बदलापूर पालिकेच्या परवानगीनेच शाळेच्या आवारात आकाशपाळणे
गणेशोत्सवात रस्त्यात मंडप घालून नागरिकांची व वाहनांची अडवणूक करण्याचे प्रकार ही नित्याचीच बाब झाली आहे. तेच पेव आता माघी गणेशोत्सवातही फुटले असून माघी गणेशोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने रस्ते अडवण्याचे काम सुरू झाले आहे. बदलापुरातही पूर्वेला रेल्वे स्थानक परिसरात एका जुन्या सार्वजनिक माघी गणेश उत्सव मंडळाने जत्रेच्या माध्यमातून रस्त्यांच्या कडेला स्टॉल्सचे मंडप टाकून व जत्रेतील आकाशपाळण्यांसाठी चक्क पालिकेचे मैदान व्यापून टाकत शाळेतील विद्यार्थ्यांची अडवणूक केली आहे. पालिकेच्या उर्दू शाळेतील मुलांना व मराठी शाळेतील मुलांना ये-जा करण्यासाठी चिंचोळा मार्ग उरला असून तब्बल १५ दिवस त्यांचे मैदानी खेळही बंद झाले आहेत. मात्र याला कुळगाव-बदलापूर नगरपालिकेनेच परवानगी देत फी आकारल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे.
बदलापुरात दरवर्षी सार्वजनिकरीत्या माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. ४८ वर्षे जुना उत्सव म्हणून पूर्वेच्या स्टेशनपाडा गणेशोत्सव मंडळाच्या उत्सवाकडे पाहिले जाते. १९६९ मध्ये सुरू झालेल्या या उत्सवात दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर जत्रा भरते. या काळात येथे गर्दी होते. त्यामुळे रहिवाशांची गैरसोय होते. स्थानक परिसर असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या पादचाऱ्यांनाही त्याचा त्रास होतो. त्यामुळे या उत्सवाबाबत आता नागरिक तक्रार करू लागले आहेत. गेल्या काही वर्षांपासून रेल्वे स्थानक परिसरात वाहनांची संख्या व रहदारी वाढल्याने उत्सव काळात येथे मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार घडत आहेत. रेल्वे स्थानकालगत हा उत्सव असतो. यंदा रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या हद्दीत जत्रेचे स्टॉल्स लावण्यास बंदी घातल्याने या जत्रेचे स्टॉल्स थेट रेल्वे स्थानकाकडून गांधी चौक येथे जाणाऱ्या रस्त्यावर तर रेल्वे तिकीट घरासमोर उभे राहिले आहेत. रस्त्याच्या उजवीकडचे पदपथ या स्टॉल्सच्या मंडपांनी अडविल्याने नागरिकांना पदपथावरून चालणे अवघड झाले आहे. तर या भागात रस्ते काँक्रीटीकरणाची कामे सुरू असल्याने गांधी चौकाकडे जाणाऱ्या एकमेव पर्यायी मार्गावर उत्सव काळात मोठय़ा प्रमाणावर वाहतूक कोंडी होणार आहे.

उत्सव परवानगी घेऊनच
हा गणेशोत्सव शहरातील जुना उत्सव असून बदलापूर पालिकेकडे या जत्रेनिमित्त रस्त्यांवर स्टॉल्स उभे करण्यासाठी व पालिका शाळेच्या मैदानात आकाशपाळणे उभे करण्यासाठी मंडळाने रीतसर पैसे भरून परवानगी घेतली आहे. असे स्टेशनापाडा गणेशोत्सव मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.
आकाशपाळणे मैदानात
गांधी चौक येथील पालिकेच्या कुळगाव मराठी शाळा क्रमांक १ व उर्दू शाळा यांसमोरील मैदानात या गणेश मंडळाच्या जत्रेसाठीच्या आकाशपाळण्यांना जागा देण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही शाळांतील ५०० हून अधिक विद्यार्थ्यांची गैरसोय झाली आहे. उत्सव काळातील पंधरा दिवस या विद्यार्थ्यांना मैदानी खेळांपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. मात्र पदपथावरील जत्रेच्या स्टॉल्सना व शाळेतील आकाशपाळण्यांना बदलापूर नगरपालिकेकडूनच परवानगी देण्यात आल्याचे पालिकेच्या शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे आपल्याच विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाकडे व नागरिकांच्या गैरसोयीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काहींनी पालिकेवर केला आहे. तसेच ही परवानगी देण्यामागे सत्ताधारी शिवसेनेतील काहींनी पालिकेवर राजकीय दबाव आणल्याचेही बोलले जात आहे. मात्र पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यास दुजोरा दिलेला नाही.