कडोंमपाकडून सर्वेक्षण; प्रार्थनास्थळे स्थलांतरित करण्याचा विचार
कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक कोंडीचा पेच सोडवून वाहनचालक व प्रवासी यांचा प्रवास जलद करण्यासाठी महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात केली असली तरी या दोन्ही शहरांत तब्बल १५२ बेकायदा धार्मिक स्थळे विकास आराखडय़ातील रस्ते किंवा आरक्षित भूखंडांच्या जागेवर उभी असल्याचे आढळून आले आहे. ही प्रार्थनास्थळे नियमित करता येणे शक्य नसल्याने ती अन्यत्र स्थलांतरित करण्यासाठी संबंधित व्यवस्थापनांशी चर्चा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. मात्र, हा विषय धार्मिक भावनांशी जुळलेला असल्याने हे संपूर्ण प्रकरण काळजीपूर्वक हाताळण्याचे आव्हान पालिका प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
महापालिकेने वर्षांनुर्वष रखडलेल्या विकास आराखडय़ातील रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे अशा रस्त्यांना अडथळे ठरणाऱ्या धर्मस्थळांचे सर्वेक्षण पालिकेच्या आठही प्रभागांमध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार विकास आराखडय़ातील रस्ते आणि आरक्षित जमिनींवर १५२ धर्मस्थळे अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले आहे. २००९ पर्यंत या अनधिकृत धर्मस्थळांची संख्या १७३ होती. बहुतेक मंदिरे स्थानिक संस्था-संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उभारली आहेत. मात्र, हे करताना कोणतीही परवानगी घेण्यात आली नसून आरक्षित भूखंड किंवा रस्त्यांचे कोपरे अडवून ही प्रार्थनास्थळे उभारण्यात आली आहेत. अशा प्रार्थनास्थळांमुळे परिसरात वाहतूक कोंडी होत असते. नागरीकरणामुळे वाहने वाढली आहेत. वस्ती वाढू लागली तशी ही धर्मस्थळे आता वाहतुकीलाच थेट अडथळा होऊ लागली आहेत. या धर्मस्थळांमध्ये साईबाबा मंदिर, गणेश मंदिर, दत्तमंदिर, दर्गा, मस्जिद, शंकर मंदिर, कलावतीआई मंदिर, मंगिरबाबा मंदिर, राम मंदिर, मोहटादेवी मंदिर, कालिका माता मंदिर, चर्च
बोहरी स्मशानभूमी, दुर्गामाता मंदिर अशा धर्मस्थळांचा समावेश आहे. कल्याण पश्चिमेतील जेतवननगर, गाळेगाव भागातील वन, सरकारी जमिनींवर धर्मस्थळे बांधण्यात आली आहेत. अग्निशमन केंद्र, बेघरांसाठी घरे, संक्रमण शिबिरे, तलाव, वाहनतळ, क्रीडांगण विस्तार अशा पालिकेच्या आरक्षित जागांवर ही धर्मस्थळे उभारण्यात आली आहेत. बहुतेक धर्मस्थळे तीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहेत, असे निरीक्षण अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे. ६८ धर्मस्थळे विकास आराखडय़ातील सार्वजनिक रस्त्याच्या कोपऱ्यांवर, काही ठिकाणी मध्यभागी बांधण्यात आली आहेत. सहा वर्षांपूर्वी शहरात १७२ अनधिकृत धर्मस्थळे होती. परंतु रस्तारुंदीकरण, पदपथ अशा कामांसाठी सुमारे २१ धर्मस्थळे त्यावेळी इतरत्र स्थलांतरित अथवा हटविण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आयुक्त ई. रवींद्रन यांनी रस्तारुंदीकरणावर सर्वाधिक भर दिला आहे. शहरातील मुख्य रस्त्यांसह गल्लीबोळातील रस्ते रुंद करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. एकही धर्मस्थळ नियमित करण्यासारखे नाही. ती मंदिरचालकांशी चर्चा करून, अन्यत्र स्थलांतरित करणे अन्यथा मूर्ती अन्यत्र ठेऊन धर्मस्थळ निष्कासित करण्याशिवाय पर्याय नाही, असे अधिकाऱ्यांनी सव्‍‌र्हेक्षण अहवालात म्हटले आहे. आयुक्त ई. रवींद्रन यांच्याशी संपर्क केला, त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

प्रशासनाने रस्तारुंदीकरणाचे कार्यक्रम हाती घेतले आहेत. वाढती वाहने आणि वाहतूक कोंडीचा विचार करून रस्तारुंदीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेच्या आठही प्रभागांमध्ये विकास आराखडय़ातील रस्त्यांना बाधीत होणाऱ्या धर्मस्थळांचे सर्वेक्षण सुरू आहे. रस्तारुंदीकरणात या धर्मस्थळांचा अडथळा येऊ नये म्हणून, धर्मस्थळ चालक, मालकांशी चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल.
संजय घरत, अतिरिक्त आयुक्त, कडोंमपा