ऑनलाइन संकेतस्थळावरून खरेदी करणाऱ्या कुटुंबाला मनस्ताप

‘मोफत घरपोच सुविधा’, ‘आकर्षक सवलती’ देऊन ग्राहकांना आपल्याकडे खेचणाऱ्या ई-कॉमर्स संकेतस्थळांकडून ग्राहकांना व्यवस्थित सेवा पुरवण्यात होणाऱ्या हलगर्जीपणाचा आणखी एक नमुना समोर आला आहे. कल्याणमधील एका कुटुंबाने ‘स्नॅपडील’ या संकेतस्थळावरून मोबाइल पॉवर बँक खरेदी केली. मात्र, प्रत्यक्षात त्यांना एका आकर्षक वेष्टनात गुंडाळलेल्या बॉक्समधून दगड पाठवण्यात आला.

कल्याणातील खडकपाडा परिसरात राहणाऱ्या उमा निपाणे यांनी गुरुवार २४ सप्टेंबर रोजी स्नॅपडील या संकेतस्थळावरून एक मोबाइल पॉवरबँक खरेदी केली. चार दिवसानंतर म्हणजेच पॉवरबँक घेऊन ‘स्नॅपडील’चा कर्मचारी त्यांच्या घरी पोहोचला. कर्मचाऱ्याच्या समक्षच निपाणे यांनी आपले पार्सल उघडले असता त्यात पॉवरबँकऐवजी गड आढळला. कर्मचाऱ्याने लगेचच वस्तू बरोबर नसल्याचे पत्र निपाणे यांच्याकडून घेतले व ते पार्सल घेऊन तो निघून गेला. त्यानंतर निपाणे यांनी ‘स्नॅपडील’च्या ग्राहकसेवा केंद्रात याविषयी तक्रार केली. उमा निपाणे यांच्या मुलीने दगडाची छायाचित्रे सोशल मीडियावरून प्रसारित केली.

दुसऱ्या दिवशी ‘स्नॅपडील’च्या कर्मचाऱ्याने निपाणे कुटुंबीयांना दूरध्वनी करून नव्याने पॉवर बँक खरेदी करण्याविषयी विचारणा केली. अथवा रकमेचा परतावा करण्याची तयारी दर्शवली. मात्र, घडल्या प्रकाराबद्दल माफीनामा देण्यास त्याने नकार दिला. तसेच निपाणे यांनी फेसबुकवरून छायाचित्रे काढून टाकावीत, अशी सूचनाही त्यांना केली.

दरम्यान, या संदर्भात ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधीने ईमेलद्वारे ‘स्नॅपडील’ची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु कंपनीकडून कोणतेही उत्तर आलेले नाही.

स्नॅपडीलच्या या फसवणुकीमुळे मनस्ताप झाला आहे. संकेतस्थळावर खरेदी केलेली वस्तू प्रत्यक्ष घरी आल्यानंतर तीच आहे ना, याची पडताळणी ग्राहकाने करणे गरजेचे आहे. जेणेकरून अशा प्रकारच्या फसवणुकीला आळा बसेल.
– उमा निपाणे, कल्याण</strong>