तिकिटे काढण्याचा स्मार्ट पर्याय अशी ओळख असलेला एटीव्हीएम यंत्रणेला कल्याण रेल्वे स्थानकात बिघाडाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे प्रवाशांचा अनमोल वेळ वाया जात आहे. सीव्हीएम कुपन्स बंद
झाल्याने एटीव्हीएम हा विनारांग प्रवासासाठीचा एकमेव पर्याय सध्या प्रवाशांपुढे उपलब्ध आहे. असे असताना कल्याण रेल्वे स्थानकात २६ पैकी अवघी सात यंत्रे कशीबशी सुरू असल्याने तुडुंब गर्दीने भरलेल्या स्थानकातील प्रवाशांचे सध्या हाल सुरू आहेत.  
बाहेरगावाहून येणारे प्रवासी, शहरातील प्रवाशांची वर्दळ, रेल्वे फलाट क्रमांक एकजवळील रिक्षा थांबा, फेरीवाले अशा त्रासामुळे कल्याण रेल्वे स्थानकातील प्रवास आधीच जिकिरीचा बनला आहे. या स्थानकातील फलाट क्रमांक एकजवळ १५ एटीव्हीएम यंत्रे याआधी बसवण्यात आली आहेत. त्यामुळे या मशिन्सच्या साहाय्याने तिकीट काढणाऱ्यांची भली मोठी रांग या ठिकाणी लागलेली असते. १५ यंत्रांपैकी तब्बल पाच यंत्रे बंद अवस्थेत पाहायला मिळत आहेत. येथील काही यंत्रांमध्ये तांत्रिक अडचणींमुळे बिघाड निर्माण झाल्याचे दिसून येते, तर काही यंत्रे चक्क ताडपत्रीने झाकून ठेवली आहेत. परिणामी उर्वरित दहा यंत्रांवर रेल्वे प्रवाशांची तिकीट काढण्यासाठी झुंबड उडू लागली आहे.
कल्याण रेल्वे स्थानक फलाट क्रमांक एकसमोरील प्रवेशद्वाराजवळ दोन एटीव्हीएम यंत्रे बसविण्यात आली आहेत; परंतु त्यातील एक यंत्र बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होताना दिसते. कल्याण पश्चिम परिसराबरोबरच कल्याण पूर्वेतील प्रवाशांनाही एटीव्हीएम यंत्रणा ठप्प झाल्याने गैरसोयीस सामोरे जावे लागत आहे. कल्याण रेल्वे स्थानक फलाट क्रमांक सात बाहेर सहा एटीव्हीएम यंत्रे बसविण्यात आली आहेत. त्यापैकी एक यंत्र बंद आहे.  

एटीव्हीएम यंत्रणा दैनंदिन प्रक्रिया असून एक ए.टी.व्ही.एम. यंत्र सुरू होते, तर त्याचवेळी दुसरे मशीन बंद पडते.
– प्रदीपकुमार दास, व्यवस्थापक, कल्याण रेल्वे स्थानक

‘कल्याण टर्मिनस बनवू’ अशा बाता मारणाऱ्या प्रशासनाने एटीव्हीएमसारख्या मूलभूत गोष्टींकडे आधी लक्ष देणे गरजेचे आहे. रेल्वे प्रवाशांचे मूलभूत प्रश्न सोडविण्याऐवजी प्रशासन मोठी स्वप्ने दाखवत आहे.     – विराज सहस्रबुद्धे, प्रवासी, कल्याण