अंबरनाथ, बदलापूरमधील अवस्था; नगरपालिकांचे दुर्लक्ष

शहरातील नागरिकांना रस्त्यावरच्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढता यावा यासाठी रेल्वे स्थानकांबाहेर स्कायवॉक बांधण्यात आले. मात्र स्कायवॉकची देखभाल दुरुस्ती ही नगरपालिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील स्कायवॉकवर अंधार पसरल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

अंबरनाथ आणि बदलापूर शहरात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अनेक विकासकामे सुरू आहेत. त्यांची सुरुवात रेल्वे स्थानकाशेजारी बांधण्यात आलेल्या स्कायवॉकच्या माध्यमातून झाली. स्कॉयवॉकची उभारणी करताना सुरुवातीला मोठय़ा प्रमाणावर आराखडे तयार करण्यात आले. प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत त्यात मोठय़ा प्रमाणावर बदल करण्यात आले. मात्र शहरवासीयांसाठी हे स्कॉयवॉक अडचणीचे ठरू लागले आहेत.

अंबरनाथ आणि बदलापूर अशा दोन्ही शहरांतील स्कायवॉकना समस्यांनी ग्रासले असून स्कायवॉकवर सतत अंधार असतो.

अंबरनाथ रेल्वे स्थानकाबाहेरील स्कायवॉक थेट रेल्वे पादचारी पुलाला जोडण्यात आलेला नाही. पादचारी पूल चढल्यानंतर पुन्हा स्कायवॉकच्या काही पायऱ्या चढाव्या लागतात. त्यामुळे अनेक पादचारी त्यावरून जाणे टाळतात. पायऱ्यांवर अनेक भाजीवाल्यांनी दुकाने थाटल्याने पादचाऱ्यांना त्यातून वाट काढत जावे लागते.

पुढेही संपूर्ण स्कायवॉक अंधारात असल्याने चोरटय़ांची आणि टवाळखोरांनी भीती नागरिकांना असते. त्यामुळे अनेकदा नागरिक यावरून चालणे टाळतात. अंधार असल्याने येथे टवाळ टोळकी, प्रेमी युगुलांचा वावर मोठय़ा प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रचंड खर्च करून उभारलेला स्कायवॉक निरुपयोगी ठरत आहे. स्कायवॉकवर दिव्यांची सोय करण्यात यावी आणि सुरक्षारक्षक नेमावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

पश्चिमेकडे समस्या गंभीर

बदलापूर येथील स्कायवॉकवरही अशीच काहीशी परिस्थिती आहे. स्कायवॉकचा निम्म्याहून अधिक भाग अंधारात असून पश्चिमेकडील वैशाली टॉकीजच्या बाजूने उतरणाऱ्या भागातील सर्वाधिक दिवे बंद आहेत. पूर्वेकडील दिवे सुस्थितीत आहेत तसेच पालिकेच्या कारवाईमुळे येथे फेरीवाले थांबत नाहीत. मात्र पश्चिमेकडे अंधार असल्याने पादचारी वापर टाळतात. त्यामुळे येथेही गर्दुल्ले, प्रेमी युगुलांची गर्दी पाहायला मिळते.

हस्तांतरावरून देखभालीत टाळाटाळ?

एमएमआरडीएने बांधलेले स्कायवॉक आता पालिकांच्या गळ्यात मारण्याचे प्रयत्न होत आहेत, अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू असते. त्यात हस्तांतराच्या प्रक्रियेअभावी स्कायवॉकच्या देखभालीकडे दोन्ही पालिकांच्य प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे अनेक रहिवाशांचे म्हणणे आहे. पालिका आणि एमएमआरडीएच्या टोलवाटोलवीत रहिवासी आणि प्रवाशांचे मात्र हाल सुरू आहेत.