नितीन कंपनी चौकात रिक्षा थांब्यांचा विळखा
अडवणुकीचे थांबे – नितीन कंपनी, तीन हात नाका
नव्याने विकसित होणाऱ्या ठाण्यामध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना पूर्व द्रुतगती महामार्गाची वेस ओलांडावी लागते. जुन्या आणि नव्या ठाण्याच्या सिमेवरील नितीन कंपनी आणि तीन हात नाका हे दोन्ही चौक महत्त्वाचे आहेत. मात्र सिग्नल यंत्रणेच्या अभावामुळे येथील रहदारीचे तीनतेरा वाजले आहेत. त्यातच रिक्षाचालकांच्या मनमानी थांब्यांमुळे येथील वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
नितीन कंपनी चौकात तब्बल तीन रिक्षा थांबे आहेत. हे तीनही थांबे येथील प्रवाशांसाठी अडवणुकीचे केंद्र बनले आहे. रामचंद्रनगरच्या चौकात डावीकडे असलेल्या बेकायदा रिक्षा थांब्यामुळे हा संपूर्ण परिसर कोंडीचे आगार बनला आहे. या थांब्याच्या परिसरात मीटरने व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांना धमकाविण्याचे प्रकारही सर्रासपणे घडताना दिसतात. सायंकाळच्या वेळेत या चौकात रिक्षा कशाही पद्धतीने उभ्या केल्या जातात. त्यामुळे या भागात अभूतपूर्व कोंडी होते. सद्य:स्थितीत नितीन कंपनी चौकात सिग्नल यंत्रणा अस्तित्वात नाही. त्यामुळे पाचपाखाडी भागातून लोकमान्यनगर, काजूवाडी, वर्तकनगर, सावरकरनगर या भागात ये-जा करणाऱ्या वाहनांची या चौकात गर्दी होते. त्यातच रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे वाहनांची वाट अडून राहते.
तीन हात नाक्यावरील मुख्य चौकात मुंबईच्या रिक्षा ठाण मांडून असतात. त्यामुळे येथून जाणाऱ्या बेस्ट बसचीही अडवणूक होते. वनविभागाच्या कार्यालयाकडून मल्हार सिनेमाच्या दिशेने जाणारा रस्ताही रिक्षांनी व्यापलेला असतो.