ऐतिहासिक कल्याण शहराला सांस्कृतिक उपक्रमांचीही फार मोठी परंपरा आहे. त्या परंपरांचे जतन करण्याचे कार्य विविध संस्था करीत आहेत. अनंत वझे संगीत, कला आणि क्रीडा प्रतिष्ठान ही त्यापैकीच एक. अलीकडेच संस्थेचा २० वा वर्धापन दिन झाला. त्यानिमित्त..

नव्या पिढीने पुढाकार घेतला तरच परंपरेचे पालन होऊ शकते. कल्याणमधील अनंत वझे संगीत, कला आणि tv07क्रीडा प्रतिष्ठान गेली दोन दशके शहरातील अशाच एका परंपरेचे कसोशीने जतन करीत आहे. कला, क्रीडा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात कार्य करण्यासाठी २ मे रोजी १९९५ रोजी संस्थेची स्थापना झाली असली तरी मुख्यत: अभिजात संगीताचा प्रसार हे संस्थेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
थोरामोठय़ा कलाकारांसाठी मुक्त व्यासपीठ असलेला १९३४ पासून अखंड सुरू असलेला कै.आप्पासाहेब वझे यांचा ‘रियाझखाना’ पुढे चालू रहावा म्हणून डॉ. दीपक वझे (कै.आप्पांचे नातू) आणि त्यांचे स्नेही डॉ. प्रताप पानसरे यांनी प्रतिष्ठानची स्थापना केली. त्या दोघांच्या पत्नी डॉ. गौरी वझे आणि डॉ. ईशा पानसरे प्रतिष्ठानच्या विश्वस्त आहेत. तसेच कल्याणमधील चार्टर्ड अकाऊण्टण्ट(सी.ए.) सतीश आणि रश्मी पटवर्धन हे प्रतिष्ठानचे सभासद आहेत. कै. आप्पांनी भारतरत्न पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर, पद्म्विभूषण आशा भोसले, पं. जसराज, पं. राम मराठे, बालगंधर्व आदी दिग्गजांना विविध कार्यक्रमांत संवादिनीवर साथ केली होती.
शास्त्रीय संगीतातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, गरजू कलाकारांना आवश्यक ते सहाय्य करणे, भारतीय शास्त्रीय संगीताचा वारसा पुढे चालू रहावा म्हणून प्रयत्न करत राहणे आणि कला, क्रीडा आणि संगीत क्षेत्रातील नवनवीन कलाकारांमधील कलागुण शोधून त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे महत्त्वाचे कार्य अनंत वझे संगीत, कला व क्रीडा प्रतिष्ठान करते.
क्रीडाविषयक उपक्रम
प्रतिष्ठानतर्फे संगीताबरोबरच विविध प्रकारचे क्रीडाविषयक कार्यक्रम आयोजित केले जातात. ‘खेळ बुद्धिबळाचा ग्रँडमास्टरच्या संगे’ हा त्यातलाच एक विशेष उपक्रम. या उपक्रमाअंतर्गत बुद्धिबळातील विविध ग्रँडमास्टर्सना आमंत्रित केले जाते. ग्रँडमास्टर्स ३५ ते ४० मुलांशी एकाच वेळी बुद्धिबळाचा डाव मांडतात. उपक्रमात सहभागी होणाऱ्या ग्रँडमास्टर्सबरोबर प्रत्यक्ष खेळल्यामुळे खेळाडूंना प्रेरणा मिळते आणि ग्रँडमार्स्टसचे मार्गदर्शनही लाभते. आतापर्यंत तानिया सचदेव, प्रवीण ठिपसे, अभिजित कुंटे हे ग्रँडमास्टर्स; तसेच चंद्रशेखर गोखले आणि जयंत गोखले या आंतरराष्ट्रीय मास्टर्सनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहित केले आहे. बुद्धिबळ खेळाचे प्रशिक्षण प्रदीप सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली चालते. कॅरम खेळामुळे खेळाडूंच्या एकाग्रतेत वाढ होण्यास मदत होते. या धर्तीवर एप्रिल २०१५ मध्ये कल्याणात प्रथमच प्रतिष्ठानतर्फे एकेरी कॅरम स्पर्धा आयोजित करण्यात आली. कॅरम खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी नवे कॅरम बोर्ड उपलब्ध करून देण्यात आले. महिलांकरिता आयोजित कॅरम स्पर्धेत एकूण १३० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता.
