मृतांची संख्या १२; नुकसानीचे पंचनामे
भीषण स्फोटानंतर प्रोबेस एन्टरप्रायझेस कंपनीच्या आवारात राष्ट्रीय आपत्ती व निवारण पथकाने सुरू केलेले ढिगारे उपसण्याचे काम शनिवारी रात्री पूर्ण झाले. शनिवारी सकाळी ढिगाऱ्याखालून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यामुळे स्फोटात मरण पावलेल्यांची एकूण संख्या १२ वर गेली आहे.
राष्ट्रीय आपत्ती व निवारण पथकाचे ढिगारे उपसण्याचे काम पूर्ण झाल्याची घोषणा नायब तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी शनिवारी रात्री केली. प्रोबेस कंपनीच्या आवारात आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता वर्तवली जात होती. त्यामुळे परिसरात बघ्यांची, कामगारांच्या आप्त, नातेवाईकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. ढिगारे उपसण्याचे काम पूर्ण झाल्याने आणखी मृतदेह सापडण्याच्या शक्यतेला आता पूर्णविराम मिळाला आहे. प्रोबेस कंपनीच्या आवारातील ढिगारे व जळीत साहित्य हलविण्यात आल्याने कंपनी परिसर साफसूफ झाला आहे. एनडीआरएफच्या जवानांचे या वेळी उपस्थितांकडून कौतुक करण्यात येत होते.
२७६३ पंचनामे पूर्ण
स्फोटाने डोंबिवली परिसरातील अनेक इमारती, रहिवासी, व्यावसायिक यांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम महसूल विभागाकडून सुरू आहे.
गेल्या दोन दिवसांत महसूल विभागाने डोंबिवली परिसरात २ हजार ७६३ रहिवाशांच्या मालमत्तांच्या नुकसानीचे पंचनामे केले आहेत. हे काम सुरूच राहणार आहे, अशी माहिती नायब तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी दिली.