बदलापूर उपनगराध्यक्षपद जाण्याची भाजपला भीती

बदलापूरमध्ये स्थानिक आमदारांच्या पत्रप्रपंचामुळे सत्ताधारी शिवसेना, भाजप युतीत पेच निर्माण झाला असून त्याचे पडसाद नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत उमटल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे चालून आलेले उपनगराध्यक्षपद हातातून जाते की काय, याची चिंता भाजप नगरसेवकांना सतावू लागली आहे.

विधान परिषदेच्या पाश्र्वभूमीवर मतांची फाटाफूट रोखण्यासाठी आणि वसंत डावखरे यांना पराजित करण्यासाठी शिवसेना पक्षातर्फे सर्वच बाजूंनी आखाडे बांधण्यात आले. त्यासाठी युती होऊन अंबरनाथ आणि बदलापूर शहरात भाजपला सत्तेत सामावून घेतले गेले. बदलापुरात थोडक्यात सत्तेने हुलकावणी दिल्याने भाजपच्या गोटात सल कायम होती. त्यामुळे रवींद्र फाटकांना दिल्या जाणाऱ्या मतांचा मोबदला म्हणून विषय समिती आणि उपनगराध्यक्ष पदाचे आश्वासन आपल्या पदरात पाडून घेण्यात भाजपच्या स्थानिक नेतृत्वाला यश आले. मात्र गेल्या काही दिवसांत स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी पालिका प्रशासन आणि नगराध्यक्षांवर सुरू केलेल्या टीकेच्या भडिमारामुळे युतीत सारे काही आलबेल नसल्याचे समोर आले.  नगराध्यक्षांच्या कार्यशैलीवर आमदार टीका करत असल्याने नगरसेवक मात्र संभ्रमात होते. कथोरे यांनी विविध निधींचा विनियोग आणि कामांबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याने शिवसेनेच्या आणि नगराध्यक्षांच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. नुकत्याच झालेल्या महासभेत आमदारांच्या पत्रांचे वाचन न झाल्याने भाजप नगरसेवकांनीही त्यांचीच री ओढत सभेतील प्रत्येक विषयाला प्रखरपणे विरोध करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे नगराध्यक्षांनी सभा तहकूब करत आटोपती घेतली. त्यामुळे युतीतील दरी मात्र पुन्हा एकदा उघड झाली आहे. येत्या काळात भाजपच्या वाटय़ाला येणारे उपनगराध्यक्षपदही हातून जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपच्या नगरसेवकांमध्ये सत्तेत राहावे आणि राहू नये अशी दोन मते तयार झाली आहेत.