कल्याण-डोंबिवली पालिका, पोलिसांच्या  बैठकीत निर्णय

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील पालिकेच्या राखीव जागा, वन विभाग, रेल्वे, सरकारी जमिनी व ‘एमएमआरडीए’च्या जमिनींवर बांधण्यात आलेली ४४ धार्मिक स्थळे जमीनदोस्त करण्याचा निर्णय पालिका, पोलीस आणि अन्य विभागांच्या अधिकाऱ्यांच्या  बैठकीत घेण्यात आला. पालिका हद्दीत रस्तारुंदीकरण करताना अनेक धार्मिक स्थळे रेल्वे स्थानकांना खेटून, वाहतुकीला अडथळा आणत आहेत. त्या धार्मिक स्थळांबाबत मात्र पालिका अधिकाऱ्यांनी सोयीस्कर मौन पाळले आहे.

डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानकाला खेटून भर रस्त्यात, रिक्षा वाहनतळाला अडथळा ठरेल अशा ठिकाणी एका भक्ताने झाडाचा आधार घेऊन  काही वर्षांपूर्वी एक मूर्ती झाडाखाली ठेवली. ती मूर्ती व स्थळ आता त्या भक्ताचे उपजीविकेचे साधन झाले आहे, अशी चर्चा आहे. पालिका अधिकाऱ्यांना हे स्थळ सीमेंट रस्ता तयार करताना अडथळा ठरत होते. या भक्ताला पालिकेने नोटिसा पाठविल्या. धार्मिक स्थळावर कारवाईची नोटीस बजावली. तरीही त्याचा कोणताही परिणाम झाला नाही.

अखेर पालिकेने त्या धर्मस्थळाच्या बाजूने रस्ता तयार केला. आता हे धर्मस्थळ रस्त्यात असल्याने वाहतुकीला मोठा अडथळा होत आहे. याविषयी आयुक्त पी. वेलरासू यांनी पुढाकार घेऊन या धर्मस्थळाबाबत विचार करावा, अशी मागणी फुले चौक ते दीनदयाळ चौकादरम्यान नेहमीच वाहतूक कोंडीत अडकणाऱ्या चालकांकडून केली जात आहे. पालिकेच्या ई, ह प्रभाग कार्यालयाकडून स्थानिक विष्णुनगर, मानपाडा पोलीस ठाण्यांना अनधिकृत बांधकामे तोडण्यासाठी पोलीस बंदोबस्त द्या म्हणून अनेक वेळा पत्र पाठविली आहेत. परंतु आवश्यक पोलीस बंदोबस्त मिळत नसल्याने या प्रभागांमधील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे पालिकेच्या या प्रभागाच्या प्रभाग अधिकाऱ्यांना शक्य होत नसल्याची माहिती आहे.

११ धार्मिक स्थळे यापूर्वीच उध्दवस्त

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतील धर्मस्थळांबाबत विचार करण्यासाठी आयुक्त पी. वेलरासू, पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या उपस्थितीत वन, एमएमआरडीए, रेल्वे अधिकाऱ्यांची एक संयुक्त बैठक झाली. या बैठकीत पालिकेने रस्ते वाहतुकीला अडथळा ठरणारी, आरक्षित जागेवर असलेली ११ धार्मिक स्थळे यापूर्वीच पालिकेने जमीनदोस्त केली आहेत. उर्वरित धर्मस्थळे वन विभाग, रेल्वे, एमएमआरडीएच्या जमिनींवर आहेत. या जमिनींवर स्थळांवर कारवाई करणे पालिकेला शक्य नसल्याने, पालिकेने संबंधित प्राधिकरणांना या धर्मस्थळांवरील कारवाईबाबत कळविण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईच्या वेळी आवश्यक पोलीस बंदोबस्त देण्यात येईल, असे आश्वासन पोलीस उपायुक्त डॉ. संजय शिंदे यांनी पालिका आयुक्तांना दिले.