाणावर मनुष्यहानी होण्याची शक्यता असते. त्यामुळे दारूकोठार नेहमी किल्ल्यावरील वस्ती, सदर आणि तटबंदीपासून दूर बांधले जात असत. शत्रूच्या तोफेच्या माऱ्यात न येणाऱ्या भागात दारूकोठाराची बांधणी केलेली पाहायला मिळते.

अंबरखाना (धान्यकोठार)

सन्य पोटावर चालते अशी म्हण आहे. एखादा किल्ला दीर्घकाळ लढवण्यासाठी जशी दुर्दम्य इच्छाशक्तीची गरज असते तसेच सन्याला अन्न आणि पाण्याचीही गरज असते. युद्ध, दुष्काळ अशा आणीबाणीच्या काळात धान्याचा साठा अपुरा पडू नये यासाठी किल्ल्यांवर धान्यकोठारे बांधली जात. धान्यकोठारांच्या इमारती वस्तीजवळ आढळून येतात. किल्ल्याचा घेर मोठा असल्यास एकापेक्षा धान्यकोठार बांधलेली पाहायला मिळतात. धान्यकोठारांच्या इमारती दगड, विटा, चुना याने बांधलेल्या पक्क्या इमारती असतात. या इमारतींचे छतही पक्के असते. यात हवा खेळती राहण्यासाठी खिडक्या आणि छताला झरोके असतात. जमिनीला ओलावा येऊ नये यासाठी धान्य कोठाराच्या वास्तूचा चौथरा जमिनीपासून चार ते पाच फूट उंच उचलून जमिनीची फरसबंदी केलेली असे. लाकडी पाटांवर धान्याची पोती रचून ठेवलेली असतात. पन्हाळा किल्ल्यावरील गंगा, यमुना, सरस्वती ही तीन धान्य कोठारं प्रसिद्ध आहेत. याशिवाय पट्टा (विश्रामगड) किल्ल्यात गुहेमध्ये कातळात खोदलेली धान्यकोठारं पाहण्यासारखी आहेत. भर पावसातही ती कोरडीठाक असतात.

देऊळ

प्रत्येक किल्ल्याची देवता असते जशी शिवनेरीची शिवाई देवी, रायगडाची शिर्काई, मंगळगडावरची कांगोरी देवी या गडदेवीचे मंदिर गडावर असते. याशिवाय अनेक किल्ले ऋषींची तपोभूमी म्हणून ओळखले जातात. त्यांची मंदिरेही किल्ल्यांवर पाहायला मिळतात. उदाहरणार्थ मरकडेय ऋषींचे देऊळ मरकडय़ा, कपिल मुनींचा आश्रम अंकाई इत्यादी. याशिवाय मुख्यत्वे शंकराची मंदिरे गडावर पाहायला मिळतात. किल्ल्यावर गुहा मंदिरे आणि घडीव दगडात बांधलेली मंदिरे अशी दोन प्रकारची मंदिरे पाहायला मिळतात. याशिवाय हनुमान, क्षेत्रपाल यांच्या मूर्ती उघडय़ावर ठेवलेल्या असतात.

31-lp-11112016

मशीद

इस्लाम धर्मामध्ये मशिदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलाही प्रदेश, किल्ला जिंकल्यावर इस्लामी आक्रमक प्रथम प्रार्थनेसाठी मशीद बांधत. त्यामुळे किल्ला जिंकल्यावर बऱ्याचदा मशिदी बांधल्या गेल्या. त्यामुळे या मशिदींच्या बांधकामात किल्ल्यावरील वास्तूंचेच दगड पाहायला मिळतात. माहूर किल्ल्यावरील मशिदीतील खांब मशिदीवरील कोरीवकाम केलेले दगड पाहिले की या ठिकाणी पूर्वी मंदिर होते व त्यात फेरबदल करून मशीद बनवल्याचे पाहायला मिळते. कंधार किल्ल्यातील राष्ट्रकूट व काकतीय राजवटीच्या काळातील शिवमंदिराचे मशिदीत रूपांतर केलेले पाहायला मिळते. मशिदीत पश्चिमेस असलेल्या िभतीला मेहराब म्हणतात. या पूर्वाभिमुख िभतीकडे तोंड करून नमाज पढला जातो. मशिदीची रचना इस्लामी शैलीप्रमाणे कमान आणि घुमटांनी बनलेली असते. मशिदीसमोर नमाज पढण्यासाठी कमानदार ओवऱ्या असतात. बांग देण्यासाठी मशिदीच्या दोन बाजूला मनोरे असतात. नमाजापूर्वी वजू करण्यासाठी मशिदीसमोर हौद असतो.

