ई. रवींद्रन, आयुक्त कडोंमपा
कल्याण-डोंबिवली शहराला नागरी सुविधांच्या माध्यमातून विकासाचा चेहरा देण्याचा प्रयत्न येत्या पाच वर्षांच्या काळात करण्यात येणार आहे. कचरा ही प्रत्येक शहरातील समस्या असते. तशीच ती कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीतही आहे. कचरामुक्त शहर आणि कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट या विषयाला या काळात प्रथम प्राधान्य देण्यात आले आहे. शहर परिसरातील कचरा नियमितपणे उचलला जात आहे. रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वर्दळ विचारात घेऊन तेथे तीन पाळ्यांमध्ये सफाईचे काम करण्यात येत आहे. कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने प्रकल्प तयार केले आहेत. ओला, सुका कचऱ्याचे विघटन करून त्यापासून खत, वीजनिर्मिती करण्याचे प्रशासन प्रयत्न करीत आहे. प्लॅस्टिक कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचा प्रकल्प कोपर येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात आला आहे. आधारवाडी क्षेपणभूमी शास्त्रोक्त पद्धदतीने बंद करून मांडा, बारावे येथे शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे विघटन करणारे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. प्रत्येक प्रभागाप्रमाणे कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट लावण्यात आली तर, शहरातून कचरा ही समस्या संपुष्टात येणार आहे.
वाहतूक कोंडी ही शहरातील आणखी एक गंभीर समस्या आहे. सर्व प्रकारच्या वाहनांचा ओघ हा रेल्वे स्थानकांच्या दिशेने आहे. त्यामुळे महापालिका हद्दीत असणाऱ्या रेल्वे स्थानक परिसराच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. या प्रकल्पाची सुरुवात कल्याण रेल्वे स्थानकापासून करण्यात आली आहे. त्यानंतर डोंबिवली, टिटवाळा, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, कोपर रेल्वे स्थानकांच्या विकासाचा विचार करण्यात येणार आहे. उपलब्ध रस्त्यांच्या प्रमाणात वाहनांची संख्या अधिक असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी २७ रस्त्यांच्या रुंदीकरणाचे कार्यक्रम हाती घेण्यात आले आहेत. रस्ता रुंदीकरणामुळे वाहनांची शहराच्या मुख्य ठिकाणी जी कोंडी होते ती सुटण्यास साहाय्य होणार आहे. तसेच, शहर परिसरात पर्यायी वाहतूक मार्ग उपलब्ध झाले तर शहरातील वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. यासाठी ठाकुर्ली उड्डाण पूल, माणकोली उड्डाण पूल, विकास आराखडय़ातील जुने व नवीन प्रस्तावित रस्ते उभारणीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यामध्ये २७ गावांचाही समावेश आहे. मोहने येथील रखडलेल्या उड्डाण पुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कल्याणमधील वाहतुकीवर येणारा बाहेरील वाहनांचा भार कमी होण्यास मदत होणार आहे. कोपर ते टिटवाळा या बाह्य़वळण रस्त्याचे काम टप्प्याने हाती घेण्यात येणार आहे. शहरातील वाहतूक व्यवस्थेत शिस्त यावी म्हणून मुख्य चौकांमध्ये वाहतूक दर्शक (सिग्नल) उभारण्यात येणार आहेत.
कल्याण-डोंबिवली शहरांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा. पाणीटंचाईचे संकट शहरावर येऊ नये म्हणून शासनाशी वाढीव पाणी मिळणेबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. प्रत्येक रहिवाशाला पुरेसे पाणी मिळाले पाहिजे, असे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. पाणीकपातीमुळे प्रत्येक रहिवाशाने पाण्याच्या वापराबाबत जागरूक राहिले पाहिजे. पाणीगळती, पाणीचोरी रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे. चोरीच्या नळजोडण्या तोडण्यात येत आहेत. २७ गावांमध्ये नागरी सुविधा देण्यासाठी राज्य शासनाकडे वाढीव निधी मिळण्याची प्रशासनाने मागणी केली आहे. अर्थसंकल्पात गावांसाठी तरतूद आहे. या माध्यमातून २७ गावांमध्ये रस्ते, दिवाबत्ती, पदपथ, गटारे आदी प्राथमिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. परिवहन उपक्रमाचा सुरळीत चालण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. उपक्रमाच्या ताफ्यात नवीन बस येणार आहेत. प्रवाशांना या बसचा अधिक लाभ मिळवून देण्याचे प्रयत्न आहोत. त्यासाठी आगार विकसित करण्यात येणार आहेत. रेल्वे स्थानक भागातील फेरीवाल्यांचा प्रश्न कायमचा निकाली काढणे, त्यांचे फेरीवाला विभागात पुनर्वसन करणे, पालिकेची आरक्षित भूखंड ताब्यात घेणे. या भूखंडांवर लोकहिताचे प्रकल्प राबविणे. सर्वसमावेश जागा ताब्यात घेऊन त्यांचा आरोग्य, क्रीडा, वाचनालय आदी उपक्रमांसाठी वापर करण्यात येणार आहे. येत्या पाच वर्षांत टप्प्या टप्प्याने विकासाची कामे पूर्ण करून, कल्याण-डोंबिवली शहरांना विकासाच्या वाटेवर नेण्यात येईल.