कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीतील वर्दळीच्या मुख्य रस्त्यांवर २५ ते ३० ठिकाणी महिलांसाठी अत्याधुनिक प्रसाधनगृहे उभारणीचा निर्णय महापालिकेच्या महिला आणि बालकल्याण विभागाने घेतला आहे. या प्रकल्पासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. प्रसाधनगृह उभारणीचा प्रकल्प येत्या दोन महिन्यांत आकाराला येईल, या दृष्टीने महिला विभाग प्रयत्नशील आहे. मुख्य रस्त्यांवर महिलांसाठी सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या फारशा सुविधा नाहीत. यासंबंधी महिला वर्गाकडून सातत्याने तक्रारी प्राप्त होत होत्या. या तक्रारींची दखल घेत स्वच्छतागृहे उभारणीचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती कोमल पाटील यांनी दिली.
कल्याण, डोंबिवली परिसरातील महिला नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबई, नवी मुंबई भागात जातात. त्यांना रेल्वे स्थानकाव्यतिरिक्त कोठेही प्रसाधनगृहाची व्यवस्था नाही. रेल्वे स्थानकातील प्रसाधनगृहे अस्वच्छ असल्याने महिला त्या ठिकाणी जात नाहीत. नियमित बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या महिलांची तीच अडचण आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली शहरांतील मुख्य, वर्दळीच्या रस्त्यांवर महिलांसाठी प्रसाधनगृह उभारण्याची मागणी केली होती.
‘राइट टू पी’ अन्वये उच्च न्यायालयाने सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना सार्वजनिक प्रसाधनगृहे उभारण्याची सूचना केली आहे. महिलांची वाढती मागणी विचारात घेऊन शहरातील मुख्य रस्त्यांवर २५ ते ३० सार्वजनिक प्रसाधनगृहे (रेडिमेड) उभारण्यात येणार आहेत.  पाणी व मलनिस्सारणाची वाहिनी असलेली ठिकाणे या सुविधेसाठी निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या प्रसाधन गृहांची चांगली स्वच्छता, देखभाल व्हावी म्हणून एखाद्या संस्थेला हे काम देण्याचा विचार करण्यात येणार आहे.
ही प्रसाधनगृहे ५ ते १० या टप्प्याने विभागवार बसवण्यात येणार आहेत. ही प्रसाधनगृहे बसवताना स्थानिक महिला, नागरिकांच्या सूचनांची दखल घेण्यात येईल. ज्या ठिकाणी पाणी, मलनिस्सारणाची सुविधा नाही तेथे संरक्षित टाकी बांधून प्रसाधनगृहे बसवण्यात येतील. टिटवाळा भागात असा प्रश्न येऊ शकतो, असे सभापती पाटील यांनी स्पष्ट केले.

प्रसाधनगृहांच्या जागा
कल्याणमधील मुरबाड रस्ता, संतोषी माता रस्ता, पत्रीपूल ते दुर्गाडी रस्ता, कोळसेवाडी रस्ता, नेतिवली रस्ता, डोंबिवलीत घरडा सर्कल ते पाटणकर चौक (फडके चौक), फडके रस्ता, मानपाडा रस्ता, टंडन रस्ता, कोपर रस्ता, दीनदयाळ रस्ता, महात्मा फुले मार्ग, सुभाष मार्ग, महात्मा गांधी मार्ग, घन:श्याम गुप्ते मार्ग, व्ही. पी. रस्ता, कल्याण, डोंबिवली रेल्वे स्थानक.