कंपनीने पगार देण्यास नकार देऊन पारपत्रे जप्त केल्याने सौदी अरेबियात अडकून पडलेले कल्याण व पनवेल येथील दोन तरुण परराष्ट्र खात्याच्या प्रयत्नांमुळे अखेर भारतात परतले. काही दिवसांपासून हे तरुण भारतात परतण्यासाठी प्रयत्नशील होते. पण त्यांना कंपनीकडून सहकार्य मिळत नव्हते. समाज माध्यमांतून या विषयावर चर्चा सुरू झाल्यानंतर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या कामी पुढाकार घेतला आणि या तरुणांची सुटका झाली, अशी माहिती आमदार नरेंद्र पवार यांनी दिली.
विशाल खंडागळे हा कल्याण पूर्व भागात राहणारा, तर अझरुद्दीन हा पनवेल येथे राहणारा तरुण आहे. दोघेही यापूर्वी रिलायन्स कंपनीत नोकरी करीत होते.येथील नोकरी सोडल्यानंतर ते सौदी अरेबियात गेले होते.