अतिक्रमणविरोधी मोहिमेत राजकारण्यांचा हस्तक्षेप; पालिकेचीही माघार

ठाणे महापालिकेमार्फत बेकायदा बांधकामांविरोधात शहरभर मोठय़ा धडाक्यात कारवाई सुरु असताना कल्याण डोंबिवली महापालिकेने बुधवारपासून सुरू केलेल्या अशाच कारवाईत जागोजागी राजकीय नेत्यांचा अडसर उभा राहिल्याचे चित्र दिसून आले. ठाणे महापालिका हद्दीत कल्याण-शीळ रस्त्यावर येणारी बांधकामे भुईसपाट होताच इतकी वर्षे बघ्याची भूमिका घेणाऱ्या कल्याण महापालिकेनेही याच मार्गावर आपल्या हद्दीतील बांधकामांचे पाडकाम सुरू केले खरे, मात्र संघर्ष समिती आणि काही स्थानिक नेते आक्रमक होताच या कारवाईतून रस्त्यालगत असलेल्या काही बार, दुकानांना कारवाईतून वगळण्यात आले.

ठाण्यापाठोपाठ कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांमध्ये सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांवर कारवाई केली जाईल, असे चित्र मंगळवारपासून रंगविण्यात आले होते. त्यानुसार बुधवारी सकाळपासून कारवाई सुरू झाली. या कारवाईच्या पहिल्या टप्प्यात टाटा पॉवर ते डोंबिवली नागरी सहकारी बॅंक या विभागात अनेक लहान-मोठय़ा टपऱ्या, गॅरेज याबरोबरच काही दुकानांवर कारवाई करण्यात आली. गोळवली भागातील दुकानांवर कारवाई करून पालिकेचे पथक मानपाडा पोलीस ठाण्याच्या अलीकडे असलेल्या चंद्रहास बारजवळ येताच राष्ट्रवादीचे पदाधिकारी वंडार पाटील यांनी ही कारवाई थांबविण्यात यावी, अशी भूमिका घेत रस्त्यावर ठिय्या मांडला. कार्यकारी अभियंता सुनील जोशी यांनी यावेळी आपण आयुक्तांच्या सूचनेनुसार कारवाई करत असून ती सुरूच राहील असे सांगितले. महापालिकेच्या ठाम भूमिकेनंतरही वंडार पाटील यांनी कारवाई रोखून धरल्याचे चित्र या भागात दिसले.

दुसरीकडे २७ गावांतील संघर्ष समितीच्या नेत्यांनी कारवाई रोखावी यासाठी महापालिका आयुक्तांचे कार्यालय गाठले. आयुक्त ई रवींद्रन यांची गाठ घेत या नेत्यांनी ही कारवाई नियमाला धरून नसल्याचे सांगितले. काही ठिकाणी अनधिकृत शेड उभारले असतील तर तशा नोटिसा आम्हाला आधी देण्यात याव्यात अशी भूमिका मांडली. त्यावर आयुक्त ई रवींद्रन यांनी ३० मीटर रस्त्याच्या आत येणाऱ्या टपऱ्या व अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात यावी, अशा सूचना कर्मचाऱ्यांना दिल्या. मात्र, त्यामुळे या पट्टय़ातील काही बेकायदा बार, हॉटेल्सना अभय मिळाल्याचे चित्र दिसून आले.

भाजपच्या नगरसेवकाला सवलत

प्रभाग क्रमांक १०२ गोळवलीचे नगरसेवक रमाकांत पाटील यांचे जनसंपर्क कार्यालय रस्त्याला लागूनच आहे. रमाकांत पाटील यांनी हे कार्यालय स्वत हटवितो असे सांगितल्याने ते तोडण्यात आले नाही. इतर सर्वसामान्य नागरिकांना कोणतीही नोटीस न देता त्यांचे बांधकाम तोडले. मात्र भाजपाच्या नगरसेवकाला वेळ का देण्यात आला अशी चर्चा तेथे रंगली होती. याविषयी पाटील म्हणाले, चांगल्या कामासाठी ही कारवाई होत असून आमचा पाठिंबा आहे. कार्यालयाचे पत्रे हटवून पालिकेला रस्ता मोकळा करून देणार आहोत.

महापालिका कारवाईवर ठाम

भिवंडी बायपासला जोडणारा हा रस्ता सध्या ३० फूट असून तो ४५ फूट रुंद करण्यात येणार आहे. तीन दिवस ही कारवाई सुरू राहाणार असून या अंतर्गत येणाऱ्या बांधकामांवर कारवाई निश्चितच केली जाणार अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. बारविषयी कोणत्याही प्रकारे नरमाईची भूमिका घेण्यात आली नसून कागदपत्रांची तपासणी करूनच पुढील कारवाई केली जाणार आहे, असे महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

नेत्यांची भूमिका

२७ गाव परिसरात कोणत्याही सुविधा दिल्या गेल्या नाहीत. आमच्या लोकांना विश्वासात घेऊन ही कारवाई केली गेली पाहिजे, अशी भूमिका यावेळी राष्ट्रवादीचे नेते वंडार पाटील यांनी मांडली. २७ गावे पालिकेत समाविष्ट असली तरी त्यांची स्वतंत्र नगर परिषद करण्यासाठी आम्ही सध्या प्रयत्न करीत आहोत. असे असताना ही कारवाई योग्य नाही, अशी भूमिका संघर्ष समितीचे उपाध्यक्ष शिवराम गायकर यांनी मांडली.