बदलापूरमध्ये पुलाचे सुरक्षाकडे निखळल्याने अपघाताची भाती

रेल्वे स्थानकापासून प्रवाशांचा प्रवास सोपा व्हावा, या हेतूने तयार करण्यात आलेल्या स्कायवॉकच्या जबाबदारीवरून आधीच वाद सुरू असताना आता या स्कायवॉकची दुरवस्था समोर येऊ  लागली आहे. बदलापूर पश्चिमेतील बस स्थानकाकडे जाणाऱ्या स्कायवॉकवरील सुरक्षा कडे निखळण्यास सुरुवात झाल्याने येथे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे याकडे पालिका प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.

रेल्वे स्थानकापासून कोंडीतला प्रवास टाळत बाहेर पडण्यासाठी स्कायवॉकचा पर्याय समोर आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून अंबरनाथ आणि बदलापूर येथे हे स्कायवॉक बांधण्यात आले होते. सुरुवातीला त्याच्या देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी प्राधिकरणाकडेच होती. मात्र काही काळ लोटल्यानंतर या स्कायवॉकची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाकडे आली आहे. बदलापूरच्या स्कायवॉकची जबाबदारीही आता कुळगाव-बदलापूर नगरपालिकेकडे आली आहे; मात्र त्याच्या दुरवस्थेकडे पालिकेचे दुर्लक्षच होत असल्याचे दिसते आहे. यापूर्वीही गर्दुल्ले, फेरीवाले यांनी स्कायवॉकवर बस्तान मांडल्याने प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र नंतर पालिकेने धडक कारवाई करत त्या फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र स्कायवॉकवरील दिव्यांचा प्रश्न असो वा स्वच्छतेचा, त्यावर ठोस काही होताना दिसत नाही. त्यातच आता स्कायवॉकच्या सुरक्षा कडय़ांचीही दुरवस्था समोर येत आहे.

ज्यातून उत्पन्न मिळते, अशा जाहिरातींच्या बाबतीत पालिका प्रशासन अगदी सतर्क असते. मग देखभाल-दुरुस्तीच्या बाबतीत का नाही, असा सवालही आता नागरिक उपस्थित करत आहेत. स्कायवॉकची सुरुवात जेथून होते, त्या ठिकाणी रिक्षा, फेरिवाले आणि भाजीविक्रेत्यांनी गर्दी केल्याने प्रवाशांना स्कायवॉक चढताना आणि उतरताना अडथळे पार करावे लागतात. बदलापूर पश्चिमेतील वैशाली टॉकीज परिसरात जेथे स्कायवॉक उतरतो, तिथे रिक्षांची रांग असते. सहकार हॉटेलजवळ जेथे स्कायवॉक उतरतो, तेथे भाजी विक्रेत्यांची गर्दी असते. पूर्वेलाही अशाच प्रकारे रिक्षाचालक आणि भाजीवाल्यांची गर्दी होत आहे.

धोका कसा?

* बदलापूरच्या बस स्थानकाकडे जाणाऱ्या स्कायवॉकच्या अखेरच्या वळणावरील सुरक्षा कडे  निखळण्यास सुरुवात झाली आहे.

* स्टीलच्या रेलिंगखालील अनेक लाद्या निखळल्याने त्याच्यावर तग धरून असलेले हे कडेही निघण्याच्या स्थितीत आहे.

* स्कायवॉकचा वापर पादचाऱ्यांसोबत काही काळ वाट पाहण्यासाठीही अनेक नागरिक करत असतात. अशा वेळी कडय़ाच्या साहाय्याने एखादा नागरिक उभा राहिल्यास ते कडे निखळण्याची दाट शक्यता आहे.

स्कायवॉकच्या दुरवस्थेची माहिती मिळाली आहे. लवकरच स्कायवॉकच्या नादुरुस्त फरशा, छत आणि सुरक्षा रेलिंगच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे.

– देविदास पवार, मुख्याधिकारी, कुळगाव-बदलापूर नगरपालिका.