ठाणे स्थानक परिसरातील रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये बाधित होणारी बांधकामे हटविण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून हाती घेतली असून या मोहिमेमध्ये शुक्रवारी स्थानक परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जांभळी नाका या रस्त्यावरील दोन्ही बाजूच्या वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत जवळपास १७५ बांधकामे हटविण्यात आली असून, ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.
ठाणे स्थानक परिसर वाहतूक कोंडीमुक्त व्हावा तसेच नागरिकांना परिसरातील रस्त्यावर मोकळेपणाने फिरता यावे, यासाठी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी स्थानक परिसरातील रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामामध्ये बाधित होणारी बांधकामे हटविण्याची मोहीम महापालिका प्रशासनाने हाती घेतली आहे.
या मोहिमेंतर्गत गेल्या काही दिवसांपासून स्थानक परिसरातील रस्त्यालगतच्या वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे. या कारवाईत आतापर्यंत अशोक टॉकीज ते जांभळी नाक्यापर्यंतची बांधकामे हटविण्यात आली आहेत.