ठाण्यातील नाटय़मय या संस्थेने एकांकिकांच्या माध्यमातून जाणिवांची जागृती या हेतूने गेल्या रविवारी ‘ती आणि आपण’ तसेच ‘मुस्काट’ या एकांकिकांचे गडकरी रंगायतन येथे सादरीकरण केले. या एकांकिकांद्वारे घटना घडल्यानंतर फक्त चर्चा करण्यापेक्षा त्यावर स्वत: उपाय शोधणे खूप गरजेचे असल्याचा संदेश कलेच्या माध्यमातून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
प्रदीप वैद्य लिखित, अमोल भोर आणि साईनाथ गनुवाड दिग्दर्शित ‘ती आणि आपण’ या एकांकिकेमधून महिलांवर विविध प्रकाराने होणारे अत्याचार व त्या घटनांचे समाजातील विविध स्तरांवर उमटणारे पडसाद मांडण्यात आले आहेत. मुस्काटच्या माध्यमातून कलावंतांच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा मुद्दा आहे.
या एकांकिका पाहण्यासाठी आलेल्या संपदा जोगळेकर यांनी नाटय़मय संस्थेतर्फे राबविण्यात येणारा हा उपक्रम खूप चांगला असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या प्रयोगशील उपक्रमांमुळे कलावंत घडत असतात, असेही त्या म्हणाल्या. नाटय़मय संस्थेच्या सर्व उपक्रमांना उपस्थित राहणाऱ्या संपदा जोगळेकर यांनी लेखक-दिग्दर्शकांचे कौतुक केले.