१० दिवसांत कृती आराखडा ; रस्त्यावरील अतिक्रमणांवर कारवाई सुरूच
पदपथ आणि रस्त्यावरील अतिक्रमणांचा मुद्दा महापालिका प्रशासनाने गांभीर्याने घेतला असून त्याविरोधात गेले काही दिवस सातत्याने कारवाई सुरू आहे. या कारवाईत कुचराई झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे अनधिकृत धार्मिक स्थळांच्याबाबतीत येत्या दहा दिवसांत परिमंडळनिहाय कृती आराखडा तयार करून कार्यवाही प्रस्तावित करण्याचे आदेश सर्व उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना दिले.
गेल्या १५ ते २० दिवसांपासून शहरात पदपथावरील अतिक्रमणे हटविण्याची मोहीम सुरू आहे. या कारवाईत रस्त्यावरील तसेच नाल्यातील अडथळेही दूर केले जात आहेत. या कारवाईत कोणताही खंड पडू देऊ नका, अन्यथा कारवाई केली जाईल, अशी सक्त ताकीद आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिली आहे.
जाहिरात धोरणानुसार एखाद्या व्यक्तीने परवानगी न घेता पोस्टर्स अथवा बॅनर्स लावल्याचे लक्षात आल्यास त्या व्यक्तीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना त्यांनी सर्व परिमंडळ उपआयुक्त, उपआयुक्त (अतिक्रमण) आणि सर्व साहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत. विनापरवाना पोस्टर्स, बॅनर्स लावणाऱ्यांविरुद्ध कारवाई न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असेही महापालिका आयुक्तांनी या वेळी स्पष्ट केले.

७१४ पैकी १२७ प्रार्थनास्थळांवरच कारवाई
प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणानुसार ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण ७१४ अनधिकृत धार्मिक स्थळे असून त्यापैकी १२७ बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे. कारवाई करताना लोकमान्यता, पोलीस प्रशासन, वाहतूक विभाग, स्थानिक प्राधिकरणाचा अभिप्राय विचारात घेण्यात आला आहे. त्यानुसार त्यांची ‘अ’ आणि ‘ब’ अशा दोन गटांत वर्गवारी करण्यात आली आहे. ५८७ धार्मिक स्थळे नियमित करण्याबाबत प्रशासनाचे अनुकूल धोरण आहे. त्यांचा समावेश ‘अ’ वर्गात करण्यात आला आहे. उर्वरित १२७ धार्मिक स्थळे मात्र विविध कारणांनी डोकेदुखी ठरली आहेत. काहींमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे, तर काही वाहतुकीस अडथळा ठरली आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही धार्मिक स्थळे नियमित करता येणे शक्य नसल्याने प्रशासनाचे मत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार आहे.