संस्कृत भारतीच्या पुढाकाराने शहरात संस्कृतचे वर्ग
भारतीय संस्कृतीची मूळ भाषा असलेली संस्कृत भाषा आत्मसात करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस घटू लागल्याने ही ‘देववाणी’च आता अस्तंगत होण्याच्या मार्गावर आहे. या पाश्र्वभूमीवर बदलापुरातील संस्कृतप्रेमी शिक्षकांनी एकत्र येऊन या भाषेचा प्रसार करण्याचा विडा उचलला आहे. ‘संस्कृत भारती’च्या माध्यमातून बदलापुरात संस्कृत भाषेशी निगडित कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून संस्कृत प्रशिक्षणाचे वर्गही चालवण्यात येणार आहेत.
संस्कृत भाषेचे भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असून देवांची वाणी म्हणून प्रचलित असलेली ही भाषा मात्र सध्याच्या शिक्षणव्यवस्थेत केवळ गुण मिळवून देणाऱ्या पाठांतर विषयापुरतीच मर्यादित राहिली आहे. या पाश्र्वभूमीवर संस्कृत भारतीच्या बदलापूर शाखेने शहरात संस्कृत संवर्धनाची चळवळ सुरू करण्याचा निर्धार केला आहे. यासाठी बदलापुरातील अनिता व भावे ख्याती देशपांडे यांनी पुढाकार घेत श्रावण पौर्णिमेला होणाऱ्या संस्कृतदिनाचे औचित्य साधत ६ सप्टेंबरच्या रविवारी शहरात पूर्ण संस्कृतमध्ये कार्यक्रमही घेतला होता. यात संस्कृतमध्ये सूत्रसंचालनाच्या बरोबरीनेच दुसरी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी संस्कृत भाषेत गोष्टी, गाणी, भगवद्गीतेतील श्लोक सादर केले; तर, उपस्थित पाहुणे नीरज दांडेकर यांनी आजच्या काळातील परदेशातील संस्कृतचे स्थान विशद केले तर, प्रा. संगीता पांडे यांनी वेद, उपनिषदे यातील संस्कृतचा आजच्या विज्ञानाशी असलेला संबंध मांडला. या कार्यक्रमाला ८० जणांची उपस्थिती लाभली होती.
संस्कृत भारतीच्या बदलापूर शाखेच्या वतीने आता संस्कृत भाषेचे प्रशिक्षण वर्ग, भाषेच्या परीक्षा, संभाषण वर्ग आदींचे नियमित आयोजन करण्यात येणार आहे.
यात पाचवी ते सातवीच्या मुलांसाठी देववाणी ही परीक्षा असून त्यात मुलांना संस्कृत शिकवून त्यांची परीक्षा घेण्यात येते. तसेच ज्यांना नियमित वर्गाना येणे शक्य नसेल अशांसाठी पत्राचार वर्ग घेण्यात येतात. या विनामूल्य वर्गात संस्कृतचा अभ्यास व परीक्षा घरातूनच देण्याची मुभा असते.
यात प्रवेश व परिचय या दोन परीक्षा घेण्यात येतात. तसेच सर्व वयोगटांसाठी संभाषण वर्ग घेण्यात येतात, अशी माहिती आयोजिका व संस्कृत शिक्षिका ख्याती देशपांडे यांनी दिली.