tvlog03पण प्रत्येकाला क्रिकेट विश्वात नाव कमाविण्याची संधी मिळतेच असे नाही. तरीही अनेक खेळाडू आपली जिद्द कायम ठेवत त्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. आज ना उद्या क्रिकेट संघात संधी मिळेल, अशी त्यांची आशा असते. या एका आशेवरच उत्तर प्रदेशातील हरेंदर रामचंद्र यादव या तरुणाने घर सोडले आणि क्रिकेटची पंढरी असलेल्या मुंबापुरीत दाखल झाला. एका महाविद्यालयाच्या क्रिकेट संघात त्याला प्रवेश मिळाला खरा, पण क्रिकेटची हौस भागविण्यासाठी आर्थिक चणचण भासू लागली. आर्थिक गरज आणि क्रिकेटची हौस त्याला गुन्हेगारी मार्गावर घेऊन गेली आणि तो छोटेमोठे गुन्हे करू लागला. क्रिकेटवेडापायी गुन्हेगारीकडे वळलेल्या हरेंदरला ठाणे पोलिसांनी पकडल्यानंतर त्याची कहाणी उघड झाली.
उत्तर प्रदेश राज्यातील आजमगढ जिल्ह्यात करीमउद्दीनपूर नावाचे गाव आहे. या गावात हरेंदर यादव आपल्या कुटुंबासोबत राहायचा. सर्वसामान्य भारतीय मुलांप्रमाणे लहानपणापासूनच त्याला क्रिकेट खेळायची आवड होती. हरेंदरने या खेळात विशेष चमक दाखवण्यास सुरुवात केली आणि भारतीय संघात स्थान मिळवण्याच्या त्याच्या आकांक्षांना बळ मिळाले. पण घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. तसेच क्रिकेट खेळण्यासाठी त्याला घरातून विरोध होता. तरीही क्रिकेटमध्ये करियर करण्याची त्याची इच्छा तसूभरही कमी झाली नाही. घरातल्यांचा विरोध टाळण्यासाठी आणि क्रिकेटविश्वात नाव कमावण्यासाठी हरेंदरने दोन वर्षांपूर्वी मुंबई गाठली.
मुंबईत राहण्यासाठी निवारा शोधत शोधत हरेंदर ठाण्यातील कळवा परिसरात आला. तेथे वाघोबानगर या झोपडपट्टी परिसरात त्याला राहायला घर मिळाले. तेथेच त्याला क्रिकेटच्या मैदानात उतरण्याचा मार्ग मिळाला. हरेंदरचे क्रिकेटकौशल्य पाहून एका महाविद्यालयाच्या संघात त्याची निवड झाली. या संघातून आंतर महाविद्यालयीन सामने खेळताना त्याने चार शतके ठोकली आणि महाविद्यालयातील क्रिकेट संघात त्याचा लौकिक वाढू लागला.
क्रिकेटमध्ये नाव तर मिळत होते. मात्र हा छंद जोपासण्यासाठी आणि व्यावसायिक पातळीवर पोहोचण्यासाठीचा खर्च हरेंदरला परवडत नव्हता. घरून आणलेले पैसेही संपत चालले होते. आता काय करायचे, असा प्रश्न त्याच्यासमोर उभा ठाकला असतानाच, एके दिवशी त्याला वाघोबा नगरमधील मित्र नरेंद्र प्यारेलाल जयस्वाल (२०) भेटला. हरेंदरची अडचण समजल्यानंतर नरेंद्रने त्याला ‘वेगळय़ा’ मार्गाने पैसे कमवण्याची कल्पना सांगितली. नरेंद्र मुंबई, ठाणे परिसरातील रेल्वे गाडय़ांमध्ये बेपत्ता व्यक्तींचे पोस्टर्स चिकटविण्याचे काम करायचा. या पोस्टर्सवरील क्रमांकावर फोन करून त्याच्या नातेवाइकाकडून पैसे मिळवायचे, अशी नरेंद्रची कल्पना होती. हरेंदरही त्याला सामील झाला आणि दोघांनी कामास सुरुवात केली. प्रत्यक्षात बेपत्ता व्यक्ती ताब्यात नसतानाही त्यांच्या सुटकेसाठी दोघे संबंधित कुटुंबांकडे पैशांची मागणी करू लागले. एके दिवशी ठाण्यातील वसंत विहार भागातून बेपत्ता झालेल्या १५ वर्षीय मुलाच्या घरी दोघांनी फोन केला आणि त्याच्या सुटकेसाठी एक लाख रुपये मागितले. अखेर त्या मुलाचे कुटुंब ५० हजार रुपये देण्यास तयार झाले. याबाबत या कुटुंबाने ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांना माहिती दिली. त्यानुसार, उपायुक्त मणेरे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे सर्व पथके वेगवेगळ्या दिशेने तपास करीत होती. धमकीच्या फोनवरून मुलाचे अपहरण झाल्याचे सुरुवातीला वाटत होते. यामुळे पोलीसही सावधगिरीने खंडणीखोराचा माग काढत होते. ठाणे खंडणीविरोधी पथकाने ठाणे रेल्वेस्थानक परिसरात दोनदा सापळा लावला, पण तो पैसे घेण्यासाठी आलाच नाही. या प्रकारामुळे पोलीस चक्रावून गेले होते. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन.टी. कदम, पोलीस निरीक्षक संजय साबळे आणि नासीर कुलकर्णी यांच्या पथकाने शक्कल लढवली आणि कुटुंबामार्फत खंडणीखोराला मुलासोबत बोलण्याचा आग्रह धरला. मात्र, खंडणीखोर मुलाचे बोलणे करून देत नव्हता. यामुळे मुलगा त्याच्या ताब्यात नसल्याची खात्री पथकाला झाली आणि तेथूनच पथकाने त्याचा माग काढण्यास सुरुवात केली. पोलीस उपनिरीक्षक फारूक शेख, मनोज प्रजापती, पोलीस हवालदार अंकुश भोसले, सातुर्डेकर, सुरेश मोरे, नितीन ओवळेकर, प्रशांत भुर्के, सुहास खताते, शशिकांत निंबाळकर, पंकज ससाणे, हेमंत महाले, युवराज गवळी आदींचे पथक त्यांचा शोध घेत होते. हे पथक खंडणीखोराचा माग काढत कळव्यात पोहोचले आणि तिथेच हरेंदर आणि नरेंद्र हे दोघेही त्यांच्या हाती लागले. या दोघांनी मुंबई, ठाणे आणि उल्हासनगर भागात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे तपासात उघड झाले. अल्पवयीन हरेंदरला बालसुधारगृहात पाठविण्यात आले असून नरेंद्रची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे.
नीलेश पानमंद