आजूबाजूच्या परिसरात सिमेंट काँक्रीटचे जंगल आणि मोठमोठे टोलेजंग टॉवर उभे राहत असताना डोंबिवली शहरात आजही अशी काही गृहसंकुले आहेत, ज्यांनी आपला जुना चेहरा जपला आहे. निसर्गाच्या सान्निध्याला धक्का न लावता तेथेच छानसे गृहसंकुल उभारून आपली वेगळी ओळख या संकुलांनी कटाक्षाने राखली आहे. त्यातलेच एक म्हणजे- सीतारामनगर सोसायटी. सतत वाहनांनी गजबजलेल्या मानपाडा रोडला अगदी लागून असलेल्या या संकुलात प्रवेश करताच तुम्हाला एक वेगळ्या शांततेचा आणि निसर्गाच्या आत्मिक समाधानाचा अनुभव मिळतो.
डों बविली पूर्वेला स्टेशनपासून २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या अंबिकानगरमध्ये सीतारामनगर हे संकुल गेल्या २५ वर्षांपासून आहे. हे संकुल उभे राहण्याच्या आधी येथे केवळ घनदाट झाडे आणि झुडपांचे जंगल होते. तुरळक लोकवस्ती होती. शेतातील बांधावरून वाट तुडवत येथील रहिवासी स्थानक परिसर गाठत असत. आताही परिसरातील गावदेवी मंदिर त्या काळाची साक्ष देत उभे आहे.
शेतातली वाट तुडवत स्थानक गाठणे, सुट्टीच्या दिवशी सकाळ-संध्याकाळ बाजूच्याच विहिरीमध्ये पोहायला जाणे, विविध प्रकारचे पक्षी पाहात दिवस कधी जात होता हे कळतही नसल्याचे येथील जुने रहिवासी सांगतात. १९९०-९१ मध्ये येथे प्रथम सीतारामनगर सोसायटी उभी राहिली, त्यानंतर राधानगर व राधाकृष्ण या सोसायटय़ा उभ्या राहिल्या. या तिन्ही सोसायटय़ांचे मिळून एक संकुल असले तरी त्यांचे आज स्वतंत्र व्यवहार आहेत. या तिन्ही सोसायटय़ांमध्ये आता साधारणपणे १५० कुटुंबे वास्तव्यास आहेत, तिन्ही सोसायटय़ांचे व्यवहार वेगळे असले तरी सण-उत्सवांच्या काळात तसेच अडीअडचणीला येथील नागरिक एकमेकांच्या मदतीला धावून येतात.
सीतारामनगर सोसायटीतील ईशा वेलदे सोसायटीविषयी माहिती सांगताना म्हणाल्या, डोंबिवलीत आज सिमेंट काँक्रीटची जंगले उभी राहात असताना आमचे संकुल त्याला अपवाद आहे. या संकुलात तीन स्वतंत्र संकुले आहेत. त्यातील सीतारामनगर या गृहसंकुलात एकूण ७० कुटुंबे आहेत. सुशिक्षित मध्यम व उच्च मध्यमवर्गीय मंडळी येथे राहतात. आज सर्वत्र पाणी, वीज, रस्ते या मूलभूत सुविधांची वानवा जाणवते, मात्र हे संकुल सर्व सोयी-सुविधांनी सुसज्ज आहे. डोंबिवली स्थानकापासून २० ते २५ मिनिटांच्या अंतरावर वसलेले हे संकुल शहरातील मुख्य रस्ता म्हणजेच मानपाडा रोडला लागूनच असल्याने येथील नागरिकांना इतर कोणत्याही असुविधांचा सामना कधी करावा लागला नाही. मानपाडा रोडला सर्व सुविधा उपलब्ध आहेत. याच रोडवर गावदेवी मंदिरापासून थोडे पुढे आले की हे संकुल लागते. मानपाडा परिसर सतत वाहन व माणसांनी गजबजलेला असतो, परंतु आमच्या संकुलात मात्र नीरव शांतता आहे. कारण आम्ही निसर्गाचे सान्निध्य पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केला असून, सोसायटीतील सर्व रहिवाशांनी त्याला साथ दिली आहे. निसर्गाचे सौंदर्य अबाधित राखण्यासाठी सोसायटीच्या आवारात आम्ही बदाम, नारळ, पोफळी, कडूनिंब, आंबा, कढीपत्ता, उंबर, गुलमोहर, पारिजात, जास्वंद, माड तसेच काही शोभेची झाडे पाच-सहा वर्षांपूर्वी लावली. या झाडांचे आता मोठय़ा वृक्षात रूपांतर झाले असून त्यांची गर्द सावली सर्वाना एक सुखद आनंद देऊन जाते. या झाडांची निगा, पाणी घालणे, खत घालणे आदी सर्व गोष्टी सोसायटीतील नागरिकच आनंदाने करतात.
