कल्याण, डोंबिवली शहरातील रस्त्यांवरील खडय़ांच्या समस्येविरोधात मनसेने आंदोलन केले. परंतु त्यास नागरिकांचा फार प्रतिसाद मिळाला नाही.  या वेळी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली विभागीय कार्यालयावर धडक देत खड्डे बुजवावेत या मागणीचे एक निवेदन तेथील कार्यकारी अभियंत्यांना दिले. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असतानाचा हे आंदोलन करण्यात आल्याने या आंदोलनास नागरिकांचा मात्र फार प्रतिसाद मिळाला नाही.

कल्याण, डोंबिवली, टिटवाळा शहरात रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे अपघात होऊन काही नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. अशा अपघातांमध्ये जखमी झालेल्यांची तर मोजदाद नाही. खड्डेमय डोंबिवलीकडे प्रशासनाचे लक्ष जावे यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महिन्याभरापूर्वी खड्डय़ांचे छायाचित्र प्रदर्शन भरविले होते. या वेळी मनसेचे प्रदेश सचिव राजू पाटील यांनी पालिका प्रशासनाला खड्डे बुजविण्याविषयीचे निवेदनही दिले होते. मात्र, निवेदन, प्रदर्शनानंतरही शहरातील खड्डे अजूनही जैसे थे आहेत.

गणेशोत्सव जवळ आल्याने गणेशोत्सवापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पालिकांना दिले आहेत. कल्याण- डोंबिवली महापालिकेनेही याची दखल घेत पावसाने उघडीप घेताच रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यास काही दिवसांपूर्वीच सुरुवात केली आहे. खड्डे बुजविण्याचे काम सुरू असताना मंगळवारी सकाळी मनसेने प्रतीकात्मक गणपती पूजन करत या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या वेळी रस्त्यांवरील खड्डय़ात प्रतीकात्मक गणेशमूर्ती बसवून आरती करण्यात आली. खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. या आंदोलनानंतर तरी प्रशासनाला जाग येईल आणि केवळ मुख्य रस्त्यांवर नव्हे तर अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले जाईल, अशी प्रतिक्रिया या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

सर्वप्रथम आम्ही  महिन्याभरापूर्वी खड्डय़ांचे प्रतीकात्मक छायाचित्र प्रदर्शन भरविले होते. त्यानंतर निवेदनही देण्यात आले; परंतु त्याचा काही एक उपयोग झाला नाही. कल्याण-शीळ रोडवर खडी टाकण्यात आली आहे. डोंबिवलीमधील खड्डे कधी बुजविले जाणार हा प्रश्न कायम आहे. महापालिका प्रशासन डोंबिवलीला नेहमीच दुय्यम दर्जाची वागणूक देत असते. यामुळे आम्ही हे आंदोलन केले.

– मनोज घरत,  शहर अध्यक्ष, मनसे.

पावसामुळे रस्त्यांवर खड्डे पडले आहेत, परंतु त्यात केवळ खडी टाकल्याने वाहनांच्या वर्दळीने ती खडी निघून जात असल्याने डांबरीकरण हाच एक पर्याय आता पालिकेसमोर आहे. डोंबिवली शहरात खड्डे कमी असून आयरे रोड येथील खड्डे बुजविण्याचे काम आता सुरू आहे. पावसाने उघडीप दिल्यानंतर रात्रंदिवस हे काम करण्यात येणार असून गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहेत.

– महापालिका प्रशासन