दर्गा

किल्ल्यावर घुमट असलेली दग्र्याची इमारत पाहायला मिळते. यात पिराचे थडगे असते.

स्तंभ, मिनार, मनोरे

रायगड किल्ल्याच्या बालेकिल्ल्यात गंगासागर तलावाच्या बाजूला तीन स्तंभ आहेत. किल्ल्यावरच्या शिलालेखातही त्याचं वर्णन ‘स्तंभ: कुंभिगृहे नरेंद्र सदनरभ्रंलिहे मीन्हीते’ अशा प्रकारे करण्यात आले आहे. तीन स्तंभांपकी दोन स्तंभ द्वादशकोनी असून एक अष्टकोनी आहे. तीन मजली उंच असलेल्या या स्तंभांमध्ये तांब्याचा पाइपामधून पाणी खेळवलेले आहे.

खरं तर स्तंभ म्हणजेच मनोरे, मिनार ही इस्लामी स्थापत्यकलेतील रचना आहे. नमाजाच्या वेळा समजाव्यात म्हणून मशिदीवरून बांग दिली जाते. ही बांग सर्वदूर ऐकू जावी यासाठी मशिदीला लागून उंच मिनार बांधले जातात. हेच मिनार इस्लामी स्थापत्यकलेत वेगवेगळ्या प्रकारे वापरलेले पाहायला मिळतात. मिनार म्हटल्यावर चटकन आठवणाऱ्या वास्तू म्हणजे ताजमहाल, चारमिनार इत्यादी. रायगडावरील स्तंभांची रचना त्यातील खोल्यांमधील घुमटाकार छत, खिडक्या आणि त्यात खेळवलेले पाणी या सर्वावर इस्लामी वास्तुशैलीची छाप आहे. महाराष्ट्रातील देवगिरी किल्ल्यावर १०० मी. उंचीचा एक मनोरा आहे. इ.स १४३५ च्या वेळी सुलतान अहमदशहा याने गुजरातच्या स्वारीच्या विजयाप्रीत्यर्थ हा मनोरा बांधला असे म्हणतात. चाँदमिनार या नावाने हा मनोरा ओळखला जातो.

जवाहरखाना / तिजोरी

राजाकडील किमती जवाहीर, रत्ने, सोने नाणे, दागिने, किमती वस्तू इत्यादी ठेवण्यासाठी जवाहरखान्याची निर्मिती केलेली असते. जवाहरखान्यात मौल्यवान व किमती वस्तू असल्यामुळे त्याचे स्थान अत्यंत सुरक्षित ठिकाणी म्हणजेच राजवाडय़ाच्या परिसरात असते. ते ठिकाण गुप्त असणे आवश्यक असल्यामुळे ते तळघरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळेच असेल महाराष्ट्रातील किल्ल्यांवर जवाहीरखाना अशी वेगळी वास्तू दाखविण्यात येत नाही. दुर्गदुग्रेश्वर रायगड या पुस्तकात प्र. के. घाणेकर यांनी रायगडावर शिवाजी महाराजांच्या निवासस्थानाजवळ तळघरात  खलबतखाना म्हणून जे ठिकाण दाखवतात तो जवाहरखाना असावा असे मत मांडले आहे. त्याची कारणमीमांसा पटण्यासारखी आहे.

