पाटबंधारे विभागाचे आदेश
अपुऱ्या पावसामुळे मर्यादित असणारा जलसाठा २०१६च्या जुलैपर्यंत पुरविण्यासाठी ठाणे जिल्ह्य़ातील सर्वच प्राधिकरणांना दोन दिवस पुरवठा बंद ठेवण्याचे आदेश पाटबंधारे विभागाने दिल्याने पाणी संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत. सध्या सर्वच शहरांत १५ टक्के पाणी कपात लागू आहे. मात्र त्यात वाढ होण्याची चिन्हे आहेत.
पाटबंधारे खात्याचे आदेशानुसार एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाने गुरुवार आणि शुक्रवार पाणी बंद राहील. त्यानुसार बुधवारी रात्री १२ ते शुक्रवार रात्री १२ असा ४८ तास एमआयडीसीतर्फे पाणी सोडले जाणार नाही. शनिवारीही कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
एमआयडीसीतर्फे बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, डोंबिवली, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, ठाण्यातील कळवा-मुंब्रा, वागळे इस्टेट या परिसरातील औद्योगिक तसेच नागरी वसाहतींना पाणीपुरवठा केला जातो. एमआयडीसीच्या मुरबाड येथील बारवी धरणातून जिल्ह्य़ात प्रामुख्याने पाणीपुरवठा केला जातो.

आंध्रही आटलेले..
लोणावळ्यातील आंध्र धरणातून भिवपुरी येथील टाटाच्या वीजनिर्मिती केंद्रात वापरून उल्हास नदीच्या पात्रात सोडण्यात आलेले पाणी ठाण्यातील शहरांना पुरविले जाते. मात्र यंदा अपुऱ्या पावसामुळे आंध्र धरणाची पातळीही दरवर्षीच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे.

मीरा-भाईंदरमध्ये पाणीकपात
भाईंदर- येत्या बुधवार रात्रीपासून मीरा भाईंदर शहरात पाणीकपात लागू होत आहे. राज्यात कमी झालेल्या पावसाच्या पाश्र्वभूमीवर ही पाणीकपात लागू होत आहे. मीरा भाईंदरला एमआयडीसीकडून होणारा पाणीपुरवठा प्रत्येक आठवडय़ाच्या बुधवारी रात्री बारा वाजल्यापासून ते शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत अठ्ठेचाळीस तास बंद राहणार आहे. स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठाही गुरुवारी बंद राहणार आहे. शुक्रवारी रात्री नंतर पाणी पुरवठा पूर्वत झाल्यानंतरही दोन दिवस पाणी कमी दाबाने मिळणार असल्याने शहरात तीव्र पाणीटंचाई जाणवणार आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.