आता मुंबई व आसपासच्या शहरात आधुनिक विकासाच्या नावाखाली खेळासाठी मैदाने उरली नाहीत, त्यामुळे मुलांचे बालपण, टी.व्ही., मोबाइल, संगणक यांच्यात करपून जाते. मुलांचे बालपण कोमेजू नये म्हणून सोसायटीमध्ये मुलांसाठी माती असलेली थोडी जागा सोडण्यात आली आहे. जेणेकरून मातीतील खेळाचा आनंद मुलांना घेता येईल, तसेच घसरगुंडी, झोपाळा या खेळण्यांसोबतच एक स्पोर्ट्स क्लबही उभारण्यात आले आहे. येथे बॅडमिंटन, कॅरम, बुद्धिबळ असे खेळ लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कुणीही खेळू शकेल. बॅडमिंटनसाठी स्वतंत्र मैदानच तयार केले आहे. सोसायटीच्या आवारात मोकळी जागा भरपूर असल्याने सायकल, खो-खो, कबड्डी, लंगडी असे खेळ मुले खेळतात.
विहिरीचे पाणी, सीएफएलचे दिवे
सोसायटीच्या आवारात फार पूर्वीपासून एक विहीर आहे. चौकोनी विहीर म्हणून ही विहीर प्रसिद्ध आहे. येथे पूर्वी लहान मुले, तरुण मंडळी पोहावयास जात असत. ही विहीर स्वच्छ करून त्याचे पाणी आम्ही घराघरांत इतर सुविधांसाठी पुरविले आहे, तसेच कूपनलिका खोदण्यात आली असून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त इतर गोष्टींसाठी हे पाणी २४ तास उपलब्ध असते. पिण्याचे पाणी महापालिकेकडून सकाळी एक तास येत असल्याने ते पुरेसे असते. विजेची समस्या येथे कधी भेडसावली नाही. सोसायटीचा परिसर मोठा असल्याने आवारात विजेची सोय नव्हती. पालिकेकडे पत्रव्यवहार करून येथे पथदिवे लावून घेतले आहेत. वीज वाचविण्यासाठी इमारतीत व इमारतीच्या अवतीभोवती सी.एल.एफ.चे दिवे बसविण्यात आले आहेत.

ज्येष्ठांसाठी विरंगुळा कट्टा
ज्येष्ठांसाठी विरंगुळा कट्टा उभारण्यात आला आहे. सकाळ-संध्याकाळ ज्येष्ठ नागरिक येथे वृक्षवेलींच्या सान्निध्यात फेरफटका मारतात. या कट्टय़ावर बसून गप्पागोष्टी आणि हितगुज करतात. यामुळे त्यांनाही एकटेपणाची जाणीव होत नाही. आवारात खेळणाऱ्या मुलांसोबत त्यांचाही वेळ सहज निघून जातो. सोसायटीत सण-उत्सवही मोठय़ा आनंदात साजरे होतात. नवरात्र, दसरा, सत्यनारायणाची महापूजा, हळदीकुंकू असे सण साजरे होतात, तसेच २६ जानेवारी, १५ ऑगस्ट या दिवशी ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते झेंडावंदन होते. ज्येष्ठांचा अशा प्रकारे मान राखला जात असल्याने त्यांनाही बरे वाटते.
सोसायटीत सांडपाणी निवारणाची प्रचंड गैरसोय होती, तसेच मुख्य रस्त्याकडे येणारी वाट चिंचोळी होती. रस्त्याची उंची वारंवार वाढत गेल्याने सोसायटीचा परिसर काहीसा खाली गेला आहे. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याचा त्रास काही प्रमाणात होतो, परंतु सोसायटीतील गटारांची रचना आणि रस्त्यावरील गटारांमुळे येथे मोठी वाहने येण्यास प्रचंड अडथळे निर्माण होत होते. मात्र आता नगरसेवक महेश पाटील यांच्या सहकार्याने गटारे नव्याने बांधण्यात आली आहेत, त्यामुळे मोठी वाहने आत येण्यास कोणताही अडथळा नाही. तसेच सोसायटीत चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. समोरच मोठमोठे शोरूम झाले असल्याने येथे येणारी वाहने उभी करण्यासाठी नागरिक या सोसायटीतील आवाराचा वापर करीत असत. असे होऊ नये म्हणून सोसायटीच्या मुख्य प्रवेशद्वारावर आता सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात आली असल्याचे प्रकाश वेलदे यांनी सांगितले. तसेच सोसायटीची वाहने ओळखता यावीत म्हणून वाहनांना विशिष्ट लोगो देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
अरुण नायक, सुनील देशपांडे, नित्यानंद उपाध्याय, प्रकाश वेलदे, अरविंद ठाकूर, फ्रेनी पाटोळे, सुहास कुलकर्णी, सूर्यकांत शेट ही मंडळी सोसायटीच्या कार्यकारिणीत आहेत.