तत्काळ सेवा देण्याचा रेल्वे आणि खासगी संस्थेचा प्रयत्न

लाखो प्रवाशांची ने-आण करणाऱ्या रेल्वे स्थानक परिसरात अपघात घडल्यास किंवा एखाद्या प्रवाशाची प्रकृती बिघडली तर तात्काळ वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांना जीव गमवावा लागतो. मध्य रेल्वेच्या मार्गावर असे प्रसंग नित्याचे बनले असून ते टाळण्याच्या दृष्टीने न्यायालयाने रेल्वेला वैद्यकीय सेवा पुरवण्याचे आदेश दिले होते. याच पाश्र्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानकात वैद्यकीय मदत केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर खासदार राजन विचारे आणि श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत या मदत केंद्राची सुरुवात करण्यात आली. आरोग्यधाम रुग्णालयातील डॉक्टरांकडून ही सुविधा पुरवली जाणार आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वे स्थानकात तत्काळ वैद्यकीय सुविधा मिळू शकणार आहे. ही सुविधा सशुल्क असणार आहे.

मध्य रेल्वेच्या दादर स्थानक वगळता अन्य स्थानकात कोणत्याही प्रकाराची वैद्यकीय मदत पुरवणारे केंद्र अद्याप उपलब्ध झालेले नाही. यामुळे लाखो प्रवाशांची वर्दळ असलेल्या स्थानकात एखादी आपत्कालीन घटना घडली, अपघात घडला तर प्रवाशांच्या मदतीला ना रेल्वे प्रशासन, ना पोलीस यंत्रणा येत होती. प्रवाशाला इतर प्रवाशांच्या मदतीने रुग्णालय गाठावे लागत होते. वारंवार घडलेल्या अशा अपघाती घटनांमुळे उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला फटकारले. त्यानंतर शहाणपणा सुचलेल्या रेल्वे प्रशासनाने दादर स्थानकात पहिल्या वैद्यकीय मदत केंद्राची सुरुवात केली होती. त्या पाठोपाठ गुरुवारी ठाणे स्थानकात दुसऱ्या केंद्राची सुरुवात झाली आहे.

अपघातग्रस्त प्रवाशांना प्रथमोपचार करणे आणि त्यांना तात्काळ मोठय़ा रुग्णालयात हलवण्यासाठी हे केंद्र काम करणार आहे. शिवाय प्रवासादरम्यान प्रकृतीमध्ये बिघाड झाल्यास त्यांना उपचार देण्यात येणार आहे. यामध्ये अपघात वगळता अन्य सुविधांसाठी हे केंद्र शुल्क आकारणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमास खासदार राजन विचारे, श्रीकांत शिंदे, रेल्वे प्रवासी संघटनेचे नंदकुमार देशमुख, स्थानक व्यवस्थापक एस. बी. महीधर आणि प्रवासी उपस्थित होते.

असे चालणार केंद्राचे काम..

मध्य रेल्वेने तीन वर्षांकरिता कोपरीतील आरोग्यधाम रुग्णालयास या मदत केंद्राची जागा २० हजारांच्या मासिक भाडेपट्टय़ावर देऊ केली आहे. मदत केंद्र ठाणे रेल्वे स्थानकात होणाऱ्या अपघातग्रस्तांना तत्काळ प्रथमोपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी वेळेत पाठविण्याची यांची जबाबदारी असणार आहे. ही सेवा सकाळी ६ ते रात्री १० या वेळेपर्यंत सुरू असणार आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तर या केंद्राबरोबर स्थानक परिसरामध्ये अत्यल्प दरामध्ये तत्काळ औषधे उपलब्ध होतील, अशा स्वरूपाच्या औषध दुकानांचीही उपलब्धता होण्याची गरज प्रवासी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे. शिवाय कळवा, मुंब्रा आणि दिवा, डोंबिवली, कल्याण या स्थानकांवरही ही सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.