गेल्या काही वर्षांत बदलापूर आणि अंबरनाथ या दोन शहरांची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. त्याचा परिणाम सर्वच सार्वजनिक सुविधांवर झाला. महावितरणचा वीजपुरवठाही त्याला अपवाद नाही. झपाटय़ाने ग्राहकांची संख्या वाढल्याने, शहराची एकूण विजेची मागणी वाढली. त्यामुळे सहाजिकच उत्पन्नातही भर पडली. मात्र त्या तुलनेत सुविधा नसल्याने सेवेचा दर्जा घसरला. त्यामुळे गेली काही महिने बदलापूर शहरातील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. दुरुस्तीच्या मर्यादा, नियोजनाचा अभाव यामुळे नागरिकांना सातत्याने विजेच्या लपंडाव सहन करावा लागत आहे.

बदलापूर आणि अंबरनाथ ही शहरे झपाटय़ाने वाढत आहेत. दरवर्षी शेकडो कुटुंबे येथे स्थलांतरीत होत असतात. त्यामुळे वीज, पाणी, रस्ते यांवर त्याचा मोठा परिणाम पहायला मिळतो आहे. पाणी पुरवठय़ाने सध्यातरी अंबरनाथ तालुका समृद्ध आहे. चिखलोली धरण, बॅरेज बंधारा, बारवी धरण, भोज धरण अशी जलसंपदा शेजारी असल्याने तालुक्याचा पाणी प्रश्न पुढील काही वर्षांसाठी मिटला आहे. एमएमआरडीएच्या माध्यमातून रस्त्यांचा दर्जा सुधारत आहे. चांगल्या रस्त्यांचे जाळे शहरात विणले जात आहे. मात्र वीज वितरणाचा प्रश्न अतिशय गंभीर आहे. परिणामी मोठय़ा आशेने चौथ्या मुंबईच्या आश्रयास आलेल्यांचा भ्रमनिरास होत आहे.

विशेषत: बदलापूर शहरात गेल्या काही वर्षांत महावितरणाच्या कारभाराचा फटका बांधकाम व्यावसायिक, छोटे उद्योजक आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठय़ा प्रमाणावर बसला आहे. सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा, दुरुस्तीच्या कामासाठी लागणारा वेळ, मीटरचा तुटवडा, वाढत्या मागणीच्या तुलनेत अत्यंत अपुरा वीजपुरवठा अशा अनेक गोष्टींमुळे महावितरणाचा कारभार वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. बदलापूर शहराची लोकसंख्या सध्या अडीच लाखांच्या जवळपास पोहोचली असून सव्वा लाखाच्या जवळपास वीज ग्राहक आहेत. कोटय़वधी रुपयांचे उत्पन्न महावितरणाला बदलापुरातून मिळते. शिवाय त्याची वसुलीही चांगल्या पद्धतीनेच होत असल्याने नुकत्याच जाहीर झालेल्या भारनियमनातून बदलापूरला वगळण्यात आले होते. असे असले तरी शहरातील विजेच्या समस्या संपताना दिसत नाही. त्यादृष्टीने महावितरण काही नियोजनही करताना दिसत नाही. वाढत्या मागणीचा विचार करून काही प्रकल्प सुरू केलेच तर त्यातही मोठा काळ जात असल्याने भविष्यातील नियोजन फिस्कटल्याचे समोर आले आहे. बदलापूर शहरातील विविध गटांतील असे ५ फिडर आहेत. त्यात मोठय़ा प्रमाणावर निवासी ग्राहक संख्या आहे. याची मागणी दिवाळी, ऐन उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणावर वाढत असते. एखाद्या फिडरचा विचार केल्यास एरंजाड फिडरमध्ये ४९७ अ‍ॅम्पीयरने पुरवठा होत असतो. मात्र गेल्या काही दिवसात येथे ५२४ अ‍ॅम्पीयरहून अधिक विजेची मागणी होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे येथे वाढीव मागणीचा ताण पडल्याने अनेकदा वीजपुरवठा खंडित होतो. शहरातील इतर फिडरचीही अशीच

