पै फ्रेण्ड्स लायब्ररी, डोंबिवली
सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या डोंबिवलीत अतिशय झपाटय़ाने वाचन संस्कृतीचा प्रसार होत आहे. शहरातील वाचन संस्कृतीत मोलाचे योगदान देणाऱ्या संस्थांपैकी एक पै फ्रेण्ड्स लायब्ररी आहे. नवीन वर्षांच्या पहिल्याच दिवशी या वाचनालयाने एक हजाराहून अधिक सदस्य नोंदणी केली आहे. ग्रंथालये सुसंस्कृत जीवनाचा आरसा असतात, याची जाणीव असलेल्या पुस्तकवेडय़ा पुंडलिक पै यांचे हे कार्य खरोखरीच वाखाणण्याजोगे आहे. विविध विषय शाखांची पुस्तके उपलब्ध करून दिल्याने हे ग्रंथालय शिक्षण केंद्र बनले आहे.  
पुंडलिक पै हे मूळचे कन्नड भाषिक. १५ सप्टेंबर १९६४ रोजी त्यांचा जन्म झाला. डोंबिवली येथे त्यांनी शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतले. कन्नड भाषेत शिक्षण घेतले असले तरी मराठीवर त्यांचे कमालीचे प्रभुत्व आहे. पेंढरकर महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच ते एका पुस्तकाच्या दुकानात नोकरी करीत होते. तिथे बाबुराव अर्नाळकर यांची पुस्तकं वाचून त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली. त्याच वेळी त्यांनी ठरवले की नोकरी न करता स्वत:चा एक व्यवसाय सुरू करायचा. त्यातही ग्रंथालय उभारण्याचे त्यांचे स्वप्न होते. वाचकांना पुस्तकांपर्यंत येणे कठीण वाटत असेल, तर पुस्तकांनीच वाचकांपर्यंत जायला हवे, असे त्यांना मनोमन वाटत होते. वाचन संस्कृतीचा प्रसार करण्याच्या विचाराने भारावलेल्या पै यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होताच २२ मे १९८६ रोजी मंजुनाथ पै या आपल्या भावाकडून आर्थिक सहाय्य घेऊन टिळकनगर येथे प्रथम पै लायब्ररी सुरू केली. तेव्हा त्यांच्या लायब्ररीमध्ये केवळ १०० पुस्तके होती. अवघ्या शंभर पुस्तकांनिशी सुरू झालेल्या या वाङ्मय यज्ञाने डोंबिवलीत पुढे स्वत:चा खास वाचकवर्ग निर्माण केला. डोंबिवली शहरात एका चांगल्या खासगी ग्रंथालयाची भर पडली.
ग्रंथालये ही सुसंस्कृत समाजजीवनाचा आरसा असतात याची जाणीव पुंडलिक पै यांना असल्याने त्यांनी ग्रंथालयासाठी अविरत कष्ट घेतले. हळूहळू पुस्तकांची व सभासदांची संख्या वाढू लागली. एका शाखेनंतर दुसरी शाखा असा विस्तार वाढला. सध्या डोंबिवलीत पै फ्रेण्ड्स लायब्ररीच्या सहा शाखा आहेत. या सहा शाखांमध्ये मराठी, इंग्रजी, हिंदी, कन्नड, गुजराथी आदी भाषांमधील सुमारे २ लाख पुस्तकं उपलब्ध आहेत. अनेकांना पुस्तक विकत घेणे परवडत नाही. त्यांच्यासाठी पै लायब्ररी वरदान ठरली आहे.
मुलं वाचनापासून वंचित होत असल्याचा समजही फ्रेण्ड्स लायब्ररीने खोटा ठरवला आहे. बाल सभासदांच्या वाढत्या संख्येमुळे बालवाचनालय हा स्वतंत्र विभाग त्यांना सुरू करावा लागला आहे. येथे मराठी भाषेतील १० हजार पुस्तकं उपलब्ध आहेत. बालवाचकांची संख्या दीड हजारांहून अधिक आहे, तर ऑनलाईन सभासदांची संख्या दोन हजार आहे. लायब्ररीचे प्रौढ सभासद ९ हजारांहून अधिक आहेत. त्यातील बहुतेक नोकरदार वर्ग असल्याने वाचनालयाच्या वेळा त्यांच्या सोयीनुसार ठरवण्यात आल्या आहेत. दूरध्वनीवरून नोंदवलेले हवे ते पुस्तक दुसऱ्या दिवशी घरपोच हाती पडू लागल्याने वाचकवर्ग सुखावला. यासाठी पै यांनी प्रभावी यंत्रणा उभारली आहे. आठ-दहा तरुणांना त्यातून रोजगार मिळतो. सर्व ग्रंथांची संगणकीकृत नोंदणी केली असल्याने संगणक हाताळणाऱ्या वाचकांना ते अतिशय सोयीचे झाले आहे.
डोंबिवलीचा शैक्षणिक विकास मोठय़ा प्रमाणात होत आहे. महाविद्यालयीन व उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या येथे मोठय़ा प्रमाणात आहे. या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी निवांत असे ठिकाण नाही, हे पाहून ३० डिसेंबर २००९ मध्ये त्यांनी एक अभ्यासिका सुरूकेली. येथे वैद्यकीय, अभियांत्रिकी, सीएच्या विद्यार्थ्यांना लागणारी सर्व पुस्तके उपलब्ध आहेत. अठरा तास ही अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असते. अल्पावधीतच एक अभ्यासिका अपुरी पडू लागल्याने त्यांना दुसरी अभ्यासिकाही सुरू करावी लागली. आता दोन्ही अभ्यासिका अपुऱ्या पडू लागल्याने तिसऱ्या अभ्यासिकेसाठी अधिक प्रशस्त जागेचा शोध सुरू पै यांनी सुरू केला आहे. भविष्यात डोंबिवली शहरात वाचन संस्कृतीचे आदर्श केंद्र उभारण्याचा पै यांचा निर्धार आहे.
शर्मिला वाळुंज

 tv16डोंबिवली शहरातील वाचन संस्कृतीत मोलाचे योगदान देणाऱ्या संस्थांपैकी एक ‘पै फ्रेण्ड्स लायब्ररी’ आहे. ग्रंथालये सुसंस्कृत जीवनाचा आरसा असतात, याची जाणीव असलेल्या पुस्तकवेडय़ा पुंडलिक पै यांनी या लायब्ररीची मुहूर्तमेढ रोवून केलेले कार्य खरोखरीच वाखाणण्याजोगे आहे.