सूर्योदय’नंतर आता शेतकी सोसायटीलाही ग्रहण

एकीकडे अटी-शर्तीग्रस्त सूर्योदय सोसायटीमुळे अंबरनाथ शहराच्या विकास प्रक्रियेस खीळ बसलेली असतानाच त्यालगत असलेल्या सामुदायिक शेतकी सोसायटीलाही प्रदूषण आणि अतिक्रमणांच्या ग्रहणाने ग्रासले आहे. कल्याण-डोंबिवली आणि परिसरातील गावठाणांना कोटय़वधी रुपयांचे पॅकेज देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथकरांच्या या समस्यांकडेही लक्ष द्यावे, अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत.

गेली दहा वर्षे अटी-शर्ती भंगामुळे सूर्योदय गृहनिर्माण सोसायटीच्या सर्व व्यवहारांवर महसूल विभागाने टाच आणली आहे. सोसायटीत सहाशेहून अधिक भूखंडधारक असून लोकसंख्या २५ हजाराहून अधिक आहे. १०१ एकर जागेत १९४७ मध्ये सूर्योदय सोसायटीची स्थापना झाली. त्यानंतर १९६२ मध्ये सूर्योदय सोसायटीलगतच २०७ एकर जागेत सामुदायिक शेतकी सोसायटीची स्थापना करण्यात आली. शेती तसेच तत्सम जोड व्यवसायासाठी शासनाने ही जागा सोसायटीला उपलब्ध करून दिली. सोसायटीत २०५ सभासद आहेत. सोसायटीच्या जागेवर विकास आराखडय़ात विविध प्रकल्पांसाठी आरक्षणे असून त्यांपैकी काही भूखंडांवर आता अतिक्रमणे झाली आहेत. सोसायटीच्या मोकळ्या भूखंडांवर भूमाफिया चाळी उभारत आहेत. याबाबत पालिका प्रशासन, जिल्हाधिकारी कार्यालयाशी वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही अतिक्रमणे हटवली गेली नाहीत.

याव्यतिरिक्त सोसायटीच्या काही सभासदांनीही अनधिकृत बांधकामे केली आहेत. त्यांचे सभासदत्व सोसायटीने रद्द केले आहे. शासनाने याप्रकरणी गाभीर्याने लक्ष घालून सोसायटीच्या जमिनी संरक्षित करून अंबरनाथ शहर भकास होण्यापासून वाचवावे, असे आवाहन सोसायटीच्या वतीने रविवारी पत्रकार परिषदेत करण्यात आले. सोसायटीच्या एकूण २०७ एकर जमिनीपैकी सुमारे २५ टक्के भूखंडांवर आता अतिक्रमण झाले आहे. शिवमंदिरालगतचा भूखंड सामाजिक वनीकरणासाठी राखीव होता. त्याजागी आता झोपडपट्टी उभी आहे.

त्यामुळे शिवमंदिर सुशोभीकरणात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. शिवगंगा परिसरातील महाविद्यालयासाठी राखीव असलेल्या भूखंडावरही अनधिकृत झोपडपट्टी झाली आहे. आता चाळींचे अतिक्रमण सुरू आहे. त्यापैकी काही चाळी या २० वर्षांपासून सोसायटीची जागा बळकावून आहेत.

प्रदूषणामुळे शेती व्यवसाय धोक्यात

सोसायटीच्या जागेतूनच बहुचर्चित वालधुनी नदीचा एक प्रवाह जातो. ऐंशीच्या दशकापर्यंत या नाल्याचे पाणी अगदी पिण्यायोग्य होते. या पाण्यावर सामुदायिक सोसायटीतील सभासद आपापल्या जागेत भाजीपाला पिकवीत. मात्र आता प्रदूषणामुळे या नाल्याला सांडपाण्याच्या गटाराची अवकळा आली आहे. मध्यंतरी वालधुनीतील प्रदूषण रोखण्याबाबत शासकीय यंत्रणेने बरेच संकल्प केले. मात्र अजूनही कोणतीही प्रक्रिया न करता नाल्यात सोडण्यात येणारे रासायनिक सांडपाणी रोखले गेलेले नाही.

सोसायटय़ा नसत्या तर..

सूर्योदय आणि शेतकी या सोसायटय़ांमुळे अंबरनाथ पूर्व विभागातील तब्बल तीनशेहून अधिक एकर जागा आरक्षित झाली. सोसायटय़ा नसत्या तर या शासकीय जमिनींवर मोठमोठय़ा झोपडपट्टय़ा उभ्या राहिल्या असत्या. आता कल्याण परिसरात अन्यत्र कुठेही अंबरनाथ शहराइतके मोकळे भूखंड नाहीत. शासनाने तातडीने याप्रकरणी लक्ष घालून अंबरनाथ शहराच्या विकासाला निश्चित दिशा द्यावी, अशी अपेक्षा शहरातील सुजाण नागरिक व्यक्त करीत आहेत. कारण शाळा, वसतिगृह, रुग्णालय आदी प्रकल्पांसाठीचे भूखंड सुदैवाने अद्याप शाबूत आहेत.