ठाणे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना मारहाण केल्याप्रकरणी सोमवारी मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह १० ते १२ कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अविनाश जाधव यांनी शनिवारी कार्यकर्त्यांसह फेरीवाल्यांना मारहाण केल्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात ठाणे नगर आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

एल्फिन्स्टन रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला १५ दिवसांत फेरीवाले हटविण्याची मुदत दिली होती. मात्र, तरीही मध्य रेल्वेच्या अनेक रेल्वे स्थानकांच्या परिसरात फेरीवाल्यांनी विळखा घातला होता. अखेर शनिवारी सकाळी मनसेचे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांनी १० ते १२ कार्यकर्त्यांसह ठाणे स्थानक परिसरातील फेरीवाल्यांना मारहाण केली होती. त्यानंतर ठाणे स्थानक परिसरात एकही फेरीवाला नसल्याचे चित्र दिसून आले होते. तसेच ठाणे रेल्वे स्थानकात गेल्या तीन दिवसांपासून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अविनाश जाधव यांच्यासह १० ते १२ कार्यकर्त्यांवर पोलिसांनी ठाणे नगर आणि नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सोमवारी या सर्व कार्यकर्त्यांना अटक केल्याचे परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांनी सांगितले.