बदलापूर स्थानकाच्या १६१ व्या वर्षपूर्तीनिमित्त अनोखी भेट

बदलापूर रेल्वे स्थानकाने बुधवारी १६१ वर्षे पूर्ण केली. त्यानिमित्ताने बदलापूरच्या रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरिया आणि रेल्वेच्या वतीने रेल्वे स्थानकात तंत्रज्ञानाने आयुष्याच्या विविध टप्प्यांचा प्रवास कसा विस्कळीत झाला आहे, याच्या प्रतिकृतीचे लोकार्पण केले.

ऐतिहासिक बदलापूर शहरात अनेक इतिहासाच्या पाऊलखुणा पाहायला मिळतात. त्यातील एक जुनी मात्र दुर्लक्षित वास्तू म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकाकडे पाहिले जाते. बदलापूर रेल्वे स्थानक १८५६ मध्ये बांधण्यात आले होते. त्यानंतर १ नोव्हेंबर रोजी याच स्थानकाचे लोकर्पण करण्यात आले. बुधवारी या घटनेला १६१ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरिया बदलापूरच्या वतीने स्थानक सुशोभीकरण करण्यात आले. त्यात आयुष्यातील विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला असून यात ‘खेळण्यातले जगणे’ या संकल्पनेवर ही  प्रतिकृती साकारली आहे. रोटरीच्या तुषार मैंद यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या प्रतिकृतीत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यातील घटनांचा आढावा घेतला असून नवे तंत्रज्ञान आणि त्याचा परिणाम याचे दर्शन यात घडवण्यात आले आहे. आयुष्यातले खेळ, कामातली एकता, नव्या गरजांमुळे जीवनात झालेले बदल अशा अनेक गोष्टींचा आढावा यात घेण्यात आला आहे. बुधवारी रोटरी सदस्य, रेल्वेचे अधिकारी आणि प्रवाशांच्या उपस्थितीत या प्रतिकृतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बदलापूरच्या रोटरी क्लब ऑफ इंडस्ट्रियल एरियाचे अध्यक्ष नितीन महाजन, बदलापूर स्थानकाचे प्रबंधक पाटील, रोटरीच्या माजी अध्यक्षा सुनीता जावडेकर, रोटरीचे सदस्य, रेल्वे प्रवासी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रोटरीच्या रेल्वेशी झालेल्या स्थानक सुशोभीकरणाच्या भागीदारीतून हे सुशोभीकरण केले गेल्याची माहिती रेल्वे प्रबंधकांनी दिली. यामुळे स्थानकाच्या सौंदर्यात भर पडणार आहे. यावेळी केक कापून आनंद साजरा केला.