एमआयडीसीकडून पाणी घेण्यास मंजुरी

मीरा-भाईंदर शहरासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अतिरिक्त २५ दशलक्ष लिटर पाणी देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मीरा-भाईंदरसाठी भातसा धरणातील पाणी आरक्षित करण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु भातसा धरणाच्या पिसे बंधाऱ्यात पाण्यासाठी आरक्षण शिल्लक नसल्याने बारवी धरणातून २५ दशलक्ष लिटर पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला.

मीरा-भाईंदरच्या पाणीपुरवठय़ात वाढ होण्यासाठी भातसा धरणाच्या पायथ्याशी असलेल्या पिसे बंधऱ्यात पंचवीस दशलक्ष लिटर पाणी मीरा-भाईंदरसाठी आरक्षित ठेवण्यात यावे, अशी मागणी महापालिकेने केली होती. तसा ठरावदेखील नुकत्याच झालेल्या महासभेत संमत करण्यात आला होता. ठाणे महानगरपालिका पिसे बंधाऱ्यातून २०० दशलक्ष लिटर पाणी घेते. मीरा-भाईंदरसाठी पाणी आरक्षित केल्यानंतर हे २५ दशलक्ष लिटर पाणी ठाणे महापालिकेला देण्यात यावे आणि बदल्यात ठाणे महापालिका स्टेम प्रधिकरणाकडून घेत असलेल्या पाण्यातून २५ दशलक्ष लिटर पाणी मीरा-भाईंदरला द्यावे असा हा प्रस्ताव होता. मीरा-भाईंदरही स्टेम प्रधिकरणाकडूनच पाणी घेत असते आणि अतिरिक्त २५ दशलक्ष लिटर पाणी घेण्याएवढी क्षमता महापालिकेच्या जलवाहिन्यांमध्ये आहे. त्यामुळे कोणताही अतिरिक्त खर्च न करता आणि कमीत कमी वेळेत मीरा-भाईंदरला हे पाणी मिळू शकणार आहे.

पिसे बंधाऱ्यात पाण्यासाठी आरक्षणच शिल्लक नसल्याने सध्या तरी हा प्रस्ताव मागे पडला आहे. त्याऐवजी बारवी धरणातून मीरा-भाईंदरला अतिरिक्त २५ दशलक्ष लिटर पाणी देण्यास मंत्रालयात झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बारवी धरणातील पाण्याचा पुरवठा औद्यागिक विकास महामंडळाकडून केला जातो. सध्या मीरा-भाईंदर महापालिका महामंडळाकडून ५० दशलक्ष लिटर पाणी घेत आहे. त्यात आणखी २५ दशलक्ष लिटर पाण्याची भर घालण्यास या वेळी मंजुरी देण्यात आली.

शहराची वाढती गरज

मीरा-भाईंदरला सध्या दररोज १३६ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतो. याव्यतिरिक्त सध्या काम प्रगतिपथावर असलेल्या पाणी योजनेतून वर्षभराच्या आत ७५ दशलक्ष लिटर पाणी मिळणार आहे; परंतु  शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता २०२१ नंतर हे पाणीदेखील कमी पडणार असल्याने मीरा-भाईंदरसाठी २५ दशलक्ष लिटर अतिरिक्त पाण्याची मागणी करण्यात आली होती.