कुळगाव-बदलापूर नगरपालिकेने यंदाच्या निवडणुकीत निवडणूक कार्यक्रम पार पाडण्यासाठी अवलंबलेली ‘ई-प्रणाली’ पूर्ण क्षमतेने काम करत नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. उमेदवारांची प्रतिज्ञापत्रेच पूर्वीप्रमाणे कागदोपत्री पाहता येणार नसून यंदा ती राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर पाहता येतील, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. परंतु, या संकेतस्थळावर अद्यापही प्रतिज्ञापत्रे दिसत नसून उमेदवारांची मालमत्ता, त्यांच्यावरील गुन्हे अशी कोणत्याही उमेदवाराची माहिती पाहता येत नसल्याचे आता उघड झाले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या नगरपालिका निवडणुकांपासून निवडणुकीचे बहुतांश कामकाज ‘ई-प्रणाली’ंमार्फत करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार, मतदारांवर हरकती, नोंदणी, उमेदवारी अर्ज भरणे अशा अनेक प्रक्रिया या ‘ऑनलाइनच’ झाल्या होत्या. परंतु, पहिलाच प्रयोग असल्याने या प्रक्रियेत अनेक त्रुटी आढळल्याने  उमेदवारी अर्ज भरताना बऱ्याच जणांचे घोळ झाले होते. दरम्यान, याबाबत पालिकेचे मुख्याधिकारी देविदास पवार यांच्याकडून घेतलेल्या माहितीनुसार, राज्य निवडणूक आयोगाला येथून सर्व उमेदवारांची प्रतिज्ञापत्रे पाठविण्यात आली असून, ती लवकरच संकेतस्थळावर उपलब्ध होतील. असे त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
प्रतिज्ञापत्रे गुलदस्त्यात
उमेदवारी अर्जासोबत ज्प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांची वैयक्तिक माहिती नागरिकांना पाहावयास मिळते. परंतु, अजून तरी ही प्रतिज्ञापत्रे संकेतस्थळावर अद्याप उपलब्ध नाहीत. परंतु निवडणूक प्रचार संपण्यास आता एकच दिवस शिल्लक राहिल्याने उमेदवारांच्या बाबत अशी माहिती ऑनलाइन उपलब्ध झालेली नाही.