काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची टीका

‘‘स्वच्छ सरकार देण्याचा दावा करणारे भाजप सरकार जमिनीपासून चिक्कीपर्यंत सर्व खाण्यात गुंतले आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांच्या अनुभवावरून केंद्रात आणि राज्यात फेकू सरकार असल्याचे लोकांच्या आता लक्षात आले आहे,’’ अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी मीरा रोड येथे केली.

काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण यांची जाहीर सभा शांतीनगर येथे आयोजित करण्यात आली होती. नोटाबंदी आणि त्या पाठोपाठ आलेली जीएसटी यामुळे मुंबईतला व्यापारी त्रस्त झाला आहे. व्यापाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची भीती दाखवण्याचे काम हे सरकार करत असून सध्या लोकांना घाबरवून मते घेण्याची नवी पद्धत सुरू झाली आहे. काँग्रेसने सामान्यांना त्रास देऊन कधीही मते घेतली नाहीत. राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तेत एकत्र आहेत, सत्तेत बसल्यावर सर्व गोष्टी एकत्रितपणे करतात आणि बाहेर आल्यानंतर मात्र त्यांचा एकमेकांवर भरोसा नाही, अशी परिस्थिती आहे.

एसआरए घोटाळ्यात अडकलेले गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता आणि भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांच्यात फार फरक नाही, असा टोला अशोक चव्हाण यांनी या वेळी लगावला. उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये झालेल्या बालकांच्या मृत्यूसारखी घटना पुन्हा होऊ नये, असे वाटत असेल तर काँग्रेसला साथ द्या, विकास केवळ काँग्रेसच करू शकतो, असे आवाहन चव्हाण यांनी या वेळी केले.

मेट्रो कशी येणार?

मीरा-भाईंदरमध्ये दोन वर्षांत मेट्रो आणण्याचे करण्यात येत असलेले दावे खोटे असून त्याबाबतचा अहवालच अद्याप तयार नसल्याने मेट्रो येणार कशी, असा सवाल माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी या वेळी केला. काँग्रेसने आणलेल्या नगरोत्थान योजनेमुळे मीरा-भाईंदरमध्ये अनेक योजनांसाठी निधी मिळाला आहे. आता या योजनांचे श्रेय भाजपवाले घेत आहेत. शहरात गेल्या वर्षी करण्यात आलेले रस्ता रुंदीकरण हे केवळ शासनाने टीडीआरसंदर्भात आणलेल्या नव्या तरतुदीचा लाभ उकळण्यासाठीच करण्यात आले असल्याचा आरोप माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी या वेळी केला. या सभेला माजी मंत्री राजेंद्र गावीत, काँग्रेसचे प्रभारी राजेश शर्मा आदी उपस्थित होते.