ठाण्यातील तब्बल ६० टक्के रिक्षाचालक दुसऱ्याच्या परवान्यावर अथवा भाडय़ाने रिक्षा चालवीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवसांपूर्वी रात्री साडेनऊच्या सुमारास एका रिक्षाचालकाने सहकाऱ्याच्या मदतीने प्रवासी तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर प्रादेशिक परिवहन आणि वाहतूक विभागाच्या नियमांचे उल्लंघन करून रिक्षा व्यवसाय करणाऱ्यांचा एका मोहिमेद्वारे शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यातून निम्म्याहून अधिक रिक्षाचालक दुसऱ्याच्याच परवान्यावर रिक्षा चालवून व्यवसाय करीत असल्याचे आढळून आल्याचे माहिती ठाण्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही यांनी दिली. शहरात आठ दिवसांत केलेल्या कारवाईत परिवहन विभागाला ४४८ रिक्षाचालक दोषी आढळून आले.

प्रत्यक्ष परवाना असणारे तब्बल ६० टक्के रिक्षाचालक आता विविध कारणांनी रिक्षा चालवीत नाहीत. मृत व्यक्तीच्या परवान्यावरही शहरात रिक्षा सुरू आहेत. भंगार रिक्षांचे प्रमाणही बरेच आहे. रिक्षामालकाला चालकाकडून एका दिवसाचे साधारण २५० ते ३०० रुपये भाडे मिळते. कसलेही सोयरसुतक अथवा जबाबदारी नसलेल्या या भाडेकरू रिक्षाचालकांमध्ये मुजोरीचे प्रमाण अधिक असल्याचे बोलले जाते.