गुलाबी थंडीत ‘तालुका कला-क्रीडा महोत्सवा’ला सुरुवात; ५४ हजार स्पर्धकांचा सहभाग

गुलाबी थंडीत वसईमध्ये ‘कला-क्रीडा महोत्सवा’ला सोमवारी सुरुवात झाली. विविध स्पर्धा, कला प्रकार, सांस्कृतिक कार्यक्रम आणि जोडील जत्रेची जोड यामुळे वसईला उत्सवाचे स्वरूप आले आहे. वसईच्या चिमाजी अप्पा मैदान आणि न्यू इंग्लिश शाळेत या स्पर्धा भरल्या असून त्यात विविध कला आणि क्रीडा प्रकारांत ५४ हजार स्पर्धकांनी भाग घेतला आहे.

यंग स्टार ट्रस्ट आणि वसई तालुका कला-क्रीडा विकास मंडळातर्फे वसई-विरार महापालिकेच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदा महोत्सवाचे हे २६ वे वर्ष आहे. शनिवारी प्रसिद्ध अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. या वेळी क्रिकेटपटू धवल कुलकर्णी, अभिषेक नायर, दिग्दर्शक अमोल गुप्ते, महोत्सवाचे अध्यक्ष आमदार हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर, महापौर प्रविणा ठाकूर, आयुक्त सतीेश लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या महोत्सवाच्या क्रीडा स्पर्धा चिमाजी अप्पा मैदानात सुरू आहेत. ६८ क्रीडा प्रकारांचा त्यात समावेश आहे, तर न्यू इंग्लिश स्कूलमध्ये ३४ क्रीडा प्रकार सुरू आहेत. नाताळच्या सुट्टय़ांमध्ये हा महोत्सव वसईकरांसाठी खास पर्वणी ठरत असतो. त्यामुळे येथील स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहण्यासाठी वसईकरांची गर्दी उसळत असते. रविवारी शाहीर वनमाळी अकादमीचा ‘वारसा असा लाभला’ हा कार्यक्रम संपन्न झाला.

वसईकरांना नववर्षांचे स्वागताचा आनंद घेता यावा यासाठी दरवर्षी महोत्सवातर्फे मैदानात करमणुकीचे कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यानंतर आकर्षक रोषणाई करून नववर्षांचे स्वागत करण्यात येते. ते पाहण्यासाठी हजारो वसईकर चिमाजी अप्पा मैदानात हजर असतात.

महोत्सवाची वैशिष्टय़े

*न्यू इंग्लिश शाळेत एकांकिका स्पर्धा सुरू आहेत. या ठिकाणीे वसईतल्या हौशी रांगोळीकारांनी काढलेल्या रांगोळ्या आणि महाविद्यालयी  विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध कलाकृती लक्षवेधी ठरत आहेत.

*वसईतल्या खास खाद्यपदार्थाचा स्टॉल या ठिकाणीे भरविण्यात आला आहे.

*किक बॉक्सिंग स्पर्धा आणि जलतरण स्पर्धेचा यंदा समावेश करण्यात आला आहे.

*सॅलड डेकोरेशन, एकांकिका, लघुचित्रपट स्पर्धा, पाककला स्पर्धा, प्रश्न मंजुषा, पुष्परचना, नाताळ गोठे स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा आदी स्पर्धा  महोत्सवाचे वैशिष्टय़ ठरत आहे.

*देहदान करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी खास स्टॉल उभारण्यात आला असून देहदान, नेत्रदानाविषयी माहितीे देण्यात येऊन अर्ज भरून  घेतले जात आहे.