अंबरनाथ येथील शान एज्युकेशन ट्रस्टतर्फे अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या गार्डियन दंत महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाविरोधात अंबरनाथ नगरपालिकेने गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६नुसार अंबरनाथ पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिका लवकरच महाविद्यालयाच्या इमारतीवर कारवाई करणार असल्याने हे महाविद्यालय आता नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचा सगळ्यात मोठा फटका हा महाविद्यालयात शिकणाऱ्या ११८ विद्यार्थ्यांना बसणार आहे.
गार्डियन दंत महाविद्यालयाने पालिकेकडून बांधकाम परवानगी घेताना खोटे दस्तावेज सादर केले होते. ही बाब पालिकेच्या निदर्शनास आणत नगरसेवक पंढरीनाथ वारिंगे व मनोहर वारिंगे यांनी तक्रार केली होती. या तक्रारीवरून पालिकेने २५ जून २००८ रोजी महाविद्यालयाला दिलेली बांधकाम परवानगी १ सप्टेंबर २०१४ला रद्द केली. तसेच २०१४ च्या नोव्हेंबर महिन्यात महाविद्यालय व्यवस्थापनाने पुन्हा पालिकेला बांधकाम परवानगीसाठी सुधारित प्रस्ताव केला. परंतु पालिकेने तो नामंजूर केला होता.
त्यातच महाविद्यालय व्यवस्थापनाने २०१४ – १५ साठी प्रथम वर्षांला मान्यता नसतानाही ६७ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला. हा प्रवेशही अवैध झाल्याने या विद्यार्थ्यांचीही फसवणूक झाली आहे. त्यामुळे एकंदर बनावट कारभार करून पालिका व विद्यार्थ्यांची महाविद्यालय व्यवस्थापनाने दिशाभूल केली असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान, अंबरनाथ पालिकेचे क्षेत्रिय अधिकारी श्रीकांत निकुळे यांनी एमआरटीपी कायद्यांतर्गत महाविद्यालयाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.