‘आरटीओ’कडून १०३ रिक्षा चालकांचे परवाने दोन महिन्यांसाठी रद्द

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात बेशिस्तपणे रिक्षा चालवणे, रिक्षा वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून प्रवासी वाहतूक करणाऱ्या १३८ रिक्षा चालकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक विभागाने मंगळवारी कारवाई केली. या कारवाईत १०३ रिक्षा चालकांचे रिक्षा प्रवासी वाहतूक परवाने साठ दिवसांसाठी निलंबित केले आहेत.

कल्याण पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ असणाऱ्या आगारातील एका बस चालकाला एका उद्दाम रिक्षा चालकाने शिवीगाळ व मारहाण करून त्याच्या हाताला कडकडून चावा घेतला होता. भिवंडी येथेही रिक्षा चालकाने असाच प्रकार केला होता.

आगाराच्या मुख्य प्रवेशद्वारात रिक्षा उभ्या करायच्या आणि बस चालकाला बस चालविण्यात अडथळा निर्माण करायचा, ही रिक्षा चालकांची पद्धत दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच रिक्षा चालकांच्या या मुजोरीविरोधात कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी व वाहतूक विभागाला दिले होते.

त्याप्रमाणे मंगळवारी सकाळपासून ते संध्याकाळी उशिरापर्यंत कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील बेशिस्त, बेलगाम, उर्मट व आरटीओची नामपट्टी नसलेल्या, गणवेश न घालता रिक्षा चालविणाऱ्या, रिक्षा परवाना नसताना रिक्षा चालविणाऱ्या १३८ रिक्षा चालकांवर उपप्रादेशिक परिवहनच्या पथकाने कारवाई केली.

या जप्त केलेल्या सर्व रिक्षा आगारातील कोपऱ्यात उभ्या आहेत. या रिक्षा चालकांनी यापुढे कोणतेही बेशिस्त वर्तन करू नये, ‘आरटीओ’ची नामपट्टी (लायसन्स बॅज) नसलेल्या १०३ रिक्षा चालकांचे परवाने पुढील ६० दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.

या कठोर कारवाईमुळे रिक्षा चालकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील बेशिस्त रिक्षा चालकांवरील कारवाई यापुढे सुरूच ठेवण्यात येणार आहे. यात कोणाचीही गय केली जाणार नाही, असे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर नाईक यांनी ‘लोकसत्ता ठाणे’शी बोलताना सांगितले.

डोंबिवली पश्चिमेला रिक्षाचालकांकडून प्रवाशांची लूट

डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षाचालकांनी मनमानी भाडेवाढ करून बुधवारी सकाळपासून प्रवाशांची लुटमार सुरू आहे. या भाडेवाढीवरून प्रवासी आणि रिक्षाचालकांमध्ये वाद सुरू झाले असून वाढीव रुपया कसला घेता, अशी विचारणा प्रवाशांकडून रिक्षाचालकांना होत आहे. शिवाय या रिक्षाचालकांवर उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा वचक आहे की नाही, असा संतप्त सवालही उपस्थित होत आहे.

उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी (आरटीओ) कोणत्याही प्रकारच्या नवीन रिक्षा भाडेवाढीला परवानगी दिलेली नसताना डोंबिवली पश्चिमेत महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षाचालकांनी बुधवारी सकाळपासून ‘आरटीओ’ अधिकाऱ्यांच्या प्रस्तावित दरपत्रकाला न जुमानता परस्पर, मनमानीने एक रुपयाची भाडेवाढ करून प्रवाशांना लुटण्यास सुरुवात केली आहे.

महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षाचालकांवर रिक्षाचालक-मालक संघटनेचे पदाधिकारी विकास मोरजकर, रिक्षाचालक-मालक युनियनचे शेखर जोशी यांचा दबदबा आहे. मंगळवारी मोरजकर यांच्याशी संपर्क साधून ‘फुले रस्त्यावरील रिक्षाचालक वाढीव भाडे आकारण्याच्या प्रयत्नात आहेत का,’ असा प्रश्न त्यांना केला, तेव्हा त्यांनी, ‘अशी कोणतीही भाडेवाढ प्रस्तावित नाही. आरटीओ अधिकाऱ्यांनी जे भाडय़ाचे फलक लावले आहेत. त्याच फलकानुसार भाडे आकारण्यात येत आहे,’ असे स्पष्ट केले.

तर शेखर जोशी यांनीही, ‘आमच्या रिक्षा संघटनेने कोणत्याही प्रकारची भाडेवाढ केलेली नाही. आमच्या रिक्षाचालक सदस्यांनी प्रवाशांकडून कोणत्याही प्रकारचे वाढीव भाडे आकारण्यास सुरुवात केलेली नाही. असा कोणी रिक्षाचालक वाढीव भाडे आकारत असेल तर त्याचे नाव आम्ही आरटीओ अधिकाऱ्यांना सांगून त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करू,’ असे सांगितले. मग, महात्मा फुले रस्त्यावरील रिक्षाचालकांना वाढीव भाडे आकारण्यामागे कोणती छुपी शक्ती काम करीत आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

गेल्या आठवडय़ापूर्वी डोंबिवली पूर्व भागात ‘लाल बावटा’ रिक्षा संघटनेने आरटीओची परवानगी न घेता स्वमर्जीने रिक्षा भाडेवाढ प्रस्तावित केली होती. या भाडेवाढीविरोधात परिवहन आयुक्तांपर्यंत तक्रारी गेल्यानंतर आरटीओ अधिकाऱ्यांनी ‘लाल बावटा’ संघटनेचे वाढीव भाडय़ाचे दर फलक काढून टाकले आणि अशा प्रकारचे वाढीव भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाईदेखील केली होती. तशीच कारवाई महात्मा फुले रस्त्यावरील वाढीव भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांवर करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.

परिवहन विभागाने कोणत्याही नवीन रिक्षा प्रवासी भाडेवाढीला परवानगी दिलेली नाही. डोंबिवलीत फुले रस्त्यावरील रिक्षाचालक छुप्या पद्धतीने प्रवाशांकडून वाढीव भाडे आकारत असतील तर ते चूक आहे. अशा बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई होईल. कल्याणनंतर डोंबिवलीतदेखील नियमबाह्य़ प्रवासी वाहतूक, भाडे वाढीच्या तक्रारी असणाऱ्या रिक्षाचालकांवर कारवाई होणार आहे.

नंदकिशोर नाईक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण