ठाणे वाहतूक पोलिसांचा निर्णय; शहरातील कोंडी दूर करण्याचा प्रयत्न

ठाणेकर प्रवाशांना तात्काळ रिक्षा उपलब्ध व्हावी म्हणून शहरातील चौकात तसेच नाक्यावर रिक्षा थांबे उभारण्यात आले आहेत, मात्र या थांब्यांवरील काही चालकांच्या बेशिस्तपणामुळे वाहतूक कोंडीत भर पडू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूक पोलिसांनी शहरात नव्याने सर्वेक्षण करून त्याआधारे रिक्षा थांबे उभारण्याचे नियोजन सुरू केले आहे. नव्या थांब्यांवर रिक्षा एका रांगेत उभ्या राहाव्यात आणि उर्वरित रस्ता वाहतुकीसाठी खुला राहावा, यासाठी थांब्यांजवळ लोखंडी रेलिंग टाकण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून ठाणे शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसला असून त्यातून ठाणेकरांची सुटका करण्यासाठी वाहतूक पोलिसांकडून वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. ठाणे वाहतूक शाखेचे नवे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी शहरातील वाहतूक व्यवस्थेचा गेल्या काही दिवसांपासून सविस्तर अभ्यास सुरू केला असून त्यामध्ये शहरात कोंडी होण्यामागची कारणे शोधण्यात येत आहेत.

या अभ्यासादरम्यान शहरातील चौक तसेच नाक्यांवर असलेल्या रिक्षा थांब्यांवर एका रांगेत वाहने उभी केली जात नसल्याने या भागातील वाहतुकीस अडथळा होत असल्याची बाब त्यांच्या निदर्शनास आली आहे. त्यामुळे शहरात नव्याने सर्वेक्षण करून त्याआधारे रिक्षा थांबे उभारण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

रिक्षा चालकांना एकच रांग लावण्याचे निर्देश

खोपट परिसरात महानगर गॅसच्या पंपावर सीएनजी भरण्यासाठी कार आणि रिक्षांसाठी दोन रांगा लागतात. या रांगा रस्त्यावर लागत असल्यामुळे वाहतुकीसाठी पुरेसा रस्ता शिल्लक राहत नाही. त्यामुळे या पंपाच्या चालकांना एकच रांग करण्याचे आदेश दिले आहेत. पंपावर गॅस भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांची पर्यायी व्यवस्था करण्याची जबाबदारी पंपचालकांची आहे. त्यामुळे त्यांनी जागा भाडय़ाने घ्यावी किंवा अन्य काय करावे हा त्यांचा निर्णय आहे. मात्र, शहरातील वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून पंपचालकांना अशा प्रकारचे आदेश दिले आहेत, अशी माहितीही उपायुक्त पालवे यांनी दिली.

ठाणेकर प्रवाशांना तात्काळ रिक्षा उपलब्ध व्हावी म्हणून शहरात उभारण्यात आलेल्या रिक्षा थांब्यांमुळे वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे शहरातील रिक्षा थांब्यांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार असून त्याआधारे नवीन रिक्षा थांबे उभारण्यात येणार आहेत. या थांब्यांवर लोखंडी रेलिंग करण्यात येणार असून त्यामुळे रिक्षा एकाच रांगेत उभ्या राहतील. तसेच थांब्यांवर बेशिस्तपणे रिक्षा उभ्या करणाऱ्या चालकांनाही शिस्त लागेल आणि रिक्षा थांब्यांमुळे शहरातील वाहतुकीसही अडथळा निर्माण होणार नाही.

-संदीप पालवे,  उपायुक्त