बदलापूरमधील भाजप नगरसेवकाचा प्रताप असल्याची चर्चा
मागील अनेक महिन्यांच्या प्रयत्नांनंतर रेल्वेकडून बंद करण्यात आलेल्या चोरवाटा पुन्हा एकदा काही स्थानिकांच्या फायद्यासाठी अज्ञात व्यक्तींनी उघडल्या आहेत. या कृत्यात एका ज्येष्ठ भाजप नगरसेवकाचा हात असल्याचे बोलले जाते. त्यामुळे बदलापूर रेल्वे स्थानकाबाहेर पडण्यासाठी रुळ ओलांडण्याचे प्रकार पुन्हा सुरू झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी रेल्वे रुळ ओलांडल्याने होणाऱ्या अपघातांवर तोडगा म्हणून फलाट क्रमांकएक आणि दोनच्या बाजूला तुटलेल्या संरक्षण भिंतींच्या जागी लोखंडी जाळ्या बसवण्यात आल्या होत्या. त्यामुळे काही अंशी प्रवाशांचे रुळ ओलांडणे कमी झाले होते. मात्र एका स्थानिक भाजप नगरसेवकाने याबाबत विरोधी भूमिका घेत रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारला होता. त्यानंतर नुकतेच मच्छी मार्केटकडील बाजूचे अडथळे काढण्यात आले आहेत. त्यामुळे तिथून बिनदिक्कतपणे अनेक प्रवासी रुळ ओलांडून जात आहेत.
स्थानिक भाजप नगरसेवकाने याआधीही अशा प्रकारच्या चोरवाटा मोकळ्या करून दिल्या होत्या. त्यामुळे या तथाकथित लोकप्रतिनिधींना नक्की रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचे वावडे आहे की काही मोजक्या स्थानिक बेकायदा विक्रेते आणि रिक्षाचालकांवरचे प्रेम, असा प्रश्न उपस्थित होत आहे. चोरवाटा बंद झाल्याचा फटका बेकायदा मच्छी विक्रेते, भाजीवाले आणि रिक्षाचालकांना बसत होता. त्यामुळे त्यांनी त्या भाजप नगरसेवकाच्या माध्यमातून रेल्वे स्थानक प्रबंधकांना अरेरावीच्या भाषेत जाब विचारला होता. मात्र रेल्वेकडून त्यांना काही प्रतिसाद न मिळाल्याने काही अज्ञातांनी या चोरवाटांचे अडथळे मोकळे केले. मात्र आता रेल्वेचा अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवाल रेल्वे अधिकारी विचारत आहेत. तसेच रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आम्ही शक्य ते प्रयत्न करत आहोत, मात्र जर आम्हाला असे अडथळे निर्माण केले जात असतील, तर नक्की आम्ही करायचे तरी काय, असेही हे अधिकारी विचारत आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेबाबत निर्णय घेताना काही विक्रेत्यांच्या बाजूने भूमिका घेणाऱ्या आणि रेल्वेच्या कामात अडथळे आणणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, ते प्रवाशांच्या जिवाशी खेळत आहेत.
– संदीप कांबळे, प्रवासी

प्रवाशांना शॉर्टकट हवा असतो. मात्र तो जीवघेणा प्रवास आहे. लोकप्रतिनिधी जर यात काही भूमिका घेत असतील तर ती त्यांनी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी असावी.
– रमेश महाजन, रेल्वे प्रवासी सहकारी मित्र संस्था, बदलापूर