चौकशीअंती कल्याण-डोंबिवली पालिकेकडून स्पष्टीकरण

कल्याण-डोंबिवली पालिकेचे माजी आयुक्त ई. रवींद्रन यांची १८ मे रोजी कल्याण- डोंबिवली पालिकेतून बदली झाल्यानंतर सात दिवसात (२५ मे २०१७) अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांवर स्वाक्षऱ्या करून हेराफेरी केल्याच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे पालिकेने केलेल्या चौकशीअंती म्हटले आहे.  पालिका प्रशासनाने रवींद्रन यांना ‘क्लीन चिट’ दिली असली तरी; मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग आणि अंमलबजावणी संचालनालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

नगरविकास विभागातील एका विश्वसनीय सूत्राने, ‘ई. रवींद्रन यांच्याबाबतचा अहवाल शासनाला प्राप्त झाला आहे’, असे सांगितले. त्यामुळे पालिकेने नगरविकास विभागाला पाठविलेला अहवाल नगरविकास विभाग व अन्य चौकशी यंत्रणांकडून किती गांभीर्याने घेतला जातो याकडे लक्ष लागले आहे. रवींद्रन यांची कल्याण-डोंबिवली पालिकेतून बदली झाल्यानंतर त्यांनी नवीन आयुक्त हजर होईपर्यंतच्या पुढील सात दिवसांत प्रभारी आयुक्त म्हणून काम पाहिले. या कालावधीत नगररचना विभागातील काही विकासकांच्या बांधकाम आराखडय़ांच्या वाद्ग्रस्त नस्ती रवींद्रन यांनी साहाय्यक संचालक नगररचना प्रकाश रविराव, नगररचनाकार संजय भोळे यांच्या सहकार्याने मंजूर केल्या. याशिवाय विकास कामांचे २८ कोटीचे प्रस्ताव व एका अभियंत्याची बदली केली असल्याची तक्रार जितेंद्र पुसाळकर यांनी ३ जुलै २०१७ रोजी नगरविकास विभागाकडे केली होती.

नगरविकास विभागाने या तक्रारीच्या अनुषंगाने पालिका आयुक्त पी. वेलरासू यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होते. वेलरासू यांनी शहर अभियंता, जल अभियंता, नगररचना विभागाचे साहाय्यक संचालक, सामान्य प्रशासन विभागाला तक्रार अर्जाच्या अनुषंगाने अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. दरम्यान, ज्या पालिका अधिकाऱ्यांनी वेळोवेळी अधिकाऱ्यांची पाठराखण केली, ते अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या विरोधात काय वास्तवदर्शक अहवाल देणार, असे प्रश्न या अहवालाच्या निमित्ताने उपस्थित करण्यात येत होते. साहाय्यक संचालक नगररचना प्रकाश रविराव यांच्या संगनमताने रवींद्रन यांनी विकासकांच्या काही वाद्ग्रस्त नस्तींवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत, ते रविराव कोणता वास्तवदर्शी अहवाल प्रशासनाला देणार, असा तक्रार अर्ज पुसाळकर यांनी आयुक्त व नगरविकास विभागाला दिला आहे. आयुक्त पी. वेलरासू यांच्याशी संपर्क झाला नाही. उपायुक्त विजय पगार रजेवर आहेत. त्यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिले होते. पुढील कार्यवाही काय झाली ते माहीत नसल्याचे सांगितले. साहाय्यक आयुक्त मिलिंद धाट यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

अहवालात काय 

* ई. रवींद्रन यांनी २५ मे रोजी दुपारी आयुक्तपदाचा कार्यभार सोडला. या तारखेनंतर आयुक्त कार्यालयाच्या आवक, जावक नोंदवहीत ३० मेपर्यंत नगररचना विभागाच्या कोणत्याही नस्तीची (धारिका) नोंद आढळून येत नाही. मात्र, तक्रारदार पुसाळकर यांनी १८ मे ते २५ मे या कालावधीत रवींद्रन यांनी स्वाक्षरी केल्याचे म्हटले आहे. नगररचना विभागाने या कालावधीचा विचार न करता २५ मे ते ३० मेचा हवाला देऊन अशा प्रकारच्या स्वाक्षऱ्या केल्या नसल्याचे म्हटले आहे.

* रवींद्रन यांनी २५ मे रोजी पदभार सोडल्यानंतर विकास कामांची वा निविदा संदर्भातील कोणत्याही नस्तींवर (धारिका) स्वाक्षरी केली नसल्याचे अहवाल शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी, जल अभियंता चंद्रकांत कोलते यांनी आयुक्तांना दिले आहेत.

* कनिष्ठ अभियंता देविदास जाधव यांची बदली रवींद्रन यांच्या मान्यतेने तत्कालीन उपायुक्त दीपक पाटील २३ मे रोजी केली केली आहे. २५ मेपर्यंत ई. रवींद्रन पालिकेत आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यामुळे जाधव यांची बदली नियमाने झाली आहे.