अवस्था आहे. साधारणत: ७० ते ८० अ‍ॅम्पीयरने विजेची मागणी वाढल्याचे गेल्या काही महिन्यात निदर्शनास आले आहे. शहरात दरवर्षी सरासरी दोन ते तीन हजार नव्या वीज ग्राहकांची भर पडते. त्यातुलनेत पुरवठा होत नाही.  त्याचा फटका सर्वच नागरिकांना बसतो आहे.

एखाद्या भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याचा परिणाम इतर भागांवर होत असतो. कारण वीजपुरवठा नक्की कुठे खंडित झाला आहे हे शोधण्यासाठी संपूर्ण भागाची वीज बंद करावी लागते. त्यावर उपाय म्हणून आरएमयू या यंत्राची गरज असते. सध्या साधारणत: ५०० विजेच्या खांबांसाठी तीन आरएमयू यंत्र आहे. त्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. मात्र खर्च अधिक असल्याने महावितरण प्रशासन ते टाळते. त्याऐवजी एबी स्विचसारख्या कळ जोडल्यासही प्रश्न मिटू शकतो. काही हजार रुपयांत या कळ जोडता येऊ  शकतात. मात्र त्या मागणीकडेही महावितरणने दुर्लक्ष केले आहे. या सुविधांअभावी एका भागाचा वीजपुरवठा खंडित झाल्यास संपूर्ण फिडरची वीज बंद करून दुरुस्ती करावी लागते. त्यामुळे इतर ग्राहकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. ही झाली एकदम छोटी आणि स्वस्तातली सुधारणा. यासह शहरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी नवे स्विचिंग स्टेशन उभारणेही गरजेचे आहे. अंबरनाथ बदलापूर दरम्यान एका खासगी प्रकल्पात स्विच स्टेशनचे काम सुरू आहे. त्यामुळे बदलापूर शहरातील काही भागाची वीज समस्या मिटेल, असा अंदाज आहे. यासह इतर स्विचिंग स्टेशनची कामे इतर संस्थांशी योग्यरीत्या समन्वय होत नसल्याने रखडली आहेत. ग्राहकांकडून नव्या मीटरची मागणी आहे. मात्र तेही ग्राहकांना मिळत नसल्याने ग्राहक संताप व्यक्त करत आहेत. याशिवाय वीज बिलांचा घोळ, छायाचित्र नसलेली बिले, वाढीव बिले, बिलांसाठी नेमलेल्या कंत्राटदारांवर काही अधिकाऱ्यांची मेहेरनजर, त्यामुळे निर्ढावलेले कंत्राटदार अशा सर्व समस्याही ग्राहकांसमोर आहेत.

येत्या काळात चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरांकडे मोठा लोंढा वळणार आहे. त्या भविष्याचा विचार करून तात्काळ समस्या सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनी कामे करणे गरजेचे आहे. दहा वर्षांचे  नियोजन असलेला प्रस्ताव आठ वर्षांनी संमत होऊन नवव्या वर्षी अमलात येणार असेल तर याला महावितरणाच्या वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरावे लागेल. आजही महावितरणातील बहुतेक अभियंते पोलिसांप्रमाणे २४ तास शहराच्या भविष्याला डोळ्यासमोर ठेवून काम करतात. मात्र त्यांना त्यांच्याच वरिष्ठांकडून सहकार्य मिळत नसल्याचेही समोर आले आहे. पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या जाळ्याप्रमाणे अखंडित वीजपुरवठा हीसुद्धा शहराची प्राथमिक गरज आहे. महावितरण प्रशासनाने व्यवस्थेतील सारा घोळ निस्तरून वीजपुरवठय़ात सुधारणा करावी, अशीच समस्त बदलापूरकरांची मागणी आहे.