२०० हातगाडय़ांवर कारवाई; पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत फेरीवालामुक्ती मोहीम

ठाणे महापालिकेची गेल्या चार महिन्यांपासून पावसामुळे थंडावलेली रस्ता रुंदीकरणाची मोहीम पुन्हा सुरू झाली आहे. ठाणे, कळवा, मुंब्य्रापाठोपाठ आता दिवा परिसरातही पालिकेने ही कामे हाती घेतली आहेत. त्यासाठी बुधवारी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्वत: दिव्यातील रस्त्यांवर उतरून १५० बेकायदा गाळे जमीनदोस्त केले. याशिवाय, २०० हातगाडय़ा तोडून दिवा स्थानक ते दातिवली चौक असा संपूर्ण परिसर फेरीवालामुक्त करण्यात आला. दिवा स्थानक ते साबे गाव या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी पालिकेकडून बेकायदा बांधकामांवर कारवाई सुरू होती.

ठाणे शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ते रुंदीकरण मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत ठाणे शहरातील पोखरण रस्ता क्रमांक-१ आणि २ चे रुंदीकरण करण्यात आले आहे. तसेच शहरातील अन्य परिसर, कळवा तसेच मुंब्रा या भागांतही रस्ते रुंद करण्यात आले आहेत. या कामांसाठी शेकडो बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून पावसाळ्यामुळे पालिकेची रस्ते रुंदीकरणाची मोहीम थंडावली होती. दरम्यान, मान्सूनचा काळ संपताच महापालिका प्रशासनाने आता पुन्हा ही मोहीम राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये ठाणे, कळवा, मुंब्रा या शहरांपाठोपाठ आता दिवा परिसरातील कारवाई सुरू झाली आहे. या कारवाईनंतर रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे, असे आदेश आयुक्त जयस्वाल यांनी नगर अभियंता अनिल पाटील यांना दिले आहेत. त्यानुसार त्यांनी या रस्त्याचे काम तात्काळ सुरू  केले आहे.

रखडलेल्या रस्त्याचे काम मार्गी

गेल्या काही वर्षांत दिवा शहरात मोठय़ा प्रमाणात बेकायदा बांधकामे झाली आहेत. त्यामुळे या भागाचे मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले आहे. दिवा स्थानक परिसरातून रोज मोठय़ा संख्येने प्रवासी ये-जा करतात. मात्र, या भागातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दिवा स्थानक ते दातिवली चौक या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम गेल्या पाच-सहा वर्षांपासून रखडले होते. बुधवारच्या मोहिमेमध्ये आयुक्त जयस्वाल यांनी या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून, त्यासाठी रस्त्याच्या कामात अडसर ठरणारे १५० बेकायदा गाळे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. स्थानकाजवळील तलावाभोवती अनधिकृत बांधकामे आणि हातगाडय़ांचा विळखा पडला होता. त्यावरही कारवाई करण्यात आल्यामुळे दिवा स्थानक ते दातिवली चौक परिसर मोकळा झाला आहे.