कल्याण-बदलापूर राज्य महामार्गाच्या रुंदीकरणात अडथळा ठरत असलेली अतिक्रमणे पाडण्यास बुधवारी सुरुवात करण्यात आली. रुंदीकरणास विरोध करत आक्रमक भूमिका घेणाऱ्या बेकायदा गाळेधारकांच्या विरोधाला धाब्यावर बसवून सकाळपासून नगरपालिका प्रशासनाने मोठय़ा फौजफाटय़ासह ही कारवाई सुरू केली. त्यास काही ठिकाणी विरोध करण्याचा प्रयत्न झाला असून पुढील दोन दिवस सुरू राहाणाऱ्या या मोहिमेला आणखी काही ठिकाणी प्रखर विरोधास सामोरे जावे लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ठाणे तसेच आसपासच्या परिसरातील पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी बोलविण्यात आला आहे.

*मुंबई महानगर विकास प्राधिकरणामार्फत जव्हार ते कर्जत – खोपोली या महामार्गाच्या उभारणीचे काम सुरू आहे. या महामार्गाचा काही भाग अंबरनाथ नगरपालिकेच्या हद्दीतून जातो.
*या ठिकाणी महामार्गाची रुंदी वाढविण्याचा आराखडा तयार करण्यात आला असून रस्त्याच्या कडेला असलेल्या बेकायदा गाळे धारकांनी मात्र त्यास विरोध केला होता.
*अंबरनाथ नगरपालिकेच्या चार किलोमीटरच्या हद्दीत येथे १०७३ अनधिकृत गाळे उभे राहिले आहेत. रस्ता रुंदीकरणासाठी हे गाळे पाडणे आवश्यक ठरले आहे.
*गाळे धारकांच्या विरोधामुळे तसेच न्यायालयीन स्थगितीमुळे हे गाळे पाडण्याचे काम रखडले होते. मात्र, न्यायालयाने यासंबंधी दिलेली स्थगिती उठविताच बुधवारी सकाळपासून हे बेकायदा गाळा हटविण्याची मोहीम सुरू करण्यात आली.

कारवाईला विरोध
अंबरनाथ येथील मटका चौक ते फॉरेस्ट नाका या दरम्यानची अतिक्रमणे पाडण्यात येणार असून सकाळी दहानंतर ही कारवाई सुरू झाली. यावेळी पोलिसांसह शीघ्र कृती दल असे दोनशे कर्मचाऱ्यांना बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले होते, अशी माहिती नगरपालिकेचे मुख्य अभियंता सावंत यांनी दिली. दरम्यान, अतिक्रमण कारवाई सुरू झाल्यानंतर काही व्यापाऱ्यांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला, परंतु पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यावेळी काही व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतल्यामुळे तहसीलदार कार्यालयाच्या भिंतीचा रस्त्यात येणारा भागहीतोडण्यात आला. रिक्षा युनियनचे कार्यालय तोडल्यामुळे रिक्षावाल्यांनी देखील सुरुवातीला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु तो अयशस्वी ठरला. अतिक्रमण कारवाई सुरू झाल्याने या रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. ही कारवाई अजून एक दिवस चालणार असल्याचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.