आरोग्य सेवा
ठाणे-कल्याण परिसरातील आदिवासी पाडय़ांकरिता प्रतिष्ठानतर्फे विविध शिबिरे, बाल आरोग्य तपासणी, दंतरोग चिकित्सा, कॅन्सर निदान, हृदयरोग तपासणी, रक्त तपासणी, संपूर्ण आरोग्य तपासणी आदी उपक्रम चालवले जातात. रक्ततपासणी अंतर्गत हिमोग्लोबीन, रक्तशर्करा, एस्. जी.पी.टी., सेरम, क्रीट या तपासण्या करण्यात येतात तर मूत्रपिंड आणि यकृताच्या कार्यामध्ये काही अडथळा आढळल्यास त्यासंबंधीचे योग्य मार्गदर्शन रुग्णांना केले जाते. आदिवासी पाडय़ावरील बालकांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी दिसून येते. त्यामुळे त्यांना मोफत जीवनसत्त्वांच्या गोळ्या, औषधांचे वाटप करण्यात येते. स्त्रीरोग तपासणीअंतर्गत तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ञांकडून स्त्रीरोग आणि कर्करोग निदान तपासणी केली जाते. त्याचबरोबर ‘पॅप-स्मेअर’ तपासणीही करण्यात येते. गर्भाशयाच्या रोगाचे निदान केले जाते.  
दंत तपासणी करून दातांची निगा कशी राखावी, या विषयी संपूर्ण माहिती रूग्णांना देण्यात येते. त्याचप्रमाणे प्रतिष्ठानतर्फे घेण्यात येणाऱ्या हृदयरोग निदान तपासणी अंतर्गत इ.सी.जी काढण्यात येतो आणि हृदयरोग तज्ज्ञांकडून इ.सी.जी तपासणी केली जाते. नेत्ररोग तपासणीअंतर्गत डोळ्यांच्या विविध विकारांची तपासणी केली जाते आणि मोतिबिंदू असलेल्या रुग्णांसाठी विनामूल्य शस्त्रक्रियेची सोय केली जाते. ‘एक गाव दत्तक योजना’ हा स्तुत्त्य उपक्रम प्रतिष्ठानतर्फे राबविण्यात येतो. दरवर्षी एक गाव दत्तक घेऊन त्या गावातील स्त्री, पुरुष आणि बालकांसाठी विविध आरोग्य शिबिरांचे विनामूल्य आयोजन करण्यात येते. या वेळी मुलांना जीवनसत्त्वांच्या गोळ्या आणि टॉनिकचे मोफत वाटप करण्यात येते. त्याचप्रमाणे गावातील शाळेला एक संगणक भेट दिला जातो.
सांगीतिक मैफली
संगीत क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येते. विख्यात कथ्थक नर्तक पं. बिरजू महाराज, तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन, सिनेतारका हेमामालिनी, प्रख्यात गायिका कविता कृष्णमूर्ती, अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, प्रसिद्ध संतूरवादक पं. शिवकुमार शर्मा, प्रख्यात बासरीवादक पं. हरिप्रसाद चौरासिया, गायिका अलका याज्ञिक, पं. आनंद भाटे, पं. विजय घाटे (तबला-सोलो), राहुल देशपांडे, पं. केशव गिंडे, पं. राम देशपांडे, चंद्रशेखर वझे, पं. भरत तेलंग, पं. मनोहर कदम, रमाकांत होनप (व्हायोलिन), नीला भागवत, वंदना भागवत, कल्याणी साळुंके, शर्वरी जेमेनीस (नृत्य-शास्त्रीय), शीला भागवत (कथ्थक नृत्य) या शास्त्रीय कलाकारांचे, तर सुगम संगीतात स्वरचंद्रिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर, प्रसिद्ध पाश्र्वगायिका उत्तरा केळकर, बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर, महेश कंटे, नूपुर काशीद, निषाद बाक्रे आदी कलाकारांच्या मैफली प्रतिष्ठानने गेल्या काही वर्षांत यशस्वीपणे आयोजित केल्या. त्याचप्रमाणे दिलीप गोसावी (संवादिनी), अनिरुद्ध गोसावी (संवादिनी), अमृता साळवी (कथ्थक), सायली पहाडे (गायन आणि संवादिनी), सुशील पाठक (तबला), मनोज देसाई (गायन), प्रीती व्होरा (भरतनाटय़म), पं. भरत तेलंग (गायन) हा विद्यालयाचा शिक्षकवृंद असून दरवर्षी विद्यालयातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा कार्यक्रम आयोजित केला जातो. ‘प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला रसिकांचा नेहमीच प्रतिसाद मिळत असतो.

navi mumbai municipal administration playing hide and seek with tenders amount
कामांच्या निविदा रकमांबाबत लपवाछपवी; नवी मुंबई शहरातील ठेकेदार महापालिका प्रशासनाच्या संगनमताची शंका
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान
Using skin lightening cream can cause kidney cancer
सावधान! त्वचा उजळणारे क्रिम वापरताय तर हे नक्की वाचा…
ie think our cities
IE THINC Second Edition: “लवकरच असमानता आणि हवामान बदल ही आपल्या शहरांसमोरची सर्वात मोठी आव्हानं ठरतील!”