शाळेतील सवंगडय़ांचा सहवास केवळ आठवणीपुरता उरण्याचे दिवस आता मागे पडले असून आधुनिक संपर्क माध्यमाच्या सहाय्याने जगभरात विखुरलेले शाळूसोबती एकमेकांना हुडकून पुन्हा एकदा शाळेचा वर्ग भरवू लागले आहेत. अंबरनाथ येथील तत्कालिन कानसई हायस्कूलमधून (आताचे भाऊसाहेब परांजपे विद्यालय) १९८१ मध्ये दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी अलिकडेच नेरळ येथील एका रिसॉर्टवर स्नेह संमेलन भरवून ३५ वर्षांपूर्वीच्या स्मृतींना नव्याने उजाळा दिला. आता पन्नाशीत असलेल्या या माजी विद्यार्थ्यांनी शाळेस आधुनिक शैक्षणिक साधने देण्याचा
निर्णय घेतला.
‘सवंगडी फॉर एव्हर’ या नावाने व्हॉटस्अपवर बनविण्यात आलेल्या समूहाने हे शाळूसोबती एकमेकांशी संवाद साधू लागले. त्यातूनच स्नेह संमेलन भरविण्याचे ठरविण्यात आले. वंदना पाळंदे, संजय पानसे, सुहास गुप्ते, महेश लघाटे, अभय चौलकर, शशांक आंबेकर, पुरूषोत्तम जोशी, श्रीपाद साबदे यांनी या कामी पुढाकार घेतला. एकमेकांची टोपण नावे, शाळेतील खोडय़ा,
भांडणे, केलेली मौज-मजा या आठवणींना स्नेह संमेलनामुळे उजाळा मिळाला. शाळेतील शिक्षिका रेखा मैड यांनी व्हच्र्युअल माध्यमाद्वारे या सवंगडय़ांशी संवाद साधला. परदेशात असलेल्या काही शाळू सोबत्यांनीही व्हच्र्युअल माध्यमाद्वारे स्नेह संमेलनातील सवंगडय़ांशी संवाद साधला. भाऊसाहेब परांजपे शाळेतील आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ई-लर्निगची सुविधा उपलब्ध करून देण्याचा तसेच इतरही काही शालोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्याचा निर्णय या संवंगडय़ांनी घेतला.