कंधार किल्ल्यात महाकाली बुरुजात भुयारवजा खोली आहे तिला तिजोरी या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी खजिना ठेवला जात असे असे सांगितले जाते. या वास्तूचे अरुंद प्रवेशद्वार तीन फूट बाय दोन फूट असून आत गेल्यावर १५ फूट बाय सात फूट आणि दहा फूट उंच दालन आहे. याव्यतिरिक्त कुठल्याही किल्ल्यावर जवाहरखाना म्हणून जागा दाखवली जात नाही. पण फुकटच्या धनाच्या लोभाने गावोगावी किल्ल्यावरील वास्तू खणून काढलेल्या पाहायला मिळतात.

खलबतखाना

राजाला महत्त्वाच्या गुप्त बठकी घेण्यासाठी खलबतखान्याची निर्मिती केलेली असते. खलबतखाना राजवाडय़ात किंवा राजवाडय़ाला लागून असतो.

पोथीशाळा

राजशकट चालवण्यासाठी विविध धर्मग्रंथांचा आधार घेतला जातो. त्या त्या काळात निर्माण झालेले ग्रंथ, राजाच्या इतिहासकारांनी लिहिलेले दस्तऐवज इत्यादी ठेवण्यासाठी पोथीशाळांची निर्मिती केली जात असे. याचे स्थानही राजवाडय़ाच्या परिसरातच असे.

कुंभिगृह , गजशाळा (हत्तीखाना)

हत्तीचा उपयोग युद्धात आणि राजाचे ऐश्वर्य दाखवण्यासाठी होत असे. गडावर हत्ती ठेवण्यासाठी हत्तीखान्याची निर्मिती केली जात असे. हत्तीखान्याची इमारत पक्की बांधलेली असे. हत्ती आत- बाहेर येण्यासाठी मोठी प्रवेशद्वारे. हत्तींच्या मलमूत्रांचा निचरा होण्यासाठी उतार असलेली पक्की जमीन, हत्ती बांधण्यासाठी लोखंडी खांब या गोष्टी गजशाळेत पाहायला मिळतात. हत्तीची निगा राखणारे, माहूत यांचीही राहण्याची सोय हत्तीखान्याच्या परिसरात केली जात असे. हत्तीला चढवायचा साजशृंगार, अंबारी इत्यादी साहित्य ठेवण्यासाठी गजशाळेजवळ एखादे भांडारगृहही असेल. आज अशा प्रकारची रचना असलेली गजशाळा महाराष्ट्रातील किल्ल्यांवर तरी दिसत नाही. रायगड किल्ल्यावर गजशाळा होती. शिलालेखात कुंभिगृह असा उल्लेखही येतो. पण आज रायगडावर असलेली गजशाळा वरील वर्णनाशी मेळ खात नाही.

टांकसाळ

प्रत्येक राजा आपली नाणी तयार करत असे. या नाण्यांसाठी तांबे, चांदी, सोने इत्यादी धातू वापरले जात. ही नाणी तयार करण्यासाठी टांकसाळ किल्ल्यावर असे. टांकसाळीत तयार केलेली नाणी, त्यासाठी वापरला जाणारा धातू या सगळ्यासाठी आवश्यक असणारी सुरक्षितता बालेकिल्ल्यात मिळत असे. त्यामुळे टांकसाळ राजवाडय़ाच्या परिसरात बांधली जात असे. रायगड किल्ल्यावर सध्या जी जागा टांकसाळ म्हणून दाखवतात त्यात शौचकूप आहेत. या अरुंद जागेत टांकसाळ असण्याची शक्यता नाही. नाशिक जिल्ह्य़ातील चांदवड किल्ल्यावर होळकरांनी त्यांची नाणी पाडण्यासाठी टांकसाळ बांधली होती.

