स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तिजोरीवर कोणताही भार पडू नये आणि पायाभूत सुविधांचा विकास करत नव्या गृहसंकुलांची उभारणी व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने आखलेल्या विशेष नागरी वसाहतींमधील (स्पेशल टाऊनशिप) घरे दिवसेंदिवस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागल्याचे चित्र दिसू लागले आहे. मुंबई, ठाण्यासह राज्यातील वेगवेगळ्या भागांमधील बांधकाम क्षेत्रात मंदी असल्याची ओरड एकीकडे होत असताना घोडबंदर मार्गावर मुंबईतील एका प्रथितयश विकासकाने उभारलेल्या अशाच एका नागरी वसाहतीमधील ४१९ चौरस फूट क्षेत्रफळाच्या वन बीएचके घराची किंमत चक्क ९५ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील वेगवेगळ्या शहरांमध्ये राज्य सरकारने गेल्या काही वर्षांमध्ये विशेष नागरी वसाहतींच्या माध्यमातून मुंबईस्थित बडय़ा विकासकांच्या मोठय़ा गृह प्रकल्पांना हिरवा कंदील दाखविला आहे. कमीत कमी १०० एकरपेक्षा अधिक क्षेत्रफळ असलेल्या जमिनीचे करारपत्र दाखविल्यास अशा स्वरूपाच्या वसाहतींना परवानगी देण्यात येते. या धोरणानुसार ठाणे, कल्याण, शीळ पट्टय़ात लोढा, रुस्तमजी, हिरानंदानी, विजय ग्रुप, रिजन्सी यांसारख्या मोठय़ा विकासकांच्या प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. मोठाल्या इमारती उभ्या करत असताना त्या ठिकाणी राहावयास येणाऱ्या रहिवाशांना आवश्यक त्या सुविधा त्याच ठिकाणी उभ्या करून द्याव्यात, असा या वसाहतींच्या उभारणीमागील उद्देश आहे.  
राज्य सरकारच्या प्रयत्नांना साथ देत अनेक विकासक ठाणे पट्टय़ात टाऊनशिप उभे करत असले तरी, या वसाहतींमधील घरे दिवसेंदिवस महाग होत चालली आहेत. ठाण्यातील घोडबंदर मार्गावर नुकताच एका बडय़ा बिल्डरने विशेष नागरी वसाहतीचा प्रकल्प सुरू केला असून या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ६२० चौरस फुटाच्या (बिल्टअप) घराची नोंदणी किंमत ८२ लाखापर्यंत ठेवण्यात आल्याचे चित्र आहे. या मार्गावर खाडी किनारी एका पवईस्थित विकासकाने मोठी वसाहत उभी केली आहे. या वसाहतीत बहुतांश घरे ८०० ते १००० चौरस फुटांची असून त्यांची किंमत दीड कोटींच्या पुढे आहे. याच वसाहतीत वन बीएचके घरे असलेल्या दोन इमारती उभारण्यात आल्या आहेत. मात्र, या घरांची किंमतही ९५ लाखांच्या पुढे आहे. यात मूळ घराची किंमत ८५ लाख अशी असून नोंदणी प्रक्रियेसोबत इतर सुविधांसाठी थेट साडेनऊ लाख रुपयांचे दरपत्रक ग्राहकांच्या हाती ठेवले जात आहे. याच मार्गावरील इतर वसाहतींमधील घरांची किंमतही प्रति चौरस फुटाला १५ हजार रुपयांच्या घरात पोहचल्याने गगनचुंबी इमारतीचे इमले दिवसेंदिवस महाग होत असल्याचे चित्र पुन्हा पुढे आले आहे.

घरांच्या दरांची चढती कमान
* घराचे क्षेत्रफळ : ४१९ चौरस फूट (कार्पेट)
* घराची मूळ किंमत : ८५ लाख ६० हजार
* इतर शुल्क : साडेसात लाख (नोंदणी शुल्कासहित)
* देखभाल दुरुस्ती, क्लब सदस्यत्व, इतर सुविधा दर : दोन लाख १२ हजार