नगरसेवकांच्या प्रभागातील कामांसाठी  ५३ कोटींचा निधी आणला

पालिकेत स्वबळावर सत्ता स्थापन करण्याचे भाजपचे स्वप्न थोडक्यात हुकले असले तरी आपली सामथ्र्यता दाखविण्याची संधी भाजपने कुठेही सोडलेली नाही. त्याचाच भाग म्हणून स्थानिक आमदारांनी थेट एमएमआरडीएकडून शहरातील अंतर्गत रस्त्यांसाठी ५३ कोटी रुपयांचा भरघोस निधी आणून शिवसेनेवर चांगलीच कुरघोडी केली आहे.

बदलापूरमध्ये भाजपचे २० नगरसेवक आहेत. विकासकामे करण्यात पक्षाच्या नगरसेवकांना कोणतीही अडचण येऊ नये, याची पुरेशी खबरदारी पक्षाच्या वरिष्ठांनी घेतली आहे. शहर तसेच ग्रामीण भागातील रस्त्यांच्या कामासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून ५३ कोटी रुपयांचा मंजूर झालेला निधी या सर्वच नगरसेवकांच्या प्रभागात वापरण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते.  प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी तसेच एका प्रभागात दोन कोटींचे काम केले जाणार आहे. याशिवाय शहरातील महत्त्वाच्या ११ रस्त्यांसाठी ३२ कोटींचा निधी वापरण्यात येणार आहे. या सर्व रस्त्यांची कामे दिवाळीनंतर सुरू होणार असल्याचेही सांगण्यात येते.

गेल्या वर्षी शिवसेनेच्या माध्यमातून एमएमआरडीएकडून ३० कोटी रुपयांचा निधी शहरातील विविध रस्त्यांसाठी मंजूर करून घेण्यात आला होता. मात्र हा सर्व निधीही शिवसेनेच्या वतीने शहरातील शिवसेनेचे नगरसेवक असलेल्या प्रभागांत वापरण्यात आला होते. त्यामुळे त्याच गोष्टीची परतफेड करण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. मात्र शहरातील विविध भागांतील अंतर्गत रस्ते आणि महत्त्वाचे मोठे रस्ते काँक्रीटचे होणार असल्याने निधीच्या राजकीय स्पर्धेतून नागरिकांना मात्र चांगले रस्ते मिळणार आहेत. त्यामुळे या स्पर्धेमुळे नागरिकांत समाधानाचे वातावरण आहे.

वर्षभरात एमएमआरडीएकडून रस्त्यांसाठी १०० कोटी

गेल्या वर्षभरात बदलापूर शहरातील अंतर्गत आणि मोठय़ा रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी आतापर्यंत १०० कोटी रुपये एमएमआरडीएमार्फत मिळवले आहेत. त्यात नगरपालिका आणि स्थानिक आमदार यांच्या स्पर्धेतून हा मोठा निधी शहरात उपलब्ध झाला आहे. मात्र याचा योग्य आणि दर्जात्मक कामांसाठी  वापर व्हावा, एवढीच इच्छा नागरिक व्यक्त करत आहेत.