कैदखाना

किल्ल्यावर कैदी ठेवण्यासाठी कैदखाना बांधलेला असतो. कंधार किल्ल्यावर असे बारा कैदखाने पाहायला मिळतात. फांजीला लागून असलेल्या या कैदखान्याला वरच्या बाजूला पाण्याचा टाकीला असते तसे गोल तोंड आहे. बाकी सर्व बाजूंनी खोली बंद आहे. कैद्याला गोल तोंडातून आत सोडले जात असे. त्याला अन्न आणि पाणीही तेथूनच दिले जात असे. रायगडावर महाराजांच्या निवासस्थानाच्या खालच्या बाजूला कैदखाना दाखवला जातो. पण राजनिवासाच्या एवढय़ा जवळ कैदखाना असण्याची शक्यता फारच कमी आहे. रायगडावर न्यायनिवाडा करण्यासाठी आणल्या जाणाऱ्या कैद्यांसाठी तात्पुरता कैदखाना असू शकतो. रायगडच्या प्रभावळीत असलेल्या किल्ल्यांवर कैदखाने होते असा उल्लेख आहे.

हमामखाना

हमामखाना म्हणजे आंघोळीची जागा. ही पण मध्यपूर्वेतील संकल्पना आणि वास्तू इस्लामी राज्यकर्त्यांबरोबर आपल्याकडे आली. यात दोन प्रकारचे हमामखाने पाहायला मिळतात. एक राजघराण्यातील लोकांसाठी आणि दुसरा सामान्य लोकांसाठी. महाराष्ट्रातील फार कमी किल्ल्यांवर हमामखान्याचे अवशेष पाहायला मिळतात. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी वस्तुसंग्रहालयाच्या मागे शाही हमामखाना आहे. बहादूरपूर किल्ल्यावर हमामखान्याचे अवशेष आहेत. कंधार किल्ल्यावर राजघराण्यातील लोकांसाठी आणि सामन्य लोकांसाठी असे दोन हमामखाने आहेत.

घोडय़ाच्या पागा

किल्ल्यावर असणाऱ्या राजाच्या घोडदळासाठी घोडय़ाच्या पागा बांधल्या जात. या पागांजवळ घोडय़ांचा खरारा करणाऱ्यांची राहाण्याची सोय केली जात असे. घोडय़ाला चढवायची खोगीरे, लगाम, चारा, वैरण इत्यादी साहित्य ठेवण्यासाठी पागांमध्ये एखादे भांडारगृहही बांधले जात असे. कंधारसारख्या काही किल्ल्यांवरील पक्क्या पागा आजही पाहता येतात. काही डोंगरी किल्ल्यांवर अध्र्या उंचीवर असलेल्या गुहांचा जुन्या पुस्तकांमध्ये पागा म्हणून उल्लेख आलेला आहे. पण त्या टेहळणीच्या गुहा असून अशा अडचणीच्या जागी पागा असण्याची सुतरामही शक्यता नाही.

सदर /कचेरी

किल्ल्यावर आजूबाजूच्या भागातील महसूल, शेतसारा जमा होत असे. तसेच गडावरच्या इतर गोष्टींची नोंद ठेवण्यासाठी सदर किंवा कचेरीची इमारत गडावर असते. राजधानीच्या किंवा मोठय़ा किल्ल्यांवर ही इमारत प्रवेशद्वाराजवळ असते. जेणेकरून कामासाठी आलेल्या माणसाला किल्ल्यावर टेहळणी करण्याचा मोका मिळू नये.

दरबार

किल्ल्यावर दरबाराची वेगळी इमारत राजवाडय़ाच्या परिसरात असे. महत्त्वाच्या प्रसंगी दरबार भरवला जाई. रायगडावरील दरबाराची इमारत कौलारू होती. इस्लामी राज्यकर्त्यांनी दरबार ए खास आणि दरबार ए आम असे दोन दरबार भरवण्यास सुरुवात केली.

बाजारपेठ

किल्ल्यावर बाजारपेठ असेल का हा प्रश्नच आहे कारण बाजारात येणाऱ्या बाजारबुणग्यांमुळे किल्ल्याची टेहळणी होणे, किल्ल्यावरच्या बातम्या बाहेर जाणे सहज शक्य होते. तसेच बाजारपेठेत माल विकण्यासाठी, घेण्यासाठी आल्याचे भासवून शत्रूच्या हेरांकडून दगाफटका, गोंधळ होण्याचा संभव होता. त्यामुळे कुठलाही शहाणा राजा आपल्या किल्ल्यावर बाजारपेठ वसवणार नाही. वसवली तरी किल्ल्याच्या बाहेर किंवा पायथ्याशी वसवेल. छत्रपती शिवाजी महाराजांचं हेर खातं अतिशय सक्षम होतं. त्यामुळे त्यांना हेरांच्या सर्व खाचाखोचा माहिती होत्या, असा राजा आपल्या राजधानीच्या किल्ल्याच्या मधोमध बाजारपेठ वसवेल का हा विचार करण्यासारखा विषय आहे. मग किल्ल्यांवर बाजारपेठा नव्हत्या का? ज्या ठिकाणी राजधानीचे नगर वसवलेले होते अशा नगर किल्ल्यांमध्ये अशा प्रकारच्या बाजारपेठा होत्या.

आपण लहानपणापासून ज्या गोष्टी वाचतो त्यात आटपाट नगर असते. ते आटपाट नसून आठपाट आहे. हे नगर वसवताना त्याची आठ दिशांना आठ भागांत विभागणी केली जात असे. उत्तरेत विद्वान, ब्राम्हण, संन्यासी, ईशान्येला दूध, फळांचे व्यापारी, पूर्वेला सरकारी अधिकारी, आग्नेयेला सोनार, लोहार, तांबट हे अग्नीशी संबंधित काम करणारे व्यावसायिक, दक्षिणेस वैश्य, सावकार, सुतार, नर्ऋत्येला पशुपालन करणारे, कोळी, चांभार, कुंभार, पश्चिमेस सनिक, कारकून इत्यादी, वायव्य कोतवाल, किल्लेदार इत्यादी अशा प्रकारे आठ दिशांना आठ पाट वसवून मध्यभागी तटबंदीच्या आत राजनिवास असे. या नगरालाही बाहेरून तटबंदी असे. अशा प्रकारे बाजारपेठा वसवल्या जात.

सराई, धर्मशाळा

व्यापारी, संन्यासी, कामकाजासाठी येणारी माणसे यांच्या निवासासाठी सराई, धर्मशाळा बांधल्या जात. संरक्षणाच्या दृष्टीने या किल्ल्यांवर न बांधता किल्ल्यांच्या बाहेर बांधल्या जात. देवगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी मागच्या बाजूला सराई आहे. अजिंठय़ाला सराई आहे.

तेल तुपाचे टाके

खरंतर ही इमारत नाही. पण तेल आणि तूप साठवण्यासाठी घडीव दगडांची टाकी बांधलेली आपल्याला पाहायला मिळतात. किल्ल्यावर रात्रीच्या वेळी दिवाबत्ती करण्यासाठी तेलाची आणि तुपाची आवश्यकता भासे. तसेच युद्धात झालेल्या जखमा भरण्यासाठी गाईचे जुने तूप वापरले जात असे. नरनाळा किल्ल्यात आपल्याला तेल-तुपाचे टाके पाहायला मिळते.

आज दुर्दैवाने किल्ल्यावरच्या या सर्व वास्तू एकाच किल्ल्यावर पाहायला मिळत नाहीत. पण जसजसे आपण जास्त किल्ले फिरत जातो त्या वेळी  किल्ल्यावरच्या पडक्या वास्तूंचे अवशेष आपल्याशी बोलायला लागतात.

(उत्तरार्ध)
अमित सामंत – response.lokprabha@